यवतमाळ : नैसर्गिक आपत्तींमुळे (Natural Calamities) महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे हाल झाले आहेत. त्यामध्येच खरीप हंगामामध्ये (Kharif season) झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकर्यांचे कंबरडे मोडले. तरी देखील या संकटातून सावरत शेतकर्यांनी रब्बी हंगामाची (Rabi season) तयारी केली. मात्र पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या (Agriculture) मेहनतीवर पाणी फिरले आहे. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचा हिरमोड झालेला आहे. हातातोंडाशी आलेले पीक अवकाळी पावसामुळे जमीनदोस्त झाले आहे. या नुकसानीमुळे शेतकऱ्यांवर पुन्हा एकदा संकटांचे आभाळ कोसळले आहे.
रब्बी हंगामामध्ये केलेले पीक आता काढणीला आले आहेत. यावेळी देखील नफा मिळेल या आशेने शेतकरी मेहनत घेत होते. मात्र यावेळी देखील काढणीला आलेल्या पिकांवर पाऊसाचे पाणी फिरले आहे. गारपिटीसह अवकाळी पावसाचा तडाखा शेतकर्यांना बसला असून यामुळे मोठे नुकसान झाले आहे. बाभूळगाव, उमरखेड व महागाव तालुक्यातील गहू, हरभरा, तूर, भाजीपाला, संत्रा या पिकांचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेले आहे. तीन तालुक्यात जवळपास नऊ ते दहा हजार हेक्टर क्षेत्रातील पिकांना फटका बसला आहे. गारपिटीमुळे शेतकरी हादरून गेला असून, नुकसान भरपाई देण्याची मागणी केली जात आहे. कृषी विभागाने यंत्रणेला सर्वेक्षण तत्काळ पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहे.अशी माहिती यवतमाळचे जिल्हा कृषी अधीक्षक प्रमोद लहाळे यांनी दिली आहे.