फोटो सौजन्य- सोशल मीडिया
भूजल समृद्ध ग्राम स्पर्धेचे पारितोषिक वितरण आज पार पडले यामध्ये राज्यस्तरीय प्रथम पुरस्कार कऱ्हाटी (जि. पुणे, ता. बारामती), द्वितीय पुरस्कार जरूड (जि. अमरावती, ता. वरूड) व तृतीय पुरस्कार किरकसाल (जि. सातारा, ता. माण) या ग्रामपंचायतींनी पटकावला. या ग्रामंपचायतींना अनुक्रमे १ कोटी, ५० लाख आणि ३० लाख अशा राज्यस्तरीय पुरस्काराच्या रकमेचा समावेश होता.
अटल भूजल योजना सध्या राज्यातील १३ जिल्ह्यांतील ११०० गावांत
पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा, पुणे यांच्या वतीने नाशिकरोडच्या मित्रा संस्थेत भूजल समृद्ध ग्राम स्पर्धा सन २०२२-२३ चा पारितोषिक वितरण समारंभ आयोजित करण्यात आला त्यावेळी पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, अटल भूजल योजना सध्या राज्यातील १३ जिल्ह्यांतील ११०० गावांमध्ये राबविण्यात येत आहे. या योजनेच्या अंमलबजावणीमध्ये महाराष्ट्र देशात पहिल्या क्रमांकावर आहे. येत्या काळात ही योजना राज्यातील सर्व जिल्ह्यात राबविली जावी, यासाठी केंद्र शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याची ग्वाही राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली. याप्रसंगी सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम) तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे, खासदार भास्करराव भगरे, पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव डॉ. संजय खंदारे, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या आयुक्त श्रीमती पवनीत कौर, अतिरिक्त संचालक डॉ. विजय पाखमोडे आदी उपस्थित होते.
मंत्री पाटील म्हणाले की, ठिबक सिंचनामुळे पाण्याची ५० टक्के बचत होत आहे. त्यामुळे राज्यात ठिबक सिंचनाचा वापर वाढला पाहिजे. गावकऱ्यांना पाण्याचे महत्त्व पटले तर निश्चितच गावांच्या भूजल संपत्तीत वाढ होणार आहे. या योजनेसाठी गावांमध्ये लोकसहभाग वाढला पाहिजे.
राज्यातील पुरस्कारप्राप्त ग्रामपंचायती
‘लोकसहभागातून भूजल व्यवस्थापन’ साध्य होण्यासाठी अटल भूजल योजनेंतर्गत भूजल समृद्ध ग्राम स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत जळगाव, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, नाशिक, जालना, लातूर, धाराशीव, अमरावती, बुलढाणा व नागपूर या जिल्ह्यांतील ग्रामपंचायतींनी सहभाग घेतला होता.
जिल्हास्तरीय पुरस्कारात प्रथम पुरस्कार – ५० लाख, द्वितीय – ३० लाख व तृतीय क्रमांकाचा पुरस्कार – २० लाख अशी बक्षिसांची रक्कम देण्यात आली. या पुरस्कारांच्या माध्यमातून राज्यातील ३६ ग्रामपंचायतींना १३ कोटी ८० लाखांच्या पुरस्काराच्या रकमेचे वाटप करण्यात आले.