कुठेतरी शंकेची पाल चुकचुकतेय! संतोष देशमुख खटल्यात उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीवर जितेंद्र आव्हाडांचा संशय
बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणाच्या खटल्यात विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची नियुक्ती झाली. यावरून विरोधकांकडून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत असतानाच, माझ्या कर्तव्यात कोणीही अडथळा ठरू शकत नाही, असे ठणकावून सांगत असतानाच, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी या नियुक्तीवर महायुती सरकारच्या धुर्तपणावर खोचक प्रतिक्रिया दिली.
जितेंद्र आव्हाड म्हणाले, “उज्ज्वल निकम यांच्या वकिली व्यवसायाबद्दल काही बोलायचं नाही. पण ते भाजपच्या (BJP) जवळचे आहे. त्यांनी भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती. सरकार भाजपचे आहे. याप्रकरणामध्ये ज्यांचे नाव घेतले जात आहे, ते मंत्री आहे. राज्यातील महायुती सरकारच्या मंत्रिमंडळात ते आहेत. अशा परिस्थिती त्यांना सरकारी वकील म्हणून नियुक्त करणे म्हणजे, मनात शंकेची पाल चुकचुकतेय!”
बीडमधील (BEED) संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा खटला चालवण्यासाठी विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात यावी अशी मागणी देशमुख कुटुंबियांसह भाजप आमदार सुरेश धस यांनी लावून धरली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तसा निर्णय घेतला. परंतु या निर्णयावर आता विरोधकांनी शंका उपस्थित केल्या आहेत.
विरोधकांनी उपस्थित केलेल्या शंकांवर उज्ज्वल निकम यांनी देखील जोरदार प्रतिहल्ला करत उत्तर दिलं आहे. “मस्साजोग ग्रामस्थांनी आता उपोषण सोडावे. या देशात कायदा आणि न्याय सर्वोच्च आहे. तपास यंत्रणा जेव्हा आरोपपत्र सादर करतील. त्यावेळी आम्ही हा खटला तातडीने चालवण्यास घेऊ, त्यावेळी कुणीही माझ्या कर्तव्यात अडथळा ठरू शकत नाही”, असे निकम यांनी स्पष्ट केले.
अंधारे म्हणतात, ‘हे विसरून चालणार नाही’
विशेष सरकार वकिल म्हणून उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी काही गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. उज्ज्वल निकम यांच्या मुलानेच धनंजय मुंडे यांची केस लढली होती, हे विसरता येणार नाही. उज्ज्वल निकम यांनी भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढली. दहा वर्षापैकी साडेसात वर्ष त्याच भाजपचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस राहिले आहेत. आणि ते गृहमंत्री असतानाच परळी किंवा बीडमध्ये पोलिसांचा हैदोस चालू असतो, हे विसरताच येणार नाही. देशमुख हत्या प्रकरणातील पोलिस अधिकाऱ्यांना बडतर्फ केलेले नाही, याकडे सुषमा अंधारेंनी लक्ष वेधत निशाणा साधला.