Today's Maharashtra Breaking News Updates in marathi 21.10.2026
Maharashtra to World Breaking News :
टायगर श्रॉफच्या गाडीवरील गोळीबार प्रकरणानंतर बॉलीवूड अभिनेता सलमान खानच्या सुरक्षेत मोठी वाढ करण्यात आल्याची माहिती आहे. दुसरीकडे, ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन आणि आमिर खान यांच्या घरांचीही रेकी झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. देशातील आतापर्यंतचा सर्वात मोठा, तब्बल ३०,२१३ कोटी रुपयांचा जिओ प्लॅटफॉर्म्सचा (Jio Platforms) आयपीओ आजपासून (२१ ऑक्टोबर) गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला आहे.
अमेरिका-भारत व्यापार करार आणि रशियन तेलाच्या आयातीबाबत चर्चेसाठी अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रुबिओ दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर दाखल झाले आहेत. जपानमध्ये सुरू असलेल्या आशियाई पॅरा गेम्समध्ये भारताच्या दीप्ती जीवनजी आणि निषाद कुमार यांनी सुवर्णपदक पटकावत ऐतिहासिक कामगिरी केली. मुंबईत ऑक्टोबर हीटचा तडाखा कायम असून हवामान खात्याने आज ३७ अंश सेल्सिअस तापमानाचा अंदाज वर्तवला आहे.
21 Oct 2026 09:55 AM (IST)
देशातील अनेक भागांमध्ये हवामानाने पुन्हा एकदा मोठे वळण घेतले आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) आज देशातील १३ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा जारी केला आहे. मान्सूनोत्तर पावसाची शक्यता आणि कमी दाबाच्या पट्ट्यामुळे अनेक भागांत ताशी ४० ते ६० किलोमीटर वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
हवामान विभागाने जारी केलेल्या अलर्टनुसार दक्षिण भारत, ईशान्य भारत आणि महाराष्ट्रातील काही भागात मध्यम ते मुसळधार पाऊस पडू शकतो.तामिळनाडू, पुडुचेरी, केरळ, लक्षद्वीप, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या राज्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये परतीचा पाऊस आणि वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
21 Oct 2026 09:44 AM (IST)
माळशिरस तालुक्यातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला (शरद पवार गट) मोठा राजकीय धक्का बसला आहे. अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती बापूराव पांढरे यांनी आपल्या समर्थकांसह अधिकृतपणे भारतीय जनता पक्षाचा (BJP) हात धरला आहे. पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला असून, या घडामोडीमुळे माळशिरसच्या पश्चिम भागात खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांचे वर्चस्व असलेल्या भागात भाजपची ताकद आणखी मजबूत झाली आहे. खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या गटाचे मानले जाणारे बापूराव पांढरे यांनी पक्षाची साथ सोडल्यामुळे स्थानिक पातळीवर राष्ट्रवादीला मोठा हादरा बसला आहे. बापूराव पांढरे यांच्या पक्षप्रवेशामुळे भाजपचे नेते तथा माजी आमदार राम सातपुते यांची या भागातील राजकीय पकड आणि ताकद आणखी बळकट झाली आहे.
21 Oct 2026 09:34 AM (IST)
सातारा जिल्ह्यातून एक अत्यंत दुःखद आणि मन हेलावून टाकणारी दुर्घटना समोर आली आहे. कोल्हापूर येथील करवीर निवासिनी श्री अंबाबाईचे दर्शन घेऊन आपल्या गावी परतणाऱ्या भाविकांच्या कारला एका भरधाव ट्रकने जोरदार धडक दिली. कराड शहराजवळ पुणे-बंगळुरू महामार्गावर झालेल्या या भीषण अपघातात एकाच गावातील चार जिवलग मित्रांचा जागीच मृत्यू झाला असून, अन्य तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात इतका भीषण होता की, कारचा चुराडा झाला असून कारमधील चार जणांचा जागीच मृत्यू झाला. मृत झालेले सर्व तरुण एकाच गावातील आणि एकमेकांचे जिवलग मित्र असल्याची माहिती समोर आल्याने गावात शोककळा पसरली आहे.






