सातारा : गेल्या अनेक दिवसांपासून सातारा लोकसभा उमेदवारीसाठी इच्छुक असलेल्या उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांना अखेर महायुतीकडून भाजपतर्फे उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यामुळे आता साताऱ्यात उदयनराजेंविरूद्ध महाविकास आघाडीच्या शशिकांत शिंदेंमध्ये (Shashikant Shinde) लढत होणार आहे.
भाजपच्या वतीने मी आहेच, असे सांगत राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले यांनी उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीच प्रचाराची पूर्णतः आखणी केली. पहिल्या टप्प्यात प्रभागातील मतदारयाद्यानुसार लोकांशी गाठीभेटी, त्यानंतर संपूर्ण जिल्ह्यामध्ये कार्यकर्त्यांशी संवाद आणि सातारा जिल्ह्यातील प्रमुख गावांमध्ये नागरिकांशी अनौपचारिक चर्चा अशा उपक्रमांवर उदयनराजे यांनी जोर देत मतदारसंघ पिंजून काढायला सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून उदयनराजे भोसले यांनी कोरेगाव तालुक्यात जोरदार शक्तिप्रदर्शनही केले होते.
दरम्यान, भारतीय जनता पार्टीच्या वतीने उमेदवारांच्या काही याद्या प्रसिद्ध झाल्या होत्या. त्यामध्ये उदयनराजेंचे नाव नव्हते. मात्र, आता त्यांना अधिकृतपणे उमेदवारी जाहीर झाली आहे. आता उदयनराजे भोसले आणि राजे समर्थक प्रचारालाही लागले आहेत.