पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील (Pimpri-Chinchwad City) 87 हजार 456 मालमत्ताधारकांनी (Property Tax) 2023-24 च्या आर्थिक वर्षातील अवघ्या दीड महिन्यात शंभर कोटींचा कर महापालिका (PCMC) तिजोरीत जमा केला आहे. यामधील 70 हजार मालमत्ताधारकांनी (Property Holder) ऑनलाईन कराचा भरणा करून विविध सवलतींचा लाभ घेतला आहे. तसेच नागरिकांनी 30 जूनपूर्वी कर भरुन विविध सवलतींचा लाभ घ्यावा, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.
पिंपरी महापालिकेच्या उत्पन्नाचा मुख्य स्रोत हा मालमत्ता कर आहे. त्यामुळे महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी कराची जास्तीत जास्त वसुली व्हावी, यासाठी निरंतर कर वसुली, सर्वंकष मालमत्ता सर्वेक्षण आणि माहितीचे शुद्धीकरण अशी त्रिसूत्री आखून दिलेली आहे. यानुसार त्रिसूत्रीनुसार कर संकलन व कर आकारणी विभागाचे सहाय्यक आयुक्त नीलेश देशमुख कार्यवाही करत आहेत.
तसेच मालमत्ता धारकांना घर बसल्या सर्व सुविधांचा लाभ घेता यावा, यासाठी गेल्या दीड वर्षात कर संकलनच्या सर्व सुविधा ऑनलाईन, ई-मेलची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. याचबरोबर सारथी हेल्पलाईनमध्ये कर संकलन विभागासाठी 24 बाय 7 सुविधा नागरिकांसाठी उपलब्ध करून दिली आहे. याचाही मोठा फायदा होताना दिसत आहे.
शहरात औद्योगिक, निवासी, बिगर निवासी, मिश्र आणि मोकळ्या जमीन अशा 5 लाख 98 हजार मालमत्ता आहेत. महापालिकेने प्रथमच 2023-24 या आर्थिक वर्षात महिला सबलीकरणाचा हेतू डोळ्यासमोर ठेवून बचत गटांना मालमत्ता कराची बिले वाटप करण्याचे काम दिले आहे. महिला बचत गटांनी शहरातील निम्म्यापेक्षा जास्त मालमत्ता धारकांना घरपोच बिलांचे वाटप आणि माहितीचे अद्ययावतीकरण केले आहे. याचाच परिणाम म्हणून अवघ्या दीड महिन्यात 87 हजार 456 मालमत्ताधारकांनी शंभर कोटी, 72 लाख 36 हजारांचा मालमत्ता कर महापालिका तिजोरीत जमा केला आहे.
याचबरोबर 31 मार्च 2023 अखेर ज्यांची 1 लाखांपेक्षा जास्त थकबाकी होती, अशा 22 हजार मालमत्तांना जप्ती पूर्व नोटीस देण्याचे मिळकत कराच्या बिलाबरोबर देण्याचे काम सुरू आहे. बिलांचे वाटप होताच जप्तीची कारवाई करण्यात येणार असल्याचे सहाय्यक आयुक्त नीलेश देशमुख यांनी सांगितले.
ऑनलाईन कर भरण्याकडे नागरिकांचा वाढता कल
शहरात हिंजवडी, तळवडे या भागात नामांकित आयटी कंपन्या आहेत. या कंपन्यांत अभियंता म्हणून काम करणारे अनेक मालमत्ता धारक ऑनलाईन कर भरण्यास पसंती देत आहेत. त्यामुळेच 87 हजार कर भरणाऱ्या मालमत्ता धारकांपैकी तब्बल 70 हजार 489 मालमत्ता धारकांनी 80 कोटी ऑनलाईन कराचा भरणा केला आहे. 12 हजार 179 मालमत्ता धारकांनी 10 कोटी 59 लाख रुपयांचा कॅशने भरणा केला आहे. विविध ॲपच्या माध्यमातून 1 हजार 238 जणांनी 1 कोटी 5 लाखांचा कर भरला आहे. तर धनादेशाद्वारे 2 हजार 377 जणांनी 6 कोटी 48 लाखांचा भरणा केला आहे.
प्रकल्प सिद्धीच्या माध्यमातून बचत गटाच्या महिला भगिनींनी गेल्या वीस दिवसात निम्म्यापेक्षा जास्त मालमत्तांची बिले वितरीत केली आहेत. बहुतांशी मालमत्तांची माहितीही अपडेट झालेली आहे. याचा वसुलीवर सकारात्मक परिणाम झालेला दिसून येतो. महिला आर्थिक विकास महामंडळ आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिका यांचा हा संयुक्त उपक्रम इतर महापालिकांसाठी आदर्श ठरू शकेल. प्रकल्प सिद्धीच्या पुढच्या टप्प्यांचे नियोजन करण्यात येत आहे. महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने एक वेगळे पाऊल म्हणून याकडे पाहता येईल.
– शेखर सिंह, आयुक्त तथा प्रशासक पिंपरी-चिंचवड महानगरपालिका
कर संकलन विभागाची गेल्या वर्षापासून सक्षम बांधणी करण्यात येत आहे. माननीय आयुक्त यांनी घालून दिलेल्या त्रिसुत्रीनुसार कर संकलन विभाग काम करत आहे. तीन जूनपुर्वी वार्षिक उद्दिष्टाच्या पन्नास टक्के वसुली करण्याचे उद्दिष्ट आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिका विविध घटकांना सर्वाधिक सवलती देणारी पालिका असून या सवलतींचा लाभ घ्यायचा असेल तर नागरिकांनी तीस जूनपूर्वी आपल्या संपूर्ण कराचा भरणा करणे आवश्यक आहे.
– नीलेश देशमुख, सहायक आयुक्त, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका