मिळकतकरात दीड कोटीची वाढती कमाई; फुरसुंगी-उरुळी नगरपरिषद निवडणुकीचा प्रभाव
पुणे : फुरसुंगी आणि उरुळी देवाची नगरपरिषदेकडे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दीड कोटी रुपयांचा मिळकत कर जमा झाला आहे. ही वाढ मुख्यत्वे नगरसेवकपदासाठी इच्छुक उमेदवारांकडून करण्यात आलेल्या करभरणीमुळे झाली असून, येत्या काही दिवसांत ही रक्कम आणखी वाढेल, असा अंदाज नगरपरिषदेचे मुख्याधिकारी प्रशांत शिंगटे यांनी व्यक्त केला.
फुरसुंगी आणि उरुळी देवाची ही नवीच नगरपरिषद असल्याने येथील पहिल्याच निवडणुकीला उत्साहाचे स्वरूप आले आहे. अनेकांनी उमेदवारीसाठी मोर्चेबांधणी केली होती; मात्र अर्जासोबत मिळकत कर बाकी नसल्याचे प्रमाणपत्र आवश्यक असल्याने अनेक इच्छुकांना प्रथम करभरणी करावी लागत आहे. गेल्या काही वर्षांपासून थकबाकीदार राहिलेल्या अनेकांनी उमेदवारी गमावू नये म्हणून लाखो रुपयांचा कर एकरकमी भरला आहे. काहींनी मात्र एवढा खर्च एकाच वेळी करणं परवडणं कठीण असल्याने निवडणूक रिंगणातून माघार घेतली आहे.
दरम्यान, १७ नोव्हेंबर ही अर्ज भरण्याची शेवटची तारीख जवळ आल्याने नगरपरिषद कार्यालयात उमेदवार व कार्यकर्त्यांची गर्दी वाढली आहे. कर भरण्यानंतर प्रमाणपत्र मिळवण्यासाठी कार्यालयाबाहेर लांबलचक रांगा लागत आहेत. इतर वेळी दुय्यम ठरलेला मिळकत कर आता निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रस्थानी आला आहे.
सुट्टीच्या दिवशीही उमेदवारी अर्ज स्वीकारले जाणार
आगामी नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांसाठी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. उमेदवारांना आता ऑनलाईनसोबतच ऑफलाईन पद्धतीनेही नामनिर्देशनपत्र भरण्याची परवानगी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे, शनिवार आणि रविवारसह सुट्टीच्या दिवशीही उमेदवारी अर्ज स्वीकारले जाणार आहेत.
ऑफलाईन पद्धतीने नामनिर्देशनपत्रास मंजुरी
राज्यातील २४६ नगरपरिषदा आणि ४२ नगरपंचायतींच्या सदस्यपदांसह थेट अध्यक्षपदांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी राज्य निवडणूक आयोगाने ऑनलाईन नामनिर्देशनपत्र भरण्याची सुविधा आधीच उपलब्ध करून दिली होती. मात्र, अनेक राजकीय पक्ष आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने नामनिर्देशनपत्र सादर करण्याची मागणी सातत्याने करण्यात येत होती.
हेदेखील वाचा : Local Body Election 2025 : नगरपरिषद-नगरपंचायत निवडणुकांसाठी नामनिर्देशन प्रक्रियेत बदल; ऑफलाइन अर्जाची सुविधा






