कोरटकरला अटक झाल्यावर इंद्रजीत सावंत यांची पहिली प्रतिक्रिया (फोटो सौजन्य-X)
Indrajit Sawant on prashant koratkar In Marathi: इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना धमकावणारा आणि छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करणारा प्रशांत कोरटकर याला अखेर पोलिसांनी अटक केली आहे. याचदरम्यान आता कोरटकरला समर्थन देणाऱ्यांची नावं महाराष्ट्रासमोर आली पाहिजे, अशी प्रतिक्रिया कोरटकरला अटक झाल्यावर इंद्रजीत सावंत यांनी दिली आहे.
इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना धमकी दिल्यानंतर प्रशांत कोरटकर हा 25 फेब्रुवारीपासून फरार होता. प्रशांत कोरटकरने छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. नागपुरातून फरार झालेला कोरटकर हा चंद्रपूरमध्ये लपून बसला होता. कोल्हापूर पोलिस त्याला अटक करण्यासाठी गेले असता त्या ठिकाणाहूनही तो फरार झाला होता. प्रशांत कोरटकरला आता एका महिन्यानंतर तेलंगणामधून अटक केली आहे. त्या ठिकाणी नोंद केल्यानंतर कोल्हापूर पोलिस त्याला ताब्यात घेतील.
इंद्रजीत सावंत यांनी कोरटकर विरोधात जुना राजवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. कोल्हापूर जिल्हा व सत्र न्यायालयाने त्याचा अटकपूर्व जामीनअर्ज रद्द केल्याने जुना राजवाडा पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला होता. अटकेच्या भीतीने तो दुबईला पळाल्याची चर्चा शनिवारी सकाळपासून प्रसार माध्यमांमध्ये सुरू होती. दुबईतील त्याचे काही फोटोही व्हायरल झाले होते. यावरून अधिवेशनात विरोधकांनी सरकारला धारेवर धरले.
यावेळी “ज्या व्यक्तींनी कोरटकरला वाचविण्याचा प्रयत्न केला त्यांचा चेहरा महाराष्ट्राच्या जनतेसमोर यायला हवे. तसेच वकिलांनी न्यायालयात बाजू चांगली मांडली त्यामुळे कोरटकरला वाचविणाऱ्यांनी त्याला सांगितले असेल की आता तुझ्यासमोर कोणताही पर्याय नाही,” असं देखील इंद्रजीत सावंत यांनी म्हटले आहे.