मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांनी मुंबईबद्दल (Mumbai) केलेल्या वादग्रस्त विधानावर राज्य सरकारनेही नाराजी व्यक्त केली आहे. राज्यपालांचे हे विधान राज्याचा अपमान (Maharashtra Insult) करणार असून त्याबाबत केंद्र सरकारकडे (Central Government) आम्ही तक्रार करणार असल्याचे शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी स्पष्ट केले.
केसरकर म्हणाले, राज्यपालांनी केलेले वक्तव्य राज्याचा अपमान करणारे आहे. राज्यपाल हे संविधानिक पद असून त्यांच्यासंदर्भात केंद्र शासनाला लिहिण्याचा पूर्ण अधिकार मुख्यमंत्र्यांना असतो. त्यामुळे राज्यपालांकडून पुन्हा अशी विधान येणार नाही, याबाबत केंद्र शासन त्यांना कळवू शकते.
मुंबई कॉस्मॉपोलिटन शहर आहे. येथे केवळ दोनच समाजांचे योगदान नाही, तर अनेक समाजांचे मुंबईच्या विकासात योगदान आहे. यामध्ये मुंबईचे मूळ मराठीच आहे. तसेच, मुंबईच्या उभारणीत सर्वाधिक वाटा हा मराठी माणसाचाच आहे ही वस्तूस्थिती आहे. त्यामुळे दोन समाज का? पारसी सामाजाने देखील मुंबईच्या औद्योगिक वाढीत योगदान दिले आहे. पण एखाद्या समाजाच्या कार्यक्रमाला गेल्यानंतर त्यांच्या योगदानाबद्दल बोलायचे असते पण त्यांनी पैसा काढून घेतला तर मुंबईत काही शिल्लक राहणार नाही, असे म्हणणे म्हणजे मुंबईबद्दल अभ्यास केलेला नाही हे द्योतक आहे, असेही केसरकर म्हणाले.
मुंबई आर्थिक राजधानी का आहे? तर बहुतांश बँकांचे हेडक्वार्टर मुंबईला आहे. स्वतः रिझर्व्ह बँकेचे मुख्यालय मुंबईत आहे. त्यामुळे आर्थिक राजधानी कशाला म्हणतात की, एकत्रित जो कर दिला जातो त्यांपैकी पूर्वी ४० टक्के हिस्सा एकट्या मुंबई शहरातून येत होता. त्यामुळे हे जे योगदान आहे ते कुठल्या एखाद्या समाजामुळे नाही तर सर्व समाज एकत्र आल्याने झाले आहे. मुंबई केवळ लाठी आणि लोटा घेऊन लोक आले पण त्यांना या शहराने आश्रय दिला मोठे केले. त्यामुळे कोणीही बाहेरुन गुंतवणूक घेऊन मुंबईत आलेले नाही, असेही केसरकर यांनी सांगितले.