संग्रहित फोटो
टिळक भवन येथे प्रसार माध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, सावळी गावात एवढा मोठा ड्रग्जचा कारखाना सुरु होता त्याची कल्पना सातारा पोलीसांना होती पण त्यांनी कारवाई केली नाही. मुंबई क्राईम ब्रँचने ही कारवाई केली. साताऱ्याचे पोलीस अधिक्षक व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत जवळचे संबंध आहेत. हे तेच पोलीस अधिक्षक आहेत ज्यांनी आंतरावली सराटी येथे मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरु असताना मराठा समाजाच्या माता भगिनींवर अमानुष लाठीहल्ला केला होता. साताऱ्यातील ड्रग्ज प्रकरणी शिंदे व फडणवीस यांची मिलीभगत आहे का? या प्रश्नाचे उत्तर फडणवीस व शिंदे यांनी दिले पाहिजे, असे हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.
सपकाळ पुढे म्हणाले की, सातारा ड्रग्ज प्रकरणावरून जनतेचे लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी निवडणुक आयोगाची मदत घेण्यात आली व महानगरपालिका निवडणुकांची घाईघाईने घोषणा करण्यात आली. मतदार याद्या अद्याप जाहीर झालेल्या नाहीत. १५ तारखेला मतदार याद्या जाहीर करणार होते पण आता बुथनिहाय २७ तारखेला या मतदार याद्या जाहीर केल्या जाणार आहेत. उमेदवारी अर्ज भरण्यास २३ तारखेपासून सुरुवात होत आहे आणि उमेदवारी अर्जावर उमेदवाराला तसेच सुचक, व अनुमोदक यांना त्यांचे मतदार यादीतील भाग क्रमांक, अनुक्रमांक लिहावा लागतो पण मतदार याद्याच नाहीत तर अर्ज कसे भरणार? असा सवाल सपकाळ यांनी उपस्थित केला आहे. निवडणूक कार्यक्रम घिसाडघाईने जाहीर करून निवडणूक आयोगाने बौद्धिक दिवाळखोरी दाखवली आहे.
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याबद्दल विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सपकाळ म्हणाले की, पृथ्वीराज चव्हाण हे अनुभवी व ज्येष्ठ नेते आहेत, त्यांच्या वक्तव्याचा ‘ध’ चा ‘मा’ करण्यात आला आहे. ते जे बोलले नाहीत त्याचा अपप्रचार केला जात आहे. ऑपरेशन सिंदूरचा काँग्रेस पक्षाला सार्थ अभिमान आहे व त्यावेळी काँग्रेस पक्ष सरकारच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला होता. पृथ्वीराज चव्हाण जे बोलले तेच याआधी आंतरराष्ट्रीय प्रसार माध्यमातून आले आहे व राफेल कंपनीनेही तेच सांगितले आहे, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.






