मुंबई : लोकसभा निवडणुकीपूर्वी शिखर बँक घोटाळ्याप्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मोठा दिलासा मिळाला होता. मात्र या घोटाळ्याप्रकरणी त्यांच्या अडचणीत वाढण्याची शक्यता आहे. कारण आर्थिक गुन्हे शाखेने दाखल केलेल्या अतिरिक्त क्लोजर रिपोर्टवर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आक्षेप घेतला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे हे शिखर बँक घोटाळा प्रकरणातील क्लोजर रिपोर्टला विरोध करणार आहेत. यासंदर्भात अण्णा हजारे हे कोर्टात देखील धाव घेणार आहेत. अतिरिक्त क्लोजर रिपोर्टवर आक्षेप हा अण्णा हजारे आणि माणिकराव जाधव यांनी घेतला आहे.
याप्रकरणी न्यायालयाने देखील हा आक्षेप मान्य केला असल्याने यावर निषेध याचिका दाखल करण्यास वकिलांना वेळ दिला आहे. अशातच आता या संदर्भात पुढील सुनावणी ही 29 जूनला होणार आहे. तसेच यासंदर्भात मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने अजित पवार आणि इतरांना क्लीन चिट दिली आहे. त्यामुळे आता मुंबई पोलिसांच्या या निर्णयावर देखील न्यायालय सखोल अभ्यास करणार आहे.