मुंबई – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि वाद हे समीकरण काही केल्या सुटत नाहीय. कोश्यारी आज पुन्हा एकदा वादात सापडलेत. त्यांनी चक्क मुंबई हल्ल्यातील शहिदांना चप्पल घालून अभिवादन केलेय. यामुळे पुन्हा एकदा वातावरण तापण्याची शक्यताय. राज्यपाल कोश्यारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज २६/११ मुंबई अतिरेकी हल्ल्यातील हुतात्म्यांना अभिवादन केले. यावेळी वरिष्ठ पोलिस अधिकारी तसेच सेवानिवृत्त पोलिस अधिकारी उपस्थित होते.
मुंबईवरील २६/११ अतिरेकी हल्ल्याची जखम अजूनही भळभळतेय. या हल्ल्यात अनेक पोलिसांनी जीवाची बाजी लावून मुंबईकरांचे प्राण वाचवले. करकरे, कामटे, साळस्कर हे पोलिस अधिकारी लढता-लढता शहीद झाले. त्यांच्या कर्तृत्वाची आणि त्या काळ्याकुट्ट दिवसाची आठवणही काढली तरी उर भरून येतो. या शहिदांना अभिवादन करण्यासाठी मुंबई पोलिसांनी एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
शहिदांच्या अभिवादन कार्यक्रमाला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव आनंद लिमये , पोलिस महासंचालक रजनीश सेठ व मुंबईचे पोलिस आयुक्त विवेक फणसाळकर उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह इतर मंत्र्यांनी पादत्राणे काढून हुतात्मा स्मारकात शहिदांना अभिवादन केले. पुष्पचक्र अर्पण केले. मात्र, राज्यपाल कोश्यारी यांनी अभिवादनावेळी चप्पल काढली नाही. त्यामुळे ते पुन्हा एकदा वादात सापडलेत.