टेंबलाई देवीची आज ललित पंचमी सोहळा
कोल्हापूर : कोल्हापूरच्या शारदीय नवरात्रौत्सवातील ललिता पंचमीचा सोहळा शनिवारी (दि. २७) रोजी साजरा होणार आहे. कोल्हासुराच्या वधाचे प्रतीक असलेला कुष्मांड भेदन विधी टेंबलाई टेकडीवर होणार आहे. त्यासाठी करवीर निवासिनी श्री अंबाबाईची पालखी तुळजाभवानी व गुरुमहाराज यांच्या पालखीसह त्र्यंबोलीच्या भेटीला जाणार आहे. यानिमित्ताने पालखी मार्गावर स्वागत कमानी, पायघड्या घालण्यात आल्या असून, प्रथेनुसार पालखी विसाव्यासाठी शाहूमिल आवारात तयारी पूर्ण झाली आहे.
सकाळी दहा वाजता अंबाबाईची पालखी त्र्यंबोली मंदिराकडे मार्गस्थ होणार आहे. दुपारी १२ वाजता शाहू महाराजांच्या परिवाराच्या उपस्थितीत स्वरा जयदीप गुरव या कुमारिकेच्या हस्ते कोहळा फोडण्याचा विधी होणार आहे. यात्रेसाठी स्थानिक व आसपासच्या ग्रामीण भागातून हजारो भाविक येतात. त्यासाठी मंदिर आवार सज्ज झाला आहे. दर्शनरांगेवर पत्र्याचे शेड उभारले आहे.
हेदेखील वाचा : Shardiya Navratri 2025: शारदीय नवरात्रीमध्ये या राशीच्या लोकांचे चमकेल भाग्य, धनलाभ होण्याची शक्यता
मुख्य गेटपासून मंदिराकडे जाणारे रस्ते सपाटीकरण करण्यात आले आहेत. पूजा साहित्य विक्रेत्यांची संख्या यंदा कमी करुन जागा मोकळी ठेवण्यात आली आहे. कोहळा फोडल्यानंतर तुकडा मिळवण्यासाठी झुंबड उडते, तेव्हा चेंगराचेंगरी होऊ नये यासाठी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मंदिर परिसरात पार्किंगची व्यवस्था करण्यात आली असून, परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे, विद्युत दिवे बसवण्यात आले आहेत. पाण्याची सोय करण्यात आली आहे. यामुळे मंदिर परिसराला यात्रेचे स्वरूप आले आहे.
नवरात्रीच्या काळामध्ये देवीच्या नऊ रुपांची पूजा
नवरात्रीच्या काळामध्ये देवीच्या नऊ रुपांची पूजा केली जाते. या वेळी पूजा केल्याने त्या भक्तांवर देवीचे विशेष आशीर्वाद लाभतात. तिच्या कृपेमुळे त्यांना सर्व प्रकारच्या दुःखांपासून मुक्तता मिळेल. आर्थिक परिस्थिती देखील मजबूत होईल, अशी धारणा असते.