कल्याण : पटेरी वाघ सदृश्य कातडी, एक पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसांसह दोन जणांना कल्याण क्राईम ब्रांच पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. सिताराम नेरपगार आणि ब्रीजलाल पावरा अशी या दोघांची नावे आहेत. ४० लाख रुपयांत या वस्तू ते विकण्यासाठी आले होते. कल्याण न्यायालयाने या दोघांना २७ जानेवारीपर्यंत या दोघांना पोलीस कोठडी सुनावली आहे.
कल्याण क्राईमब्रांच युनिट टीमचे पोलीस कर्मचारी दत्ताराम भोसले यांना माहिती मिळाली होती की, डोंबिवलीत पटेरी वाघ सदृश्य कातडे, देशी पिस्तूल आणि जिवंत काडतूस विकण्यासाठी दोन तस्कर येणार आहेत. मिळालेल्या माहितीवरुन वरिष्ठ पोलीस निरिक्षक नरेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी संदीप चव्हाण, पोलीस कर्मचारी दत्ताराम भोसले, बाळाराम शिंदे, जितेंद्र नवसारे, अनुप कामत, विनोद चन्ने, विलास कडू या पोलीस पथकाने कल्याण शीळ रस्त्यावरील क्लासीक हॉटेलच्या पार्किंगमध्ये सापळा लावला. दोघांना अटक करण्यात आली आहे.
यामधील सिताराम नेरपगार हा तुळजाभवानीनगर जळगाव येथे राहणारा आहे. ब्रीजलाल पावरा हा शिवपूर धुळे येथे राहणारा आहे. या दोघांकडून ४२ लाखाचा ऐेवज हस्तगत केले आहे. त्यामध्ये एका चार चाकी गाडीचा समावेश आहे. या दोघांनी पटेरी वाघ सदृश्य कातडी कुठून आणली. याचा तपास पोलीस करत आहेत. या दोघांना कल्याण न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोघांना २७ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.