तालुक्याचा दक्षिण भाग पुरंदरचा कोकण म्हणून प्रसिद्ध
बराचसा परिसर डोंगरी आणि वनराईने नटलेला
महिलांनी एकत्रित येवून राईस मिलची केली उभारणी
सासवड: पुरंदर तालुक्याचा दक्षिण भाग पुरंदरचा कोकण म्हणून प्रसिद्ध आहे. बहुतेक परिसर डोंगरी आणि वनराईने नटलेला आहे. याच परिसरात भाताचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. आतापर्यंत भात काढणी झाल्यानंतर पुढील प्रक्रियेसाठी इतर ठिकाणी घेवून जावे लागत होते. आता या भागातील शेतकरी महिलांनी एकत्रित येवून राईस मिलची उभारणी करण्याचा निर्णय घेतला असून या प्रकल्पाचे नुकतेच भूमिपूजन झाले आहे. थोड्याच दिवसात प्रत्यक्ष प्रक्रियेला सुरुवात झालेली पाहायला मिळणार आहे.
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद) व स्मार्ट प्रकल्पांतर्गत जिल्हा परिषद च्या वीर भिवडी गटातील स्वराज्य महिला प्रभाग संघाच्या स्वयंसहाय्यता समूहातील ५०३ महिला भागधारक असलेल्या किल्ले पुरंदर महिला शेतकरी उत्पादक कंपनी लिमिटेड (Rice Mill) च्या बांधकाम कामाचे भूमिपूजन प्रकल्प संचालक श्रीमती शालिनी कडू यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले आहे.
याप्रसंगी गटविकास अधिकारी प्रणोती श्रीश्रीमाळ, जिल्हा अभियान व्यवस्थापक विश्वजीत आसबे, विस्तार अधिकारी जेधे, मांढरच्या सरपंच शिल्पा शिर्के, ग्रामविकास अधिकारी शशांक सावंत, बँक ऑफ इंडिया चे बँक शाखा व्यवस्थापक सचिन दोलताडे, पुरंदर तालुका अभियान व्यवस्थापक नंदा कुर्डे, तालुका व्यवस्थापक गणेश कीकले, प्रभाग समन्वयक रमेश भंडलकर, स्मार्ट च्या प्रसिदा पाटील, सोहम साळुंखे त्याचप्रमाणे स्वराज्य प्रभाग संघातील ग्रामसखी, बचत गटातील महिला व ग्रामस्थ उपस्थित होते.
“नैसर्गिक शेती हे पवित्र…”; राज्यपाल आचार्य देवव्रत यांची कृषी विद्यापीठांना सूचना
पुरंदर तालुक्यात उमेद अभियाना अंतर्गत स्थापन झालेली महिलांची शेतकरी उत्पादक कंपनी पहिलीच कंपनी आहे. कंपनीच्या माध्यमातून राईस मिल उभारली जाणार असून आजूबाजूच्या भागातील इंद्रायणी तांदूळ खरेदी करून क्लिनिंग, गग्रेडिंग, पॅकेजिंग, ब्रँडिंग व एक्स्पोर्ट करणे अशा पद्धतीचे भविष्यातील नियोजन आहे. असे किल्ले पुरंदर राईस मिल कंपनीच्या संचालिका स्नेहल बाठे, संगीता बोरकर, सुप्रिया कोकरे, रूपाली तांबेकर, रेश्मा ढगारे, स्वाती जाधव, विद्या यादव, सविता पडळकर, प्रियंका पापळ आदींनी सांगितले.
“तुती बीजकोष, टसर रेशीम खरेदीसाठी…”; शेतकऱ्यांना रेशीम संचालनालयाचे प्रोत्साहन
पुरंदरचा दक्षिण भाग भात उत्पादक म्हणून प्रसिद्ध आहे. या परिसरातील शेतकरी महिलांनी सुरु केलेला उपक्रम कौतुकास्पद आहे. आता महिलांना त्यांच्या शेतातील उत्पादित भात पिक प्रक्रिया करण्यासाठी इतर ठिकाणी वाहून नेण्याची गरज पडणार नाही. यामुळे त्यांचा वेळ आणि पैसे यांची मोठी बचत होईल. परिसरातील शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा होईल. आणि याच पद्धतीने भविष्यात कंपनीच्या माध्यमातून महिलांचा आर्थिक विकास, महिला सक्षमीकरण होण्यास चांगला पर्याय उपलब्ध झाला आहे.
– प्रणोती श्रीश्रीमाळ, गटविकास अधिकारी, पुरंदर.






