नगरपरिषद- नगरपंचायत निवडणुकांसाठी नामनिर्देशन प्रक्रियेसाठी ऑफलाइन अर्जाचीही सुविधा
Local Body Election 2025: आगामी नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांसाठी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. उमेदवारांना आता ऑनलाईनसोबतच ऑफलाईन पद्धतीनेही नामनिर्देशनपत्र भरण्याची परवानगी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे, शनिवार आणि रविवारसह सुट्टीच्या दिवशीही उमेदवारी अर्ज स्वीकारले जाणार आहेत.
राज्य निवडणूक आयोगाने सर्व निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना या संदर्भात आदेश जारी केले आहेत. राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायती, तसेच थेट अध्यक्षपदांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नामनिर्देशन प्रक्रियेत केलेला हा बदल उमेदवारांना मोठी दिलासा देणारा ठरणार आहे.
Maharashtra Politics: ‘या’ जिल्ह्यात भाजपमध्ये अंतर्गत नाराजी;
राज्यातील २४६ नगरपरिषदा आणि ४२ नगरपंचायतींच्या सदस्यपदांसह थेट अध्यक्षपदांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी राज्य निवडणूक आयोगाने ऑनलाईन नामनिर्देशनपत्र भरण्याची सुविधा आधीच उपलब्ध करून दिली होती. मात्र, अनेक राजकीय पक्ष आणि इच्छूक उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने नामनिर्देशनपत्र सादर करण्याची मागणी सातत्याने करण्यात येत होती.
या मागणीचा क्षेत्रीय पातळीवर आढावा घेतल्यानंतर आयोगाने महत्त्वाचा निर्णय घेत ऑफलाईन पद्धतीनेही नामनिर्देशनपत्र दाखल करण्यास परवानगी दिली आहे. यासोबतच सुट्टीच्या दिवशीही दुपारी ३ वाजेपर्यंत अर्ज स्वीकारले जाणार आहेत.
नामनिर्देशनपत्र आणि शपथपत्र दाखल करण्याची अंतिम मुदत १७ नोव्हेंबर २०२५, दुपारी ३ वाजेपर्यंत निश्चित करण्यात आली आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या या निर्णयामुळे इच्छूक उमेदवारांना मोठा दिलासा मिळाला आहे.
दरम्यान, राज्यातील २४६ नगरपरिषद आणि ४२ नगरपंचायतींच्या सदस्यपदांसह थेट अध्यक्षपदाच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी नामनिर्देशनपत्र दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. पहिल्याच दिवशी ६६४ उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने नोंदणी पूर्ण केल्याची माहिती राज्य निवडणूक आयोगाने दिली.
नगरपरिषद-नगरपंचायत निवडणुकीसाठी शिवसेनेचे प्रभारी जाहीर;
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी उमेदवारांना नामनिर्देशनपत्र आणि शपथपत्र दाखल करण्यासाठी आयोगाने https://mahasecelec.in हे विशेष संकेतस्थळ विकसित केले आहे. या संकेतस्थळावर नोंदणी करून नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकांसाठी नामनिर्देशनपत्र भरण्याची सुविधा उपलब्ध आहे.
एका नोंदणीद्वारे संबंधित प्रभागातील एका उमेदवारास चार नामनिर्देशनपत्रे भरता येतात. ऑनलाइन फॉर्म पूर्ण केल्यानंतर त्याची मुद्रित प्रत काढून स्वाक्षरीसह संबंधित निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे विहित मुदतीत प्रत्यक्ष जमा करणे बंधनकारक आहे.






