File Photo : BJP Flag
अमरावती : लोकसभा निवडणुकीत महायुतीतील घटक पक्ष शिवसेना शिंदे गटाचे नेते आनंदराव अडसूळ यांना भाजपकडून राज्यपाल करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. परंतु, त्या आश्वासनाची पूर्तता करण्यात न आल्याने अडसूळ यांनी थेट भाजपला इशारा दिला आहे. ‘उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मला राज्यपाल करण्याचे दिलेले वचन पाळावे. अन्यथा मी नवनीत राणा प्रकरणात न्यायालयात जाईल’, असे ते म्हणाले.
हेदेखील वाचा : ‘मुख्यमंत्रिपदासाठी उद्धव ठाकरेंची काँग्रेसपुढे लाचारी, त्यांचा दिल्ली दौरा हा लाचारीचे एक उदाहरण’; संजय निरूपम यांची घणाघाती टीका
माजी खासदार नवनीत राणा यांच्या जातवैधता प्रमाणपत्राविषयी सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निकाल अयोग्य असून, त्यांचे जात प्रमाणपत्र रद्द करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका (क्यूरेटिव्ह पिटीशन) दाखल करण्याचा इशारा माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने जातपडताळणी समितीचा निर्णय अंतिम असल्याचे सांगून नवनीत राणा यांना या प्रकरणात दिलासा दिला असला, तरी या निकालाचा देशावर काय परिणाम होईल, याचा विचार केलेला नाही.
हेदेखील वाचा : Big News ! 15 ऑगस्टनंतर राज्यात राजकीय भूकंप होणार; ‘हे’ दोन बडे नेते काँग्रेसमध्ये प्रवेश करणार?
कुणीही जातपडताळणी समितीला हाताशी धरून बनावट कागदपत्रांच्या आधारे जातपडताळणी प्रमाणपत्र मिळवून आरक्षणाचा लाभ मिळवेल आणि अन्यायग्रस्तांना दादही मागता येणार नाही, अशी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आपण पुन्हा याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाकडे दाद मागण्याचा निर्णय घेऊ शकतो, असेही अडसूळ म्हणाले.
15 दिवस वाट पाहणार
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मला राज्यपाल करण्याचे आश्वासन दिले होते. पण आश्वासन देऊन काहीही झाले नाही. काही गोष्टींसाठी मर्यादा असतात. त्यामुळे अजून पंधरा दिवस वाट पाहाणार. त्यानंतर मात्र आपण नवनीत राणा यांच्या जात प्रमाणपत्राबाबत सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
विधानसभेत हव्या 3 जागा
विधानसभा निवडणुकीत अमरावती जिल्ह्यातील तीन जागा मागून घेणार असल्याचे अडसूळ यांनी स्पष्ट केले. त्यात बडनेरा, तिवसा आणि दर्यापूर विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे. या जागांवर यापूर्वी शिवसेना लढली आहे.