एमआरआयच्या प्रतीक्षेला ऑक्टोबरमध्ये पूर्णविराम! नायर, सायन आणि कूपरमध्ये यंत्रे दाखल
Health Update: एमआरआय तपासणीसाठी महापालिका रुग्णालयांच्या दारात महिनोनमहिने प्रतीक्षा करणाऱ्या रुग्णांना आता दिलासा मिळण्याची चिन्हे आहेत. ११ फेरनिविदांनंतर महापालिकेच्या प्रमुख रुग्णालयांमध्ये अत्याधुनिक ३ टेस्ला एमआरआय यंत्रणा दाखल होण्यास सुरुवात झाली आहे. नायर, सायन आणि कूपर रुग्णालयांत यंत्रे दाखल झाली असून, स्थापनेचे काम सुरू आहे. केईएममध्येही नवीन यंत्र लवकरच दाखल होणार आहे. ऑक्टोबरमध्ये ही एमआरआय सेवा सुरळीत करण्याचे नियोजन असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त (शहर) डॉ. प्राजक्ता वर्मा-लवंगारे यांनी दिली.(फोटो सौजन्य – istock)
केईएम, सायन आणि नायर रुग्णालयांमध्ये एमआरआयची सुविधा वाढविण्याचा प्रस्ताव २०१८-१९ पासून प्रलंबित होता. निविदा प्रक्रियेतील अडथळ्यांचा फटका थेट रुग्णांना बसला. केईएममध्ये एमआरआयसाठी सुमारे नऊ महिन्यांची प्रतीक्षा असल्याचे सांगितले जाते, तर नायरमधील जुने यंत्र बंद असल्याने दीर्घकाळ सेवा विस्कळीत झाली होती. त्यामुळे अनेक रुग्णांना खासगी निदान केंद्रांचा आधार घ्यावा लागत होता. ३ टेस्ला एमआरआयमुळे १.५ टेस्लाच्या तुलनेत अधिक स्पष्ट प्रतिमा मिळू शकतात. त्यामुळे मेंदूतील सूक्ष्म बदल, लहान गाठी, अपस्माराशी संबंधित जखमा तसेच कान-नाक-घशाच्या आजारांचे निदान अधिक अचूक होण्यास मदत होऊ शकते.
रुग्णालयांसाठी औषधे, वैद्यकीय उपकरणे आणि अन्य आवश्यक साहित्य खरेदीला प्राधान्य देत असून, त्याची प्रक्रिया वेगाने सुरू आहे, असे डॉ. वर्मा-लवंगारे यांनी सांगितले. त्यामुळे केवळ यंत्रे दाखल होणे नव्हे, तर ती प्रत्यक्ष रुग्णसेवेत कार्यान्वित होणे आणि आवश्यक साहित्य उपलब्ध असणे यावरही पालिकेचा भर आहे. नवीन यंत्रे सुरू झाल्यानंतर तपासणीची प्रतीक्षा कमी होऊन आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांना याचा लाभहोणार असून, त्यांचा खाजगी केंद्रांवरील खर्चाचा भार कमी होण्याची अपेक्षा आहे.
प्रमुख पालिका रुग्णालयाचे संचालक डॉ. शैलेश मोहिते यांच्या माहितीनुसार, तीन टेस्ला क्षमतेचे एमआरआय यंत्र सध्या वापरात असलेल्या १.५ टेस्ला यंत्राच्या तुलनेत अधिक स्पष्ट आणि उच्च गुणवत्तेच्या प्रतिमा देऊ शकते. त्यामुळे शरीरातील अतिशय लहान बदल, गाठी तसेच आजाराची सुरुवातीची लक्षणे शोधणे तुलनेने सोपे होते. विशेषतः मेंदूशी संबंधित आजारांच्या निदानासाठी या यंत्राचा मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. अपस्माराच्या रुग्णांच्या मेंदूमधील सूक्ष्म बदल किंवा लहान जखमा अधिक स्पष्टपणे दिसू शकतात. परिणामी, आजाराचे अचूक निदान करून रुग्णाच्या पुढील उपचारांचे नियोजन करण्यास डॉक्टरांना मदत होणार आहे.






