गावांमध्ये खारे पाणी प्याल्यामुळे किडनीचे आजार (संग्रहित फोटो)
अकोला : अकोल्यातील बाळापूर मतदारसंघात 60 पेक्षा अधिक गावात खारे पाणी प्यायल्यामुळे अनेकांना किडनीशी संबंधित समस्या उद्भवत असल्याचे समोर आले आहे. इतकेच नाही तर अनेकांच्या किडनीवरही परिणाम झाल्याचे सांगण्यात येत आहे. एक-दोन नव्हेतर तर शेकडो जणांना खारे पाणी प्यायलाने किडनीच्या संबंधित आजार झाले आहेत.
जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातल्या सावरपाटी गावातील नागरिकांमध्ये सध्या किडनीच्या आजारामुळे भीतीचे वातावरण आहे. विहिरी आणि बोअरमधील क्षारयुक्त पाणी इथले गावकरी पित आहेत. यामुळे किडनी स्टोन आणि किडनी संबंधीचे आजार गावकऱ्यांना होत आहेत. बाळापूर तालुक्यातल्या जवळपास 60 पेक्षा अधिक गावांत हिच परिस्थिती आहे. पारस ते निंबा फाटापर्यंत असलेल्या सर्व गावी हे खारपणपट्ट्यात वळत आहेत.
दुसरीकडे, घरोघरी नळ असले तरी पाण्याच्या टाकीत चढणारे पाणी हे गावातील विहिरी आणि बोअरवेलमधीलच आहे. येथे पूर्णतः क्षारयुक्त पाणी असल्याने अनेकांना विविध आजाराला सामोरे जावे लागते आहे. याच्या बचावासाठी गावकरी १५ ते २० किमी अंतराराहून गोड पाणी दुचाकीवर पिण्यासाठी आणत आहेत. त्यामुळे या परिस्थितीकडे शासनासह लोकप्रतिनिधींनी गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी केली जात आहे.