राज्याला मुसळधार पावसाचा इशारा (फोटो - ani)
मुंबई: महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यांना पावसाने झोडपून काढले आहे. विदर्भ, मराठवाडा, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र या भागात पावसाने जोरदार बॅटिंग सुरु केली आहे. दरम्यान भारतीय हवामान विभागाने राज्यातील काही जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा हाय अलर्ट दिला आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार आज कोकण, मध्य महाराष्ट् भागात अति ते अति मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज आहे.
कोकणात रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांना पावसाने झोडपून काढले आहे. दरम्यान विदर्भात तर पावसाने कहर केला आहे. भंडारा, नागपूर या जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे. नागपूर जिल्ह्याला आज ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. पावसाचा जोर वाढल्यास लष्कराची मदत घेतली जाणार असल्याचे नागपूरचे जिल्हाधिकारी यांनी सांगितले आहे.
कोकणाला अति मुसळधार पावसाचा इशारा
भारतीय हवामान विभागाने कोकण किनारपट्टीवरील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मुंबई, रत्नागिरी, रायगडमध्ये पावसाचा जोर आधीपेक्षा वाढण्याचा अंदाज आहे. कोकणातील जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे समुद्रात जाऊ नये असे आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे. प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
विदर्भात मुसळधार
भंडारा जिल्ह्यातील गोसेखुर्द धरणातून वैनगंगा नदीत मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरु करण्यात आला आहे. अनेक रस्ते पाण्याखाली गेले आहेत. वर्धा जिल्ह्याला आज पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. संततधार पावसामुळे अनेक नदी नाल्याना पूर आला आहे. हिंगणघाट, देवळाली भागातील गावांचा संपर्क देखील मुसळधार पावसामुळे तुटला आहे.
पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार
पुणे जिल्ह्यात काही दिवस पावसाने विश्रांती घेतल्याचे पाहायला मिळाले आहे. मात्र कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यात संततधार सुरूच आहे. मध्य महाराष्ट्रात पुणे, सांगली, कोल्हापूरला पावसाचा हाय अलर्ट देण्यात आला आहे. तसेच मराठवाड्यात देखील मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना, बीडमध्ये जिल्ह्याला मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.






