मित्र पक्षांनी विश्वासात न घेतल्यास स्वबळावर लढण्याचा RPI चा इशारा; चार पदाधिकाऱ्यांच्या निलंबनाचा ठराव
धाराशिव : सध्या राज्यात ३२ जिल्हा परिषदा आणि ३३६ पंचायत समित्यांच्या निवडणुका प्रलंबित आहेत. यामध्ये अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांचा कार्यकाळ बराच काळ पूर्ण झाला असून प्रशासकीय राजवटीतून कारभार सुरू आहे. मात्र, यापैकी २० जिल्हा परिषदांमध्ये आणि त्याअंतर्गत ८८ पंचायत समित्यांमध्ये आरक्षणाची एकूण मर्यादा ५० टक्क्यांहून अधिक असल्याने त्या ठिकाणच्या निवडणुका तात्पुरत्या स्वरूपात स्थगित ठेवण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.
याचदरम्यान, आरपीआय (आठवले) धाराशिव जिल्ह्याची बैठक धाराशिव येथे नुकतीच झाली. आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर चर्चा व दिशा ठरविण्यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीस प्रदेश सहसचिव राजाभाऊ ओहाळ यांनी मार्गदर्शन केले. तर जिल्हाध्यक्ष विद्यानंद बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. यावेळी मराठवाडा कार्याध्यक्ष आनंद पांडागळे, मराठवाडा उपाध्यक्ष भागवत शिंदे, मराठवाडा कार्यकारिणी सदस्य हरीश डावरे, मराठा आघाडी प्रदेश उपाध्यक्ष रविराज पाटील उपस्थित होते.
या बैठकीत जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये मित्र पक्षांकडून जागा सोडून घेण्याबाबत चर्चा करण्यात आली. कार्यकर्त्यांनी जिल्ह्यातील आरक्षित जागा आरपीआयला (आठवले) मिळाव्यात, अशी ठाम भूमिका मांडली. यावर बोलताना ओहाळ म्हणाले की, वरिष्ठांच्या आदेशानुसार मित्र पक्षांकडे जागांची मागणी करण्यात येईल आणि शक्य तितक्या आरक्षित जागा मिळवून देण्याचा प्रयत्न केला जाईल. पक्षात फूट पाडणाऱ्या व शिस्तभंग करणाऱ्या कार्यकर्त्यांना कोणतीही सवलत दिली जाणार नाही, असा स्पष्ट इशाराही त्यांनी दिला.
बैठकीत मागील नगरपालिका निवडणुकांमध्ये मित्र पक्षांनी आरपीआय (आठवले) पक्षाला विश्वासात न घेतल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये नाराजी असल्याचे स्पष्टपणे मांडण्यात आले. यामुळे, यापुढे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये मित्र पक्षाने विश्वासात न घेतल्यास आरपीआय स्वबळावर निवडणूक लढवेल, असा सर्वानुमते ठराव करण्यात आला.
बैठकीत नगरपालिका निवडणुकांमध्ये पक्षविरोधी कारवाया केल्याच्या आरोपावरून पक्षातील काही पदाधिकाऱ्यांवर पाच वर्षांसाठी निलंबनाची कारवाई करण्याचा ठराव करण्यात आला. त्यानुसार तानाजी कदम (मराठवाडा उपाध्यक्ष, तुळजापूर), उत्तम भालेराव (रोजगार आघाडी जिल्हाध्यक्ष, लोहारा), प्रवीण गोरोबा बनसोडे, धाराशिव, उदयराज बनसोडे (शहराध्यक्ष, धाराशिव) या पदाधिकाऱ्यांना निलंबन नोटीस देण्यात येणार आहे.
यावेळी नळदुर्गचे नूतन नगरसेवक मारुती खारवे यांचा शाल, फेटा व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. जिल्हा उपाध्यक्ष प्रताप कदम, जिल्हा सरचिटणीस सिद्धार्थ ओहाळ, जिल्हा कार्याध्यक्ष बाबासाहेब मस्के, जिल्हा उपाध्यक्ष संदिपान कांबळे, दगडू भोसले आदी उपस्थित होते.






