KDMC News : मुंबई आणि उपनगराला पावसाने अक्षर: झोडपून काढलं आहे. सततच्या पावसाने जनजीवन विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळत आहे. अश्यातच आता कल्याण डोंबिवली मनपा परिसरात नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. कल्याण पूर्व पावशे नगर परिसरातील मुख्यरस्ता पुनालिंक रोड यासाठी गटार तुंबल्याने दुषित पाणी रस्त्यावर येत असून आजूबाजूच्या दुकांनाना आणि रस्त्याने चालणाऱ्या नागरिकांना याचा मनस्ताप होत असल्याचं दिसून येत आहे. गेले तीन महिन्यापासून या परिसरातील नागरिक आणि दुकान मालक हैराण झाले असून वारंवार पालिकेकडे निवदेन देऊनही या समस्येवर पालिकेने ठोस उपाययोजना अजूनही केली नसल्याचं नागरिकांनी सांगितलं आहे.
काही दिवसांपूर्वी पालिकेच्या कर्मचारी येऊन पाहणी केली. त्यावेळी चेंबरमध्ये पाण्याच्या बाटल्या,प्लास्टिक आणि इतर अडकून पडल्याने पाण्याला जायला मार्ग नाही. नागरिकांनी पालिकेच्या कर्मचाऱ्यांना साफ करुन देण्यास सांगितलं. फोनवर देखील वारंवार तक्रार दाखल केली होती. सततचा कचरा अडकून पडल्याने पाण्याचा मार्ग बंद झाला आहे. त्यामुळे रस्ता खणून काम करावं लागेल. त्यासाठी बांधकाम विभागाला अर्ज करा. आम्ही यात काही करु शकत नाही, असं पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी सांगितलं आहे. पावशे नगर परिसरातील हा रस्ता मुख्य रस्ता असून कर्जत,बदलापूर आणि पुण्याला जोडणारा हा मुख्य रस्ता असल्याने मोठ मोठ्या वाहनांची या ठिकाणी कायमच वर्दळ असते. या गटाराच्या पाण्याचं रस्यावरुन वाहण्याचं प्रमाण इतकं वाढलं आहे की, रस्त्याला नाल्याचं स्वरुप आलं आहे. या दुषित पाण्यामुळे रोगराईचं प्रमाण देखील वाढत आहे. या सगळ्याकडे पालिकेचं दुर्लक्ष असून जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न होत आहे. नागरिकांना पालिकेला रितसर निवेदन दिलं, त्याशिवाय पालिकेच्या अधिकृत व्हॉट्सअॅप नंबरवरुन तक्रार दाखल करुनही दखल घेतली जात नाही आहे. त्यामुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलं आहे. पालिकेने कोणत्याही प्रकाराची दखल न घेतल्याने आमदार सुलभा गायकवाड यांच्याकडे स्थानिकांनी समस्या मांडली मात्र आमदार गायकवाड यांनी देखील दखल न घेतल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
ही समस्या फक्त पांडुरंग पावशेनगरच्या मुख्य रस्त्य़ाचीच नाही तर हाच रस्ता पुढे विठ्ठलवाडी रेल्वेस्थानकाला जोडतो. विठ्ठलवाडी स्मशानभूमी परिसरात उल्हास नदी पात्रात मोठं कंस्ट्रक्शनचं काम सुरु आहे. त्यामुळे नदीचं पाणी अडलं जात असून रस्त्यला असलेल्या चिखलामुळे आणि घाणीच्या साम्राज्यामुळे माणसांना रस्त्याने चालणं देखील कठीण झालं आहे. याकडे देखील पालिका डोळेझाक करत असून परिसरातील नागरिकांना रोजचा घाणीचा त्रास सहन करावा लागत आहे. पालिकेचं कल्याण पूर्व परिरात मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष होत असल्याचं यातून स्पष्ट होत आहे. आधीच पावसाळा त्यात घाणीचं साम्राज्य यामुळे रहिवाशी जीव मुठीत घेऊन जगत आहे. मात्र कल्याण डोबिंवली महानगर पालिकेच्या अधिकाऱ्यांना याची काहीच माहिती नसणं हे पालिकेच्या नाकर्तेपणावर शिक्कामोर्तब करत आहे.