सातारा : पावसाळ्यात कास, बामणोली, ठोसेघरसह महाबळेश्वर व पाचगणी परिसरात पर्यटक मोठ्या प्रमाणात येत असतात. यामध्ये काही उत्साही पर्यटक हुल्लडबाजी करतात. काही वेळेस ही हुल्लडबाजी त्यांच्याच अंगलट येते. त्याचा रोष मात्र, जिल्हा प्रशासनावर काढला जातो. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने आता पावसाळी पर्यटनासाठी येणाऱ्या अतिउत्साही पर्यटकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी कडक भूमिका घेतली आहे. अशा पर्यटकांविरोधात मोहीम हाती घेताना त्यासाठी विशेष पथकेही नेमली जाणार आहेत.
सातारा जिल्ह्यातील पर्यटन स्थळांना भेटी देण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. पावसाळ्यातही पर्यटक साताऱ्यात येऊन निसर्गाचा आनंद घेतात. यामध्ये कास, बामणोली, ठोसेघर, वाई, महाबळेश्वर व पाचगणी या ठिकाणांना पर्यटक मोठ्या संख्येने भेट देतात पण गेल्या काही वर्षांपासून या पर्यटकांमध्ये काही हुल्लडबाज व अतिउत्साही पर्यटकांमुळे अनेक छोट्या मोठ्या दुर्घटना घडल्या आहेत. ज्यातून अनेकांना जीव गमवावा लागला आहे. पर्यायाने याचा ठपका जिल्हा प्रशासन व पोलिसांवर पडत आहे. पावसाळ्यात या ठिकाणांकडे जाणाऱ्या रस्त्यावर दरडी कोसळणे, रस्त्यावर पाणी साचणे, रस्ता घसरडा होणे, लॅण्ड स्लाईडिंग असे प्रकार होतात. यामुळे पर्यटकांचा जीव धोक्यात येऊ शकतो.
जिल्हा प्रशासन घेणार कडक भूमिका
काही तरुण पर्यटक निसर्गाचा आस्वाद घेताना अतिउत्साहाच्या भरात धोकादायक पाऊल उचलतात. त्यामुळे यातून अनेकांना जीव गमवावा लागतो. अशा उत्साही पर्यटकांवर रोख लावण्यासाठी आता जिल्हा प्रशासन कडक भूमिका घेत मोहीम हाती घेणार आहे. यामध्ये प्रत्येक पर्यटन स्थळाच्या ठिकाणी अशा अतिउत्साही पर्यटकांवर वॉच ठेवला जाणार आहे. त्यासाठी महसूल व पोलिस यंत्रणेचा वापर केला जाणार आहे.
अतिउत्साही युवकांवर कारवाई गरजेची
कास पठारावर पावसाळ्यात येणाऱ्यांची संख्या ही वाढली आहे. यामध्ये दुचाकीवरून येणाऱ्या अतिउत्साही रायडर्सचाही समावेश आहे. काही जण तर मद्यधुंद अवस्थेत गाड्या चालवताना दिसतात पण पोलिसांचा तपासणी नाका रात्रीच्या वेळी नसल्याने अशा अतिउत्साही युवकांवर कारवाई होत नाही. याबाबतही पोलिस प्रशासनाने भूमिका घेणे गरजेचे आहे.