या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन आणि सरस्वती पूजनाने करण्यात आली. या प्रकाशन सोहळ्याचे अध्यक्ष अजय कांडर यांनी ‘नीलकांचन’च्या निर्मिती प्रक्रियेचा प्रवास उलगडून दाखवत पुस्तकामागची भूमिका स्पष्ट केली. प्रमुख पाहुण्या डॉ. निर्मोही फडके यांनी संपूर्ण पुस्तकाचा रसाळ आढावा घेतला. पल्लवी शिंदे-माने यांच्या लेखनातील सौंदर्य आणि त्यांची विलक्षण लेखन प्रतिभा कशा प्रकारे वाचकप्रिय ठरेल, याचे सविस्तर विश्लेषण निर्मोही फडके यांनी केले.
याप्रसंगी अभिनेते आणि कलाशिक्षक पांडुरंग भारती यांनी लेखिकेच्या लेखणीचे कौतुक करत त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. मराठी आणि हिंदी चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक विजय शिंदे यांनीही लेखिकेच्या साहित्याचा आणि त्यांच्या एकूण कार्याचा गौरवपूर्ण आढावा घेतला. रुपाली शेंडगे यांच्या प्रभावी सूत्रसंचालनाने या सोहळ्याला एक वेगळीच उंची प्राप्त करून दिली. शिंदे-माने परिवाराच्या साक्षीने पार पडलेल्या या सोहळ्याला मित्रपरिवार आणि साहित्यप्रेमींनी मोठी गर्दी केली होती. यावेळी अंकिता काटकर यांनी सर्वांचे आभार मानले.






