कोल्हापूर : एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण करून घ्यावे यासह अन्य मागण्यासाठी कोल्हापूरसह राज्यभरात एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. संपाचा आजचा सातवा दिवस असून कोल्हापूर जिल्ह्यामधील ३८ एसटी कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली.
आंदाेलनाची तीव्रता वाढली
एसटी कर्मचाऱ्यांचा संप मिटण्याऐवजी दिवसेंदिवस अधीकच चिघळत निघाला आहे. कोल्हापूरमध्ये देखील या संपाची तीव्रता वाढत आहे. गेल्या सहा दिवसांपासून एसटी कर्मचारी संपात सहभागी झाले आहेत. मात्र, यापूर्वी संपात सहभागी असलेल्या १४ कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे. शनिवारी (दि. १३) पुन्हा ३८ कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
यामध्ये एका एसटी कार्यशाळेसह कोल्हापूर, हातकणंगले, शिरोळ, गगनबावडा, कागल, शाहूवाडी, भुदरगड आणि पन्हाळा या आठ आगारातील कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. या कारवाईमुळे कर्मचाऱ्यातून संतप्त भावना व्यक्त होत आहेत.