पुणे : राजकीय नेत्यांना शिवीगाळ केल्याची अनेक प्रकरणे आतापर्यंत समोर आली आहेत. दरम्यान अशातच राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांच्या नावाने शिविगाळ केल्याचा आरोप रासपचे पुणे शहराध्यक्ष बालाजी पवार यांनी केला आहे. याप्रकरणी सहकारनगर पोलिस स्टेशन येथे पवार यांनी तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणाची महाराष्ट्र शासनाने दखल घ्यावी, पोलिसांनी शिविगाळ केलेल्या व्यक्तीला ताब्यात घ्यावे. त्याचा शिविगाळ करण्याचा हेतू काय आहे, का शिविगाळ केली, याचा तपास पोलिसांनी करावा, अशी मागणी शहराध्यक्ष पवार यांनी केली आहे.
नेमकं काय घडलं?
रात्री 11 वाजता बालाजी पवार हे पुण्यातील बालाजीनगर परिसरातून जात होते, त्यांच्या गाडीवर महादेव जानकर यांचा फोटो आहे. हा फोटो पाहून एका व्यक्तीने जानकर यांच्या नावाने शिविगाळ केली. तसेच त्याने बघून घेण्याची धमकीही दिली. आणि त्या व्यक्तीने तेथून पळ काढला, असा आरोप बालाजी पवार यांनी केला आहे.
महादेव जानकरांना सुरक्षा द्यावी – पवार
महादेव जानकर हे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात दररोज फिरत असतात, जानकर हे मोठे नेते आहेत, त्यांना महाराष्ट्र सरकारने सुरक्षा द्यावी, अशी मागणी पवार यांनी सरकारकडे केली आहे. तसेच राष्ट्रीय समाज पक्षाच्या कार्यकर्त्यांनी शिविगाळ प्रकरणी निषेध व्यक्त करावा, असे आवाहनही बालाजी पवार यांनी केले.
यामुळे जानकर चर्चेत
राज्यात देवेंद्र फडणवीस यांचं सरकार आलं आणि राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर हे कॅबिनेट मंत्री झाले. तोपर्यंत जानकर आणि त्यांचा राष्ट्रीय समाज पक्षाचा तेवढा विस्तार नव्हता मात्र, भाजपचे ज्येष्ठ दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांनी डोक्यावर ठेवलेला हात, राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळेंविरोधात बारामतीतून दिलेली लढत आणि फडणवीस यांच्या सरकारात मिळालेलं मंत्रिद यामुळे जानकर चर्चेत आले आणि महाराष्ट्राच्या राजकारणात दखलपात्रंही झाले. जानकर यांनी लोकसभा निवडणुकीत मातब्बर लोकांनाच आव्हान दिलं. त्यांनी नांदेड (1998), सांगली (2006), माढा(2009), बारामती (2014) आणि परभणी अशा पाच लोकसभाही जानकरांनी लढवल्या. प्रत्येक निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. पण जानकर पराभूत होऊनही चर्चेत राहिले.