सावधान! जीबीएस महाराष्ट्रात पसरतोय, सोलापुरात एकाचा मृत्यू?
राज्यात गुइलेन बॅरे सिंड्रोमची (JBS) लागण झालेल्या रुग्णांची संख्या वाढत असताना, याची लागण झालेल्या सोलापुरातील एका रुग्णाचा मृत्यू झाला. मृत्यूचे नेमके अंतिम कारण वैद्यकीय अहवालानंतर स्पष्ट होणार असले, तरी रुग्णाला जीबीएसची लागण झाल्याचे निदान ११ जानेवारीला झाले होते, त्यामुळे हा जीबीएसचा पहिला मृत्यू ठरण्याची शक्यता वर्तवली जात असून सोलापुरातही भीतीचं वातावरण आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मृत सनदी लेखापाल मूळचा सोलापूरचा असून तो पुण्यात धायरी परिसरातील एका कंपनीत नोकरी करीत होता. गेल्या ११ जानेवारी रोजी त्यास गुइलेन गुइलेन बॅरे सिंड्रोमच्या (जीबीएस) आजाराची लागण झाल्याचे निदान झाले होते. त्याला उलट्यांचा त्रास वाढला होता. त्याने पुण्याऐवजी स्वतःच्या गावी, सोलापुरात येऊन वैद्यकीय उपचार घेणे पसंत केले. मात्र एका खासगी रूग्णालयात उपचार सुरू असताना प्रकृती आणखी बिघडली. त्यामुळे त्यास पाच दिवस अतिदक्षता विभागात हलविण्यात आले होते. प्रकृती सुधारल्यानंतर त्याला अतिदक्षता विभागातून बाहेर काढण्यात आले होते. परंतु पुन्हा प्रकृती बिघडली आणि अखेर त्याचा मृत्यू झाला.
दरम्यान, रविवारी दुपारी छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार शासकीय रुग्णालयात मृतदेह न्यायवैद्यक तपासणीसाठी हलविण्यात आला असता मृतदेहाची चार तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकाने न्यायवैद्यक तपासणी केली. यात रुग्णाचा मृत्यू ‘जीबीएस’मुळे झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष काढण्यात आला. रासायनिक पृथ:करण अहवाल पंधरा दिवसांनी प्राप्त होणार असून त्यावेळी मृत्यूचे अंतिम कारण स्पष्ट होणार असल्याचं डॉक्टरांकडून सांगण्यात आलं.
संबंधित रुग्णाला एका सहकारी रुग्णालयात वैद्यकीय उपचार सुरू असताना अखेर मृत्यू झाल्यानंतर मृतदेहाची छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार शासकीय रुग्णालयात न्यायवैद्यक तपासणी केली असता तसेच संबंधित रुग्णालयाकडून मृत रुग्णावर केलेल्या वैद्यकीय उपचाराची कागदपत्रे पाहता ‘गुइलेन बॅरे सिंड्रोम’च्या (जीबीएस) आजाराने रुग्णाचा मृत्यू झाल्याचे प्राथमिक कारण समोर आले आहे. रासायनिक पृथ:करण्याचा अहवाल पंधरा दिवसांनी आल्यानंतर मृत्यूचे अंतिम कारण समजू शकेल.
GBS च्या रुग्णात वाढ झाली आहे. पुण्यामध्ये या आजाराचे अधिक रुग्ण आढळत आहेत. पुण्यात GBS या आजाराचे तब्बल 74 रुग्ण आढळल्याची माहिती समोर आली आहे. या रुग्णांपैकी 14 रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. तर पुण्यात एकाचा मृत्यू देखील झाला आहे.
पुणे शहरामध्ये गुलियन बॅरे सिंड्रोमचे (GBS) अनेक रुग्ण आढळत आहेत. आत्तापर्यंत 14 रुग्ण व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले असून तर पाच रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. या रोगाचा उपचार करण्यासाठी लाखो रुपयांचा खर्च होत असल्याचे निदर्शनास आले आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या सूचनेनुसार पुणे महापालिकेने पुण्यातील कमला नेहरू रुग्णालयात जीबीएसच्या रुग्णांवर मोफत उपचार केले जाणार असल्याची मोठी घोषणा केली आहे.