File Photo : Narhari Zirwal
हिंगोली : राज्यात महायुतीचे सरकार सत्तेवर आले आहे. त्यात देवेंद्र फडणवीस हे या सरकारचे नेतृत्त्व करत आहेत. मंत्र्यांचा शपथविधी पार पडला. खातेपाटपही झाले. त्यानंतर विविध जिल्ह्यातील पालकमंत्री कोण असेल याच्या नावांची घोषणाही झाली. त्यामध्ये हिंगोलीचे पालकमंत्री म्हणून नरहरी झिरवळ यांची निवड करण्यात आली. त्यावरूनच झिरवळ यांनी ‘मी गरीब असल्याने मला गरीब जिल्ह्याचं पालकमंत्री केलं’, अशी खदखद व्यक्त केली.
हेदेखील वाचा : Praniti Shinde : ‘देवेंद्र फडणवीस म्हणजे ईव्हीएम सीएम, महाराष्ट्र…’; प्रणिती शिंदेंची मुख्यमंत्र्यांवर बोचरी टीका
भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस या महायुतीचे सरकार असल्याने तिन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांच्याच सहमतीने सध्या शासकीय नियुक्त्या, घोषणा केल्या जात आहेत. त्यात नुकतेच विविध जिल्ह्यातील पालकमंत्रिपदाची यादी जाहीर करण्यात आली. यामध्ये अनेक मंत्र्यांना पालकमंत्रिपदापासून वगळण्यात आलं आहे. त्यावरून मंत्र्यांमध्ये नाराजी उफाळून आली आहे. पालकमंत्रिपदावरून रायगडमध्ये मोठा राडा देखील पाहिला मिळाला. पालकमंत्रिपदातून वगळल्यानं अनेक मंत्री नाराज होते. तर आता आवडीचा जिल्हा दिला नसल्यानेही नाराजीचा मोठा सूर उमटत आहे. हिंगोलीचे पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांनी आपली खदखद बोलून दाखवलीय. गरीब असल्यानं मला गरीब जिल्ह्याचं पालकमंत्री केल्याचं झिरवाळांनी म्हटलंय.
दरम्यान, नाशिकमध्ये महायुतीत रस्सीखेच तर रायगडमध्ये शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादीत पालकमंत्रिपदावरून वाद सुरु आहे. नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रिपदाला स्थगिती देण्यात आली आहे. गिरीश महाजन यांना नाशिकचे पालकमंत्री करण्यात आले होते. यामुळे दादा भुसे नाराज झाले. तर, रायगडमध्ये आदिती तटकरे यांना पालकमंत्रिपद दिल्याने एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे भरत गोगावले नाराज झाले होते.
अजित पवारांनी अधिक बोलणं टाळलं
पालकमंत्रिपदाचं वाटप झाल्यानंतर महायुतीमध्ये राष्ट्रवादीतूनच सर्वाधिक नाराजीचा सूर उमटत आहे आपल्याच नेत्यांची नाराजी थोपवणं हे अजित पवारांसमोर आव्हान असणार आहे. त्यामुळे हा आमचा अंतर्गत विषय असल्याचं सांगत अजितदादांनी यावर अधिक बोलणं टाळल्याचे पाहिला मिळाले.
हेदेखील वाचा : Ladki Bahin Scheme News: महायुती सरकारने शब्द पाळला; लाडकी बहीण योजनेचा सातवा हप्ता देण्यास सुरूवात