बारामती: राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त दिनांक 25 जून रोजी बारामती मध्ये आयोजित करण्यात आलेल्या सन्मान सोहळ्यासाठी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या हे विशेष अतिथी म्हणून येणार असून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमास विरोधी पक्ष नेते अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, विधान परिषदेचे सभापती रामराजे- नाईक निंबाळकर, काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात, राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर आदींसह इतर मान्यवर उपस्थित राहणार असल्याची माहिती अहिल्या विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विश्वासराव देवकाते यांनी दिली.
कर्नाटकच्या मुख्यमंत्री पदाची नव्याने शपथ घेतलेले सिद्धरामय्या हे धनगर समाजातील असून त्यांना समाजभूषण या पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी अहिल्या विकास प्रतिष्ठानच्या माध्यमातून जयंती सोहळा दरवर्षी आयोजित करण्यात येतो. या जयंती सोहळ्या निमित्त दरवर्षी विविध क्षेत्रातील मान्यवरांना विशेष पुरस्काराने गौरवण्यात येते. यावर्षी समाजभूषण पुरस्काराने कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना गौरवण्यात येणार आहे. या सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून कर्नाटकचे अर्बन डेव्हलपमेंट कॅबिनेट मंत्री बी. एस सुरेश, कर्नाटकचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आर. व्हि. देशपांडे यांच्यासह राज्यातील इतर विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. अहिल्यादेवी जयंती निमित्त दि २५ जून रोजी अहिल्यादेवीच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक सकाळी 11 वाजता काढण्यात येणार आहे. यानंतर दुपारी तीन वाजता पुरस्कार सन्मान सोहळा संपन्न होणार आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या प्रथमच बारामतीत येणार आहेत. नुकत्याच झालेल्या कर्नाटकच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसला मिळालेल्या अभूतपूर्व यशानंतर कर्नाटकच्या मुख्यमंत्री पदाची जबाबदारी त्यांच्यावर देण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार व सिद्धरामय्या या निमित्ताने एका व्यासपीठावर येणार असल्याने ते नक्की काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.