फोटो - सोशल मीडिया
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक घडामोडी घडत आहेत. सत्ताधारी आणि विरोधकांकडून एकमेकांवर टीकाटिप्पणी केली जात आहे. असे असताना आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सत्ताधारी भाजपवर टीका केली. ‘भाजपकडे सध्या काही काम नाही आहे, भाजप भ्रमिष्ट पक्ष आहे. त्यांचे सरकार आल्यापासून महिलांवरील, अल्पवयीन मुलींवरील अत्याचारात वाढ झाली आहे’, असे ते म्हणाले.
हेदेखील वाचा : Good News ! राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनाही केंद्रीय कर्मचाऱ्यांप्रमाणे नवी पेन्शन योजना
संजय राऊत यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध मुद्यांवर भाष्य केले. ते म्हणाले, ‘आंदोलन करणारे भाजपचे कार्यकर्ते नाहीत तर पगारी वर्कर आहेत. त्यांच्या सरकारमध्ये दोन असे मंत्री आहेत. ज्यांच्यावर थेट अशा प्रकारचे आरोप आहेत. नुसते आरोप नाहीत तर त्या महिलांनी आत्महत्या केली. त्यांचा राजीनामा उद्धव ठाकरे यांनी घेतला होता. पण आता तेच त्यांच्या सरकारमध्ये आहेत. ठाकरे कुटुंब हे महाराष्ट्रातील लोकप्रिय कुटुंब आहे. महाराष्ट्रातील लोकांचा विश्वास त्यांच्यावर आहे. यातून तुमचेच मुखवटे गळून पडतील. ठाकरे कुटुंबावर असे आरोप करणे म्हणजे सूर्यावर थुंकण्यासारखे आहे’.
…हा पोलिसावरचा नाही तर देवेंद्र फडणवीस यांच्यावरचा हल्ला
पुण्यात रविवारी पोलिसावर हल्ला करण्यात आला होता. त्यावर संजय राऊत म्हणाले, ‘हा पोलिसावरचा नाही तर देवेंद्र फडणवीस यांच्यावरचा हल्ला आहे. त्यांनी राजीनामा द्यावा. त्यांचे पोलीस सुरक्षित नाहीत. ते आम्हाला सांगतात की, ते आमच्या बहिणीचं रक्षण करतील. पुण्यात सर्वात जास्त अंमली पदार्थाचा व्यापार आणि व्यवहार होतो. ललित पाटील प्रकरणातील सूत्रधार कोण आहे हे आपण पाहिलेला आहे. पोलीस यंत्रणा कशी विकली गेली हे देवेंद्र फडणवीस यांना माहित नाही का? पुण्याचे पालकमंत्री नेमके काय करत आहेत, जे गुलाबी कपड्यात फिरत आहेत’.
वसंत चव्हाण इतक्या लवकर सोडून जातील वाटलं नाही
नांदेडचे खासदार वसंत चव्हाण यांच्या निधनावर त्यांनी शोक व्यक्त केला. ते म्हणाले, ‘हुकूमशाहीचा पराभव व्हावा. नांदेडला लागलेल्या गद्दारीचा जो डाग होता तो धुवून काढण्यासाठी त्यांची प्रकृती बरी नसताना देखील ते उभे राहिले आणि नांदेडच्या जनतेने त्यांना पूर्ण पाठिंबा दिला. वसंत चव्हाण इतक्या लवकर आम्हाला सोडून जातील असे वाटले नव्हते. आम्ही सर्व शिवसेना परिवारत्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी आहोत. काँग्रेसचा एक सच्चा कार्यकर्ता हुकुमशाही विरुद्ध उभा राहिला आणि तो जिंकला पण दुर्दैवी आजाराने ग्रस्त झाले त्यांचे निधन झाले’.