मुंबई : मध्य रेल्वेवर (Central Railway) बहुप्रतीक्षित नेरुळ-बेलापूर-उरण लोकल कॉरिडोरवर (Nerul-Belapur-Uran Local Corridor) प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आणखी काही महिने वाट पहावी लागणार आहे. खारकोपर ते उरणपर्यंत लोकल ट्रॅक (Kharkopar To Uran Local Track) प्रकल्प सप्टेंबर २०२२ पर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य रेल्वे प्रशासनाने ठेवले होते; परंतु, सिडकोकडून (Cidco) वेळेवर निधी (Fund) उपलब्ध न झाल्यामुळे या प्रकल्पाला उशीर होत आहे.
खारकोपर-उरण लोकल कॉरिडोरचे ७५ टक्क्यांहून अधिक काम पूर्ण झाले आहे. मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी सांगितले की, जीएम अनिल कुमार लाहोटी यांच्या मार्गदर्शनावर या चौथ्या कॉरीडोरचे काम वेगाने सुरू आहे. परंतु, सिडकोकडून त्यांच्या वाट्याचा निधी वेळेवर उपलब्ध होत नसल्यामुळे कामावर परिणाम पडत आहे. वेळेवर निधी पुरवला तर मार्च २०२३ पर्यंत हे काम पूर्ण करण्याचे लक्ष्य आहे. या प्रकल्पचा ६७ टक्के वाटा सिडकोचा असून ३३ टक्के रेल्वेचा आहे. सिडकोद्वारे भूसंपादनानंतर काम वेगाने सुरू झाले आहे. उरणपर्यंत टेकडी परिसर असल्यामुळे काम करणे कठीण जात आहे.
न्हावा शेवा बंदराला थेट लोकलशी जोडणार
नेरुळ आणि खारकोपर-उरण हा एकूण २७ किमीचा दुहेरी मार्गाचा रेल्वे कॉरिडॉर आहे. १२.४० किमीचा पहिला टप्पा ११ नोव्हेंबर २०१८ रोजीच उघडण्यात आला. खारकोपर-उरणपर्यंतच्या १४.६९ किमी मार्गावर काम सुरू आहे. मुंबई ते उरण आणि न्हावाशेवा बंदर थेट लोकलला जोडण्याच्या दिशेने हे मोठे पाऊल ठरणार आहे. या मार्गावर पनवेल-जसई-जेएनपीटी क्रॉसिंग लाइनही आहे.
चौथ्या कॉरिडोरवर १० स्थानके
मध्य रेल्वेच्या या चौथ्या कॉरिडॉरवर १० स्थानके आहेत. त्यामध्ये नेरूळ ते खारकोपर लोकल धावत आहेत. पुढील काम गव्हाण, रांजणपाडा, नवा शेवा, द्रोणागिरी आणि उरण स्थानकावर सुरू आहे. भूयारी मार्ग, पूल, उरणमधील पुलावर गर्डर टाकून खाली उतरवण्याची कामे सुरू आहेत. खारकोपर-उरण विभागात ५ स्थानके, २ मोठे पूल, ४६ छोटे पूल, ४ पुलाखालील पूल आणि ४ ओव्हर ब्रीज बांधले जात आहेत. सिडकोमार्फत निधी मिळण्यास विलंब होत असल्याने प्रकल्पाच्या कामावर परिणाम होत आहे.