अस्वस्थतेचे छुपे कारण आर्द्रता; शहरात उकाडा कायम! आकाश निरभ्र असल्याने सूर्यकिरणांचा थेट परिणाम
Mumbai News: ऑक्टोबरचा उत्तरार्ध सुरू झाला तरी मुंबईकरांची उकाड्यातून सुटका झालेली नाही. कमाल तापमान ३४ अंश सेल्सिअसच्या पुढे जात असतानाच हवेत आर्द्रतेचे प्रमाणही मोठे असल्याने घाम, चिकटपणा आणि अस्वस्थतेचा त्रास जाणवत आहे. विशेष म्हणजे, हवामान विभागाच्या तापमानाच्या आकड्यांपेक्षा प्रत्यक्षात अधिक उष्णता जाणवण्यामागे तापमानासोबत आर्द्रतेचाही महत्त्वाचा वाटा आहे. आकाश निरभ्र असणे, जमिनीचे तापणे आणि हवेत टिकून असलेला ओलावा यांची एकत्रित परिणती उकाडा वाढण्यात होत असल्याचे स्पष्टीकरण मुंबई हवामान विभागाचे निवृत्त अधिकारी दिनेश मिश्रा यांनी दिले.
भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या नोंदीनुसार, २० ऑक्टोबरला सकाळी ८.३० वाजता कुलाबा येथे आर्द्रता ८८ टक्के, तर सांताक्रूझ येथे ८१ टक्के होती. तर १९ ऑक्टोबरला सकाळी हेच प्रमाण अनुक्रमे ७५ आणि ७३ टक्के होते. १५ ऑक्टोबरला सांताक्रूझ येथे सकाळची आर्द्रता ६६ टक्के, तर संध्याकाळची ५० टक्के नोंदवण्यात आली. या आकडेवारीतून दिवसाच्या वेगवेगळ्या वेळांनुसार आणि केंद्रांनुसार आर्द्रतेत बदल होत असल्याचे स्पष्ट होते. १८ ऑक्टोबरला मुंबईचे कमाल तापमान ३४.२ अंश सेल्सिअस होते.
गुजरात परिसरातील उच्च दाबाच्या स्थितीमुळे आकाश निरभ्र राहण्याची शक्यता असल्याचे दिनेश मिश्रा यांनी स्पष्ट केले. ढग नसल्यास सूर्याचे किरण थेट जमिनीपर्यंत पोहोचतात आणि जमीन तापते. त्यानंतर जमीन उष्णता दीर्घतरंग प्रारणाच्या स्वरूपात वातावरणात सोडते. त्यामुळे जमिनीलगतची हवा तापते. त्याच वेळी हवेत आर्द्रता अधिक असल्यास घामाचे बाष्पीभवन मंदावते आणि शरीराला उष्णता बाहेर टाकणे कठीण होते. परिणामी, प्रत्यक्ष तापमानापेक्षा अधिक उकाडा जाणवू शकतो. दरम्यान, दक्षिण कोकणातील काही जिल्ह्यांत जोरदार, तर पुण्यात मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी नोंदवण्यात आल्या.
तापमान ३६ अंश सेल्सिअस असले, तरी आर्द्रता जास्त असल्यास ते ४० अंशांसारखे जाणवू शकते. आर्द्रतेमुळे घामाचे बाष्पीभवन कमी होते. आकाश निरभ्र असल्यास सूर्यकिरणांमुळे जमीन तापते आणि जमीन दीर्घतरंग प्रारणाद्वारे हवेलाही उष्ण करते. हवेत ओलावा आणि वाढलेली उष्णता एकत्र आल्याने अस्वस्थता अधिक जाणवते. त्यामुळे प्रत्यक्ष तापमानाबरोबरच ‘फील्स लाइक’ तापमानही महत्वाचे ठरते.
Ans: हवेत आर्द्रता जास्त असल्यास घामाचे बाष्पीभवन मंदावते. त्यामुळे शरीराला स्वतःचे तापमान नियंत्रित करणे कठीण जाते आणि घाम येणे, थकवा, चिकटपणा व अस्वस्थता जाणवू शकते.
Ans: आकाश निरभ्र असल्यास सूर्यकिरण थेट जमिनीवर पोहोचतात. त्यामुळे पृष्ठभाग तापू शकतात आणि उष्णतेची जाणीव वाढू शकते.
Ans: जास्त आर्द्रतेमुळे शरीराला घामाद्वारे उष्णता बाहेर टाकणे कठीण होऊ शकते. परिणामी थकवा, चक्कर येणे, डोकेदुखी आणि उष्णतेचा ताण जाणवू शकतो.






