संग्रहित फोटो
छत्रपती संभाजीनगर : राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून कडक उन्हाचा फटका (Sunstroke) बसत आहे. त्यानंतर आज छत्रपती संभाजीनगर (Rain in Chhatrapati Sambhajinagar) शहर आणि परिसरात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने हजेरी लावली. या मुसळधार पावसामुळे शहरावर मोठ्या प्रमाणावर ढग जमा झाले होते. वारा आणि मुसळधार पावसामुळे भरदिवसा अंधार पडल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली.
गेल्या काही दिवसांपासून वातावरणात बदल जाणवत आहे. कधी पाऊस तर कधी कडक उन्ह, अशी परिस्थिती निर्माण होत आहे. याचा फटका आरोग्यावर होत आहे. ऐन कडाक्याच्या उन्हाळ्यात आज दुपारी बारा-एकच्या सुमारास आभाळ अचानक दाटून आले होते. ढगांनी आकाश व्यापल्याने अंधार पसरला आणि काही वेळातच पावसाला सुरुवात झाली. सिडको, हडको तसेच मध्यवर्ती शहराच्या काही भागांमध्ये पावसाच्या हलक्या ते मध्यम सरी बरसल्या. पावसामुळे ही परिस्थिती निर्माण झाली. भरदुपारी अशाप्रकारे अंधार झाल्याने अनेक वाहनांवर लाईट्स दिसत होत्या.
पिकांचे अतोनात नुकसान
मराठवाड्यासह महाराष्ट्रातील अनेक भागांना अवकाळी पावसाने झोडपून काढलं आहे. यामध्ये अनेक शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे. त्याचबरोबर अनेक ठिकाणी गारांचा पाऊसही होत आहे. या परिसरात विजांच्या कडकडाटासह सोसाट्याचा वारा सुटला आणि सोबतच अवकाळी पावसाला सुरूवात झाली. अचानक निसर्गाच्या या बदललेल्या रूपामुळे नागरिकांची मात्र धावपळ उडाली.