पुणे : अमली पदार्थ तस्करीतील मुख्य सूत्रधार ललित पाटील प्रकरणाचा तपास अतिशय संथ गतीने सुरू असून मुख्य आरोपींवर कडक कारवाई करण्याऐवजी त्यांची पाठराखण केली जात आहे. त्यामुळे राज्य सरकार, पोलीस प्रशासन यांच्या विरोधात आता रस्त्यावर उतरण्याची वेळ आली आहे. या प्रकरणी बुधवारी दि २९ रोजी पोलीस आयुक्त कार्यालयाच्या समोर ठिय्या आंदोलन करणार असल्याची माहिती काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी दिली.
-प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी
ललित पाटील प्रकरणाची सखोल चौकशी अद्याप हाती घेण्यात आली नाही. या पार्श्वभूमीवर आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना धंगेकर यांनी सरकारने या प्रकरणाकडे अधिक गंभीरतेने पहावे. केंद्रीय तपास यंत्रणेकडे याचा तपास द्यावा. या मागण्यांसाठी ठिय्या आंदोलन करत असल्याची माहिती दिली.
-दोषींना पाठीशी
यावेळी आमदार धंगेकर म्हणाले, या प्रकरणात चौकशी समितीच्या अहवालात दोषी आढळून आलेले ससूनचे तत्कालीन अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर यांना केवळ पदमुक्त करण्यात आले आहे. पोलिसांनी मोक्का अंतर्गत कारवाई करून त्यांना अद्याप अटक केली नाही. पैशांची देवाण घेवाण करणारा त्यांचा सहकारी कर्मचारी महेंद्र शेवते यालाही अटक झाली नाही. कारागृह प्रशासनाची कसून चौकशी झाली नाही. एकूणच या प्रकरणी सर्व दोषींना पाठीशी घालण्याचे काम सुरू आहे.
-गृहमंत्र्यांचे या प्रकरणाकडे दुर्लक्ष
गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यात लक्ष घालत नाहीत. त्यांनी लक्ष घातले असते, पोलिसांनी वेळेवर तपास केला असता तर आम्हाला रस्त्यावर उतरण्याची वेळ आली नसती. ललित पाटील हा उघड उघड ससूनमधून ड्रग्जचा धंदा करीत होता. यासाठी त्यानी कोट्यवधी रुपये पोलिसांना, सरकारी अधिकारी, डॉक्टरांना दिले आहेत. म्हणूनच कठोर कारवाई होताना दिसत नाही. ललित पाटील हा गुन्हेशाखेतील एका अधिकार्यांच्या संपर्कात होता. त्या अधिकाऱ्यांसोबत तो व्हिडीओ कॉलवरुन बोलायचा. याचाही तपशील लोकांना समजला पाहिजे.
-हसतमुख पोलीस आयुक्तांनी गंभीर होण्याची गरज
तपास अधिकारी संथ गतीने काम करीत आहेत. त्यांच्यावर सरकारचा दबाव असू शकतो. सखोल चौकशीच्या मागणीसाठी आम्ही पोलीस आयुक्त यांना अनेकदा भेटलो. ते हसतमुख आहेत. या प्रकरणी त्यांनी गंभीर होण्याची गरज आहे. हे प्रकरण पुण्याच्या प्रतिष्ठेच्या, लौकिकाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे आहे. या प्रकरणाच्या माध्यमातून जी कीड पुण्याला होवू पाहत आहे ती नष्ट करणे हे आपले काम आहे.
-अधिवेशनात मुद्दा मांडणार
ललिल पाटील ड्रग्स प्रकरणाबाबत मी हिवाळी अधिवेशनात विषय मांडणार आहे. पुण्यात हुक्का पार्लय, पब, बार अशा अनेक ठिकाणी राजरोसपणे गैरप्रकार चालत आहेत. आंदोलनात पुण्यातील पालकांचा सहभाग असणार आहे. गैरप्रकारामुळे उद्याच्या पिढीचे मोठे नुकसान होत आहे. त्यांचे भविष्य सुरक्षित रहावे यासाठी पालक उत्स्फूर्तपणे या आंदोलनात सहभागी झालेले दिसतील, असेही आमदार रवींद्र धंगेकर यांनी सांगितले.