File Photo : Sunetra Pawar
बारामती : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या राज्यसभेवर नियुक्त झाल्या आहेत. त्यामुळे आता त्या खासदार झाल्या आहेत. त्यात खासदार झाल्यानंतर प्रथमच आज त्यांनी बारामतीमधील सहयोग सोसायटीतील निवासस्थानी भेट दिली. त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांना आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
सुनेत्रा पवार यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, ‘राज्यसभेवर निवड झाल्यानंतर मी पहिल्यांदाच बारामतीत आले. मला माझ्या बारामती लोकसभा मतदारसंघातील सगळ्याच मतदारांचे, जनतेचे आभार मानायचे होते. त्यानिमित्ताने मला त्यांना भेटायचं होतं, यासाठी मी आज या ठिकाणी उपस्थित आहे. सर्वांना भेटून मला आनंद झाला. केंद्रात मंत्रिपद मिळणार का, असं त्यांना विचारल्यावर त्यांनी केंद्रात मंत्रिपद मिळणार की नाही, याबद्दल आपल्याला काहीही कल्पना नाही, असे म्हणत अधिक बोलणं टाळलं.
दरम्यान, माझी आत्ताशी सुरुवात आहे. जनतेच्या ज्या काही अडचणी असतील, मागण्या असतील, त्यांची सेवा करण्याची संधी मला त्यांनी दिलेली आहे. त्यांच्यासाठी मी जास्तीत जास्त प्रयत्न करणार आहे, मला जे योगदान देता येईल, ते मी त्यांच्यासाठी देण्याचा प्रयत्न करेन, असेही त्यांनी म्हटले आहे.