फोटो सौजन्य - Social Media
पेण तालुक्यात शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण आणि दिशादर्शक उपक्रम म्हणून वनराई आणि जेएसडब्लू फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने पहिल्या भव्य कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. ‘कृषी तरंग २०२६’ या नावाने आयोजित करण्यात आलेले हे प्रदर्शन गुरुवारी, ८ जानेवारी २०२६ रोजी Sissom Riverside, पेन बायपास येथे मोठ्या उत्साहात सुरू झाले.
या कृषी प्रदर्शनाचा उद्घाटन सोहळा रायगड जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित बडे (आयएएस) यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. उद्घाटनप्रसंगी त्यांनी शेतकऱ्यांसाठी अशा उपक्रमांची गरज अधोरेखित करत आधुनिक तंत्रज्ञान आणि शेतीपूरक व्यवसायांमुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी मिळू शकते, असे मत व्यक्त केले.
यावेळी व्यासपीठावर वनराईचे विश्वस्त सागर धारिया, वनराईचे सचिव अमित वाडेकर, जेएसडब्लू स्टील (डोलवी) चे उपाध्यक्ष – Land & Estate आत्माराम बेटकेकर, जेएसडब्लू फाउंडेशनचे सामाजिक दायित्व प्रमुख सुधीर तैलोंग, तसेच Water, Environment and Sanitation विभागाच्या प्रमुख रूपा दावणे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
हे कृषी प्रदर्शन ८ व ९ जानेवारी २०२६ या दोन दिवसांच्या कालावधीत आयोजित करण्यात आले असून, शेतकऱ्यांना एकाच ठिकाणी शेतीविषयक सर्वांगीण माहिती मिळावी, हा यामागचा प्रमुख उद्देश आहे. प्रदर्शनामध्ये आधुनिक शेती तंत्रज्ञान, नवीन पीक पद्धती, मत्स्यशेती, दुग्धव्यवसाय, तसेच शेतीपूरक उद्योगांवरील विविध कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले आहे. तज्ज्ञांच्या मार्गदर्शनामुळे शेतकऱ्यांना उत्पादन वाढ, खर्च कमी करण्याचे उपाय आणि बाजारपेठेतील संधी याबाबत उपयुक्त माहिती मिळत आहे.
याशिवाय प्रदर्शनस्थळी शेतीसाठी लागणारी आधुनिक अवजारे, खते व कीटकनाशके, नवीन तंत्रज्ञानावर आधारित उपकरणे, तसेच महिला बचत गटांनी सुरू केलेल्या विविध व्यवसायांचे स्टॉल्स उभारण्यात आले आहेत. विविध शासकीय विभाग व त्यांच्या कृषी व ग्रामीण विकासाशी संबंधित योजनांची माहिती देखील या प्रदर्शनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवली जात आहे.
या कृषी प्रदर्शनामुळे शेतकऱ्यांना केवळ माहितीच नव्हे तर प्रत्यक्ष अनुभवातून शिकण्याची संधी मिळत असून, शेतीपूरक व्यवसायांना चालना मिळेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे. ‘कृषी तरंग २०२६’च्या माध्यमातून शेती अधिक शाश्वत, नफेखोर आणि आधुनिक करण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल टाकण्यात आले असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.






