Kolhapur Mahapalika Election 2026: कोल्हापुरात भाजपचा कंडका पडणार; शिंदे गट काँग्रेससोबत जाणार?
मिळालेल्या माहितीनुसार, कोल्हापुरात काँग्रेस आणि शिवसेना शिंदे गटाची युती होण्याची शक्यता वर्तवली जातआहे. शिवसेना शिंदे गटाने काँग्रेसला पाठिंबा दिल्यास कोल्हापुरात काँग्रेसची सत्ता येण्याची शक्यता आह. त्यादृष्टीने पडद्यामागे जोरदार हालचालीही सुरु आहेत. पण त्याबद्दल आपण आताच काही बोलू शकत नाही, असं सूचक विधान सतेज पाटील यांनी केलं आहे. सतेज पाटलांच्या या विधानाने भाजप मात्र अस्वस्थता पसरली आहे.
महापालिका निवडणुकीत भाजपनंतर शिवसेना शिंदे गट दुसऱ्या क्रमांकावरील सर्वात मोठा पक्ष आहे. अनेक महापालिकांवर सत्तेत जायचं असेल तर भाजपला शिंदे गटाची साथ आवश्यकच आहे. याच परिस्थितीचा फायदा घेऊन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईत महापौर पदासाठी मोठी फिल्डिंग लावली आहे. भाजपने शिंदे गटाला डावललं तर अनेक महापालिकांमध्ये शिवसेना शिंदे गट वेगळा निर्णय घेऊ शकते, महापालिकांवर सत्तेत येण्यासाठी शिंदे गटाकडे अनेक पर्यायही उपलब्ध आहेत. (Municipal Election Result 2026)
मुंबई महापालिकेत भाजपने एकनाथ शिंदे यांना बाजूला केलं तर ते कोल्हापुरात काँग्रेससोबत जाऊन सत्ता स्थापन करू शकतात. याबाबत सतेज पाटील यांना विचारले असता, त्यांनी पडद्यामागे मोठ्या घडामोडी सुरू आहेत. पण याची खुली चर्चा करू शकत नाही, असं म्हणत चांगलाच सस्पेन्स निर्माण केला आहे. काँग्रेसचे ३४ आणि शिंदे गटाचे १५ नगरसेवक एकत्र आल्यास कोल्हापूरमध्ये सत्ता स्थापन करणे शक्य आहे. त्यामुळे शिंदेंच्या मुंबईतील नाराजीचा फायदा काँग्रेसला कोल्हापुरात होऊ शकतो. त्यामुळे भाजपचा मात्र कंडका पडू शकतो. असेही बोलले जात आहे.
कोल्हापूर महानगरपालिकेची एकूण सदस्यसंख्या ८१ असून, सत्ता स्थापनेसाठी ४२ हा बहुमताचा आकडा आहे. नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालेले नाही. काँग्रेसने ३४ जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष होण्याचा मान मिळवला आहे. दुसरीकडे, भाजपने २६ आणि शिवसेना (शिंदे गट) ने १५ जागा जिंकल्या आहेत. भाजप आणि शिंदे गटाची एकत्रित संख्या पाहता त्यांनी बहुमताचा आकडा पार केला आहे. मात्र, जर शिंदे गटाने काँग्रेसला साथ दिली, तर कोल्हापुरातील सत्तेचे संपूर्ण समीकरण बदलू शकते.
कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी महायुतीविरुद्ध प्रबळ लढा दिला. त्यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने सर्वाधिक जागा जिंकत प्रथम क्रमांक पटकावला आहे. सतेज पाटील यांनी महायुतीचा विजयरथ रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले असले, तरी काँग्रेसला स्वबळावर बहुमताचा आकडा गाठता आलेला नाही. त्यामुळे आता सत्ता स्थापनेसाठी कोल्हापुरात मोठ्या राजकीय हालचाली होण्याची शक्यता आहे.






