जयंत पाटलांच्या गुप्त हालचाली; बंद दाराआड चंद्रशेखर बावनकुळेंसोबत एक तास चर्चा
महायुती सरकारला पूर्ण बहुमत मिळाल्यानंतर आता राज्यात स्थिर सरकार येईल असं वाटलं होतं. मात्र उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज आहेत. तर दुसरीकडे ऑपरेशन टायगर सुरू आहे. त्यातच आता राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची मध्यरात्री भेट घेतली. या भेटीत दोघांमध्ये एक तास चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. बावनकुळेंच्या मुंबईतील बंगल्यावर ही भेट घेतली असून यावेळी भाजपचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हदेखील उपस्थित होते, अशी माहिती आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात मोठं काहीतरी घडणार अशा चर्चांना उधाण आलं आहे.
मात्र ही भेट रात्री 8 वाजता झाली आणि ती मतदारसंघातील कामासंबंधी होती अशी प्रतिक्रिया जयंत पाटील यांनी दिली. तर जयंत पाटलांनी घेतलेली ही भेट व्यक्तिगत कामासाठी असल्याचं बावनकुळेंनी सांगितलं.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जयंत पाटील यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची मंगळवारी त्यांच्या मुंबईतील बंगल्यावर भेट घेतली. त्यावेळी भाजपचे नेते आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हेदेखील उपस्थित होते. या तिघांमध्ये एक तासाहून अधिक काळ चर्चा झाल्याची माहिती आहे.
या भेटीवर जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, माझ्या मतदारसंघात महसूल विभागाशी संबंधित काही कामांसाठी आपण बावनकुळेंची भेट घेतली. त्यांना वेगवेगळ्या विषयांची निवेदनं दिली.
जयंत पाटील शांत-शांत
मस्साजोगचे प्रकरण असो वा साहित्य संमेलनातील वाद असो, राज्यात एवढ्या मोठ्या घडामोडी घडत असताना जयंत पाटील मात्र त्यावर कोणतीही प्रतिक्रिया देत नाहीत. जयंत पाटील हे राष्ट्रवादी शरद पवार यांच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत. तरीही ते कोणत्याही घडामोडीवर प्रतिक्रिया देत नाहीत. त्यामुळेच ते भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू आहे.
अजित पवार यांनी ज्यावेळी शरद पवारांची साथ सोडली त्यावेळी जयंत पाटील हे आपल्यासोबत यावेत असं अजित पवार यांना वाटत होतं. पण जयंत पाटील यांनी शरद पवार यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला. मात्र विधानसभा निवडणुकीनंतर मात्र जयंत पाटील यांच्या प्रदेशाध्यक्षपदावर प्रश्न उपस्थित केला गेला. त्यामुळे जयंत पाटील यांची कुचंबना होत असल्याची चर्चा आहे.
यावर अजित पवार गटाचे प्रवक्ते अमोल मिटकरी म्हणाले की, “काही दिवसांपूर्वी राजारामबापू पाटील कारखान्याच्या कार्यक्रमामध्ये नितीन गडकरी आले होते. त्यावेळीही त्यांची देहबोली सगळं काही सांगत होती. राष्ट्रवादी शरद पवार गटामध्ये असलेल्या अंतर्गत गटबाजीमुळे जयंत पाटील हे अस्वस्थ आहेत. त्यामुळे जयंत पाटील यांनी जर असा काही निर्णय घेतला तर त्यावर काही आश्चर्य वाटणार नाही.”