मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Image- fadanvis You tube channel)
आज कोल्हापूरमध्ये राज्य सरकारचा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. राज्य सरकारने यंदाच्या अर्थसंकल्पात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील महिलांच्यात खात्यात दर महिन्याला १,५०० रुपये जमा केले जाणार आहेत. त्यानुसार आतापर्यंत जवळपास १ ते सव्वा कोटी महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत. दरम्यान यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर बदलापूर येथील अत्याचाराची घटना व लाडकी बहीण योजनेवरून चांगलेच सुनावले आहे.
कोल्हापूरमधील मेळाव्यात बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, ”लाडकी बहीण योजनेमुळे विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. ही योजना कशी बंद करता येईल, यामध्ये कशाप्रकारे खोडा घालता येईल याचा प्रयत्न केला जात आहे. आम्ही आमच्या बहिणींसाठी सुरू केलेल्या या योजनेला महिलांना मोठा प्रतिसाद दिला आहे. खऱ्या अर्थाने या योजनेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. तसेच महिलांच्या खात्यात पैसे जमा होत आहेत. याचे सरकार म्हणून आम्हाला समाधान आहे. या योजनेसाठी बजेटमध्ये निधीची तरतूद करण्यात आली आहे.”
#Live | 📍कोल्हापूर 🗓️22-08-2024 📹 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना' – प्रचार व प्रसार कार्यक्रमातून लाईव्ह https://t.co/45B8BwyZUo — Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) August 22, 2024
पुढे बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, ”बदलापूरमध्ये घडलेली घटना ही अत्यंत दुर्दैवी आहे. मात्र रेल रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाची पार्श्वभूमी पाहिली असता, एखादे आंदोलन स्वयंफूर्तीने सुरु असेल तर त्यात, लाडकी बहीण योजनेचे बॅनर कसे दाखवले गेले? आंदोलकांनी सात ते आठ तास रेल्वे रोखून धरली. हे कोणते आंदोलन आहे? काहीही बोलायचे आणि रेटून बोलायचे अशी पद्धत विरोधकांनी सुरू केली आहे.”
कोल्हापूरमध्ये देखील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आल्याची गंभीर घटना घडली आहे. यावर बोलताना कोणालाही सोडले जाणार नाही असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहे. याबद्दल गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी माहिती घेतली असून, कोणीही आरोपी असला तरी त्याला सोडले जाणार नाही असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे.