फोटो - टीम नवराष्ट्र
मुंबई : देशभरामध्ये 78 वा स्वातंत्र्यदिन साजरा केला जात आहे. जल्लोषपूर्ण वातावरणामध्ये सर्वत्र ध्वजारोहण केले जात आहे. राज्यामध्ये सर्व शासकीय इमारतींना विद्युत रोषणाई करण्यात आली असून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, अधिकारी आणि पालकमंत्री यांच्या हस्ते ध्वजारोहण केले जात आहे. दिल्लीच्या लाल किल्लावरुन यंदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 11 व्यांदा ध्वजारोहण केले. यानंतर आता ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी मोदीवर निशाणा साधला आहे. काश्मीरचे 370 कलम, जवांनाचे बलिदान अशा अनेक मुद्द्यांवर संजय राऊतांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे.
काय म्हणाले संजय राऊत?
मुंबईमध्ये माध्यमांशी संवाद साधताना संजय राऊत म्हणाले, लाल किल्ल्यांवर मोदी मागील 10 वर्षांपासून ध्वजारोहण करत आहे. मात्र 10 वर्षात प्रथमच राहुल गांधी या सोहळ्याला उपस्थित होते. गेल्या 10 वर्षातील सोहळा आणि आताचा सोहळा पाहा. 10 वर्षांपासून गुदमरलेल्या अवस्थेत सुरू आहे. आज त्यांना प्रधानमंत्री असल्यामुळे तिरंगा फडकवावा लागतो आहे. मात्र मोदी ज्या पक्षाचे नेतृत्व करतात, ते तिरंगा हा राष्ट्रध्वज मानायला तयार नाही. स्वातंत्र्याच्या रक्षणासाठी जनता जागृत आहे. असा धक्कादायक दावा खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
370 कलम हटवून जम्मू काश्मीरमध्ये काय सुधारणा झाली?
पुढे त्यांनी जवानांचे बलिदान मोदी सरकार थांबवू शकलेले नाही असे म्हणत मोदींवर निशाणा साधला. खासदार राऊत म्हणाले, 78 वा स्वातंत्र्य दिन होत असताना जवानाचं बलिदान झाले. 10 वर्षात जवानांच बलिदान रोखू शकले नाहीत. कॅम्पटन सहित 2 जवान यांचं बलिदान झालं यावर मोदी चर्चा करणार का? आता पर्यंत 17 हल्ले झाले यामध्ये 50 पेक्षा जास्त जवान घायाळ झाले आहेत. आज देखील मोदी भाषण करतात, आणि तिकडे रक्ताचे सडे पडतात ही अभिमानाची गोष्ट नाही. 370 कलम हटवून जम्मू काश्मीरमध्ये काय सुधारणा झाली? 370 कलम हटवून तुम्हाला फायदा झाला. जनतेला काय फायदा झाला? असा सवाल खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे.