Today's Maharashtra Breaking News Updates in marathi 07.11.2026
Maharashtra to World Breaking News :
सीजेपी (CJP) नेत्यांच्या अटकेच्या निषेधार्थ दिल्ली, मुंबईनंतर आज पुणे आणि नागपुरात ‘लहरा दो तिरंगा’ आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. मालेगाव घटिया सुपारी प्रकरणात घोटाळ्याचा ठपका ठेवत एफडीए (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे यांनी ५ अधिकाऱ्यांना निलंबित केले.
महाराष्ट्रात परतीचा पाऊस धुमाकूळ घालणार असून वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर हवामान खात्याने ७ जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी केला आहे. शारदीय नवरात्रौत्सवाच्या सातव्या दिवशी (सप्तमी) महाकाली आणि कालरात्री देवीच्या दर्शनासाठी राज्यातील प्रमुख शक्तिपीठांवर भाविकांची अलोट गर्दी.
राज्यातील दुष्काळी भागात परतीच्या पावसाने दांडी मारल्याने पिके वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची टँकरच्या पाण्यासाठी धडपड सुरू झाली आहे आगामी COP31 परिषदेपूर्वी संयुक्त राष्ट्रांमध्ये (UN) भारताने हवामान बदलाच्या मुद्यावर विकसित देशांकडून अधिक सहकार्याची आणि समानतेची मागणी केली.
17 Oct 2026 05:59 PM (IST)
मोठी बातमी येत असून कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांना जामीन मंजूर झाला आहे. लवकरच त्यांची सुटका होणार आहे. दिल्ली पोलिसांनी हि माहिती दिली असून एका मोठ्या अटीवर सही केल्यावरच दिपकेंची सुटका होणार आहे.
17 Oct 2026 05:50 PM (IST)
हाँगकाँग सिक्सेस २०२६ स्पर्धेपूर्वी भारतीय संघात एक मोठा बदल झाला आहे. काही दिवसांपूर्वी या स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली होती. अनुभवी वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारला कर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आले होते. परंतु, भुवनेश्वर भारतीय टी२० संघात सामील झाला असून तो न्यूझीलंड दौऱ्यात व्यस्त असेल. यामुळे, तो हाँगकाँग सिक्सेसमध्ये सहभागी होऊ शकणार नाही. त्याच्या जागी कृणाल पांड्याची नियुक्ती करण्यात आली आहे. इतकेच नाही, तर भुवनेश्वरच्या बदली खेळाडूचीही अधिकृत घोषणा करण्यात आली आहे.
17 Oct 2026 05:40 PM (IST)
राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी पुन्हा एकदा भाजपवर निशाणा साधला आहे. दिवंगत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मृत्यूनंतर त्यांच्याकडील अर्थमंत्रीपद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःकडे ठेवले आहे. या अर्थमंत्रीपदावरून आता महायुतीत धुसफूस सुरु असल्याचे चित्र दिसत असून राष्ट्रवादी काँग्रेसने अर्थमंत्रीपद पुन्हा मिळवण्यासाठी मुख्यमंत्र्यांसह भाजपच्या नेत्यांकडे मागणी केली आहे. मात्र अद्यापही राष्ट्रवादीला अर्थमंत्रीपद मिळू शकलेले नाही.
17 Oct 2026 05:25 PM (IST)
उत्तर अमेरिकेतील सर्वात मोठा देश असलेला कॅनडा सध्या एका अभूतपूर्व घटनात्मक आणि राजकीय संकटाचा सामना करत आहे. देशाचा सर्वात श्रीमंत आणि तेल-नैसर्गिक वायूच्या साठ्यांनी समृद्ध असलेला ‘अल्बर्टा’ (Alberta) हा प्रांत कॅनडापासून वेगळा होऊन स्वतःचा स्वतंत्र देश स्थापन करण्याच्या उंबरठ्यावर उभा आहे. या फुटीरतावादी चळवळीला वेसण घालण्यासाठी आणि देशाचे विभाजन रोखण्यासाठी कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी (Mark Carney) यांनी थेट भारतीय वंशाच्या लोकांकडे धाव घेतली आहे.
17 Oct 2026 05:12 PM (IST)
ठाणे-मुंबई एन्ट्री पॉईंट परिसरात कोपरी पुलावरून जाणाऱ्या एका कारवर बांधकाम सुरू असलेल्या खांबाचा लोखंडी सळ्यांचा सांगाडा अचानक कोसळल्याची गंभीर घटना घडली. ठाण्यातील आनंद नगर–साकेत उन्नत मार्ग प्रकल्पाच्या ठिकाणी हा प्रकार घडला. लोखंडी सांगाडा थेट कारवर कोसळल्याने वाहनाच्या पुढील काचेचे मोठे नुकसान झाले. या घटनेनंतर बांधकामाच्या ठिकाणच्या सुरक्षाव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
17 Oct 2026 04:37 PM (IST)
सोलापूर जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याच्या तीव्र टंचाईविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) आक्रमक पाऊल उचलले आहे. पाण्यासाठी नागरिक आणि शेतकऱ्यांनी सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावर भव्य ‘रास्ता रोको’ आंदोलन करत करण्यात आले. सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यात पाणी नसल्यामुळे सोलापूर- पुणे राष्ट्री महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात येत आहे. सोलापुरात पिण्याच्या पाण्यासाठी मनसेचे आंदोलन करत असून मोडनिंब, अरण, जाधववाडी, बैरागवाडी आणि तुळशी गवांतील शेतकऱ्यांना पाणी नसल्यामुळे मनसे कार्यकर्ते रस्त्यावर उतरल्याचे पाहण्यास मिळत आहे.
17 Oct 2026 04:27 PM (IST)
अर्थमंत्रीपदावरून आता महायुतीत धुसफूस सुरु असल्याचे चित्र दिसत असून राष्ट्रवादी काँग्रेसने अर्थमंत्रीपद पुन्हा मिळवण्यासाठी मुख्यमंत्र्यांसह भाजपच्या नेत्यांकडे मागणी केली आहे. मात्र अद्यापही राष्ट्रवादीला अर्थमंत्रीपद मिळू शकलेले नाही. यावरूनच, रोहित पवार यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना अर्थमंत्रीपद मिळणार नसल्याचे म्हंटले आहे. "मी भाजपला फार ओळखतो. सुनेत्रा पवार यांना अर्थमंत्रीपद मिळणार नाही. त्यामुळेच मी भाजपपासून लांब आहे," अश्या शब्दांत त्यांनी भाजपला लक्ष्य केले आहे.
17 Oct 2026 04:17 PM (IST)
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी पुन्हा एकदा आपल्या वादग्रस्त विधानांनी राजकीय वर्तुळात आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठ्या वादाला तोंड फोडले आहे. जॉर्जिया राज्यातील डाल्टन म्युनिसिपल विमानतळावरील एका हँगरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या भव्य निवडणूक रॅलीला संबोधित करताना ट्रम्प यांनी मुस्लिम समाजात अत्यंत आदरणीय असलेल्या ‘मोहम्मद’ या नावावरून उपरोधिक आणि वादग्रस्त विधान केले. त्यांच्या या विधानानंतर अमेरिकेतील मुस्लिम संघटना, मानवाधिकार कार्यकर्ते आणि राजकीय विरोधकांनी त्यांच्यावर कडक शब्दांत टीका करण्यास सुरुवात केली आहे. वाचा सविस्तर...
17 Oct 2026 04:07 PM (IST)
भारत आणि पाकिस्तान (India-pakistan war) यांच्यातील राजनैतिक आणि लष्करी तणाव पुन्हा एकदा नव्या वळणावर पोहोचला आहे. भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी १५ ऑक्टोबर रोजी दहशतवादाविरोधात दिलेल्या अत्यंत कठोर इशाऱ्यानंतर पाकिस्तानमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. सीमेपलीकडून होणाऱ्या दहशतवादी कारवाया खपवून घेतल्या जाणार नाहीत आणि जर पुन्हा असा प्रयत्न झाला, तर भारताचे प्रत्युत्तर हे भूतकाळातील कारवाईपेक्षा अधिक भयानक आणि तीव्र असेल, असा सज्जड दम राजनाथ सिंह यांनी दिला होता. या वक्तव्यानंतर पाकिस्तानच्या लष्करी गोटात अस्वस्थता पसरली असून तिथल्या वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांनी प्रतिआव्हान देण्याचा केविलवाणा प्रयत्न केला आहे. वाचा सविस्तर...
17 Oct 2026 03:59 PM (IST)
Wardha News : यंदाच्या मान्सून काळात जिल्ह्यात अल्प पर्जन्यमान झाले. तर आगामी काळात जिल्ह्यातील नागरिकांना कोरड्या दुष्काळाच्या झळा सहन कराव्या लागणार आहे. या कठीण प्रसंगावर मात करण्यासह होतकरूंच्या हाताला काम मिळावे या हेतूने जिल्हा प्रशासनाच्यावतीने आतापासूनच नियोजन केले जात आहे. याचाच एक भाग म्हणून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी पराग सोमण यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीने जलताराची १०० कामे घेण्याच्या सूचना करण्यात आल्या आहे. जिल्ह्यातील ५२१ ग्रामपंचायतींत आगामी काळात या कामांतून तब्बल ८.३३ लाख मनुष्यदिन रोजगाराची निर्मिती होणार आहे.
17 Oct 2026 03:55 PM (IST)
Nagpur News : दिवाळीत फटाक्यांच्या आवाजावर मर्यादा घालण्यासाठी उच्च न्यायालयाने स्पष्ट निर्देश दिले असतानाच यंदा फटाक्यांच्या विक्रीसाठी अग्निशमन विभागाकडून मोठ्या संख्येने तात्पुरते परवाने दिले आहेत. गतवर्षीच्या तुलनेत यंदा परवान्यांची संख्या वाढली आहे. तब्बल ८३१ प्रमाणपत्रे जारी झाली आहेत. त्यामुळे न्यायालयाच्या आदेशांची अंमलबजावणी करताना प्रशासनाची कसोटी लागणार आहे.
17 Oct 2026 03:50 PM (IST)
JNV Admission 2027: नवोदय विद्यालय समितीने (NVS) जवाहर नवोदय विद्यालय निवड परीक्षेच्या (JNVST) माध्यमातून शैक्षणिक सत्र २०२७-२८ साठी इयत्ता ९ वी आणि ११ वीच्या प्रवेशासाठी अधिसूचना जारी केली आहे. नवोदय विद्यालयात प्रवेशासाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया २ सप्टेंबर २०२६ रोजी सुरू झाली होती, ज्याची अंतिम तारीख ३० सप्टेंबर होती. ती वाढवून आधी १५ ऑक्टोबर करण्यात आली होती, तर आता ही दुसरी संधी आहे जेव्हा जवाहर नवोदय विद्यालयातील प्रवेशाची अंतिम तारीख पुन्हा एकदा वाढवण्यात आली आहे. आता इच्छुक उमेदवार इयत्ता ९ वी आणि ११ वीच्या लॅटरल एंट्री प्रवेश २०२७ साठी २२ ऑक्टोबरपर्यंत नोंदणी करू शकतात.
17 Oct 2026 03:45 PM (IST)
महाड: दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर महाड शहरावर संभाव्य पाणीटंचाईचे संकट घोंघावत असताना त्यावर मात करण्यासाठी आतापासूनच ठोस नियोजन करण्याची गरज शुक्रवारी, १६ ऑक्टोबर रोजी झालेल्या महाड नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेत व्यक्त करण्यात आली.
17 Oct 2026 03:40 PM (IST)
भारतातील टेलिकॉम क्षेत्रात ‘वी’ ने एक मोठी क्रांती घडवली आहे. ‘वी’ ने भारतातील पहिला प्रीपेड फॅमिली प्लॅन लाँच केला आहे. याअंतर्गत प्रीपेड ग्राहकांना ‘वी’ ॲपवर देशात कुठूनही ‘वी प्रीपेड फॅमिली’ तयार करण्याची सुविधा मिळणार आहे. यामध्ये ज्यामध्ये डेटा शेअरिंग, खात्रीशीर बचत आणि विशेष ऑफर्सचा फायदा समाविष्ट असणार आहे. ‘वी पे सब है व्हीआयपी’ या विचारासह प्रत्येक यूजरला महत्त्वाचे फायदे मिळाले पाहिजेत, असा ब्रँडचा विश्वास आहे. कंपनीचा हाच विचार सत्यात उतरवण्यासाठी टेलिकॉम कंपनी ‘वी’ ने ‘वी प्रीपेड फॅमिली प्लॅन’ लाँच केला आहे. विशेष म्हणजेच हा भारतातील पहिला प्रीपेड फॅमिली प्लॅन आहे.
17 Oct 2026 03:35 PM (IST)
पुणे : वाघोली येथील वढू गावात किरकोळ वादातून अल्पवयीनांनी तरुणावर तीक्ष्ण शस्त्राने वार करुन खून केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी लोणीकंद पोलिसांनी ३ अल्पवयीनांना ताब्यात घेतले आहे. विकासकुमार अनुपकुमार श्रीवास्तव (वय २१, रा. दत्तनगर, कोरेगाव भीमा, ता. शिरुर, जि. पुणे) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत विकासकुमार याचा मोठा भाऊ आकाशकुमार (वय २३) याने लोणीकंद पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. या प्रकरणी तीन अल्पवीयानांना ताब्यात घेण्यात आले आहे.
17 Oct 2026 03:26 PM (IST)
Kavya Maran Anirudh ravichander Marriage: आयपीएल फ्रँचायझी सनरायझर्स हैदराबादची मालकीण काव्या मारन आणि संगीतकार अनिरुद्ध रविचंद्रर हे लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याच्या अफवा गेल्या काही काळापासून चर्चेत आहेत. आता पुन्हा एकदा यांच्या लग्नाची चर्चा सुरु झाली आहे. सन ग्रुपचे चेअरमन कलानिधी मारन यांनी त्यांच्या पत्नी कावेरी मारन यांच्यासोबत तेलंगणाचे मुख्यमंत्री ए. रेवंत रेड्डी यांच्या ज्युबिली हिल्स येथील मुख्यमंत्री निवासस्थानी भेट दिली. माहितीनुसार, कलानिधी मारन आणि कावेरी मारन यांनी मुलगी काव्याच्या रिसेप्शनचे आमंत्रण देण्यासाठी भेट घेतली. यानंतर, मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी या प्रसंगाचे फोटो त्यांच्या अधिकृत हँडलवर पोस्ट केले आहेत, जे आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. (Kavya Maran To Marry Anirudh ravichander In November)
17 Oct 2026 02:59 PM (IST)
नवरात्रीत गरबा-दांडियासाठी बाहेर पडणाऱ्या मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे. मुंबईतील चार मेट्रो मार्गिकांवर १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान रात्री १२.३० वाजेपर्यंत मेट्रो सेवा सुरू राहणार आहे. त्यामुळे रात्री उशिरा घरी परतणाऱ्या प्रवाशांना मोठा फायदा होणार असून, उत्सवाच्या काळात प्रवास अधिक सोयीचा होणार आहे.
17 Oct 2026 02:50 PM (IST)
मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत अब्दुल सत्तार यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार प्रतापसिंह पाटील यांना पाठिंबा दिल्याने राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. ऐन निवडणुकीत मिळालेल्या या पाठिंब्यामुळे मराठवाड्यातील राजकीय समीकरणांवर काय परिणाम होणार, याकडे लक्ष लागलं आहे.
17 Oct 2026 02:40 PM (IST)
नांदेडमध्ये रेल्वेच्या धडकेत वाघाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. रेल्वे रुळ ओलांडताना हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती आहे. या घटनेमुळे वन्यजीवांच्या सुरक्षिततेचा आणि रेल्वेमार्गावरील अपघातांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
17 Oct 2026 02:30 PM (IST)
यूट्यूबर ध्रुव राठीविरोधात दिल्लीतील साकेत न्यायालयाने २०१८ मधील मानहानीच्या प्रकरणात जामीनपात्र अटक वॉरंट जारी केले आहे. भाजप आयटी सेलशी संबंधित विकास पांडे यांनी 'BJP IT Cell Part II' या व्हिडिओतील कथित बदनामीकारक आरोपांबाबत तक्रार दाखल केली होती.
17 Oct 2026 02:21 PM (IST)
रेल्वे प्रवासात मोबाईलवर मोठ्या आवाजात गाणी ऐकणे, व्हिडिओ पाहणे किंवा स्पीकरवर बोलून इतर प्रवाशांना त्रास देणे आता महागात पडू शकते. दक्षिण रेल्वेच्या नव्या सूचनांनुसार, अशा प्रकारे गोंधळ घालणाऱ्या प्रवाशांना पहिल्यांदा १,००० रुपयांचा दंड होऊ शकतो. सूचना देऊनही त्रास सुरू ठेवल्यास रेल्वे कायद्याच्या कलम १४५ अंतर्गत सहा महिन्यांपर्यंत तुरुंगवास, ५,००० रुपयांपर्यंत दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात.
17 Oct 2026 02:11 PM (IST)
केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी २०२९ च्या लोकसभा निवडणुकीची तुलना क्रिकेट सामन्याशी करत राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला आहे. “मोदींसोबत खेळणार क्रिकेट, मी गांधींची घेणार विकेट," असं म्हणत त्यांनी राहुल गांधी यांची राजकीय खिल्ली उडवली. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीएची टीम मजबूत असल्याचा दावा करत, २०२९ मध्येही एनडीए सत्तेत येईल, असा विश्वास आठवले यांनी व्यक्त केला.
17 Oct 2026 02:00 PM (IST)
नवी दिल्लीतील जंतर मंतरवर सुरू झालेल्या राजकीय आंदोलनाची ठिणगी आता थेट ब्रिटनची राजधानी लंडनपर्यंत (London Protests) पोहोचली आहे. भारतीय निवडणूक आयोगाच्या (Election Commission of India) कामकाजावर आणि कथित ‘मतचोरी’च्या आरोपांवरून सुरू असलेला वाद आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर पोहोचला असून, प्रसिद्ध यूट्यूबर ध्रुव राठी याने लंडनमधील समर्थकांना एकत्र येण्याचे आवाहन केले आहे. शुक्रवारी रात्री उशिरा सोशल मीडियावर प्रसिद्ध केलेल्या एका निवेदनाद्वारे ध्रुव राठी याने स्वतः लंडनमध्ये उपस्थित असल्याचे जाहीर केले आणि शनिवारी दुपारी १२ वाजता लंडनच्या प्रसिद्ध पार्लमेंट स्क्वेअरमधील महात्मा गांधींच्या पुतळ्यासमोर जमण्याचे आवाहन केले.
17 Oct 2026 01:55 PM (IST)
जळगावमध्ये फायरिंगच्या घटनेत कानशिलावर पिस्तूल रोखलेले असताना संबंधित व्यक्तीने अचानक हालचाल केल्याने गोळी मेंदूत घुसण्याऐवजी कवटीच्या तळाशी अडकली. त्यामुळे मेंदूला थेट इजा होण्याचा धोका टळला, मात्र मेंदूला रक्तपुरवठा करणाऱ्या महत्त्वाच्या धमनीच्या अगदी जवळ कवटीच्या तळाशी अडकलेली एक सेंटीमीटरची गोळी सुरक्षितपणे बाहेर काढण्याचे आव्हान जे.जे. रुग्णालयातील डॉक्टरांनी यशस्वीरीत्या पेलले. अत्यंत नाजूक भागात अडकलेली ही गोळी बाहेर काढताना रक्तवाहिनीला इजा होण्याचा धोका होता. मात्र, आधुनिक तंत्रज्ञान, अचूक नियोजन आणि न्यूरोसर्जरी व कान-नाक-घसा विभागाच्या डॉक्टरांच्या समन्वयातून ही गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वी झाली.
17 Oct 2026 01:50 PM (IST)
उंब्रज : शहरात अनेक वर्षांपासून कार्यरत असलेल्या नामांकित बेकरीवर अन्न व औषध प्रशासन विभागाने धडक कारवाई करत बेकरी सील केली आहे. तसेच पार्सल सेवा पुरविणाऱ्या एका बड्या कंपनीवरही कारवाई करून तिच्या कामकाजावर निर्बंध आणण्यात आले आहेत. अन्न व औषध प्रशासनाचे उपायुक्त तुषार शिंगाडे यांनी आज ही माहिती दिली. या कारवाईमुळे शहरातील व्यावसायिक वर्तुळात खळबळ उडाली आहे. (FDA Raid)
17 Oct 2026 01:45 PM (IST)
Ratna Singh on Abhijeet Dipke Arrest: दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर सीजेपीचे संस्थापक अभिजीत दीपके यांना अटक करण्यात आली आहे. यावर सीजेपीच्या कायदेशीर प्रमुख रत्ना सिंह यांनी एका ट्विटद्वारे प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी लिहिले की, एसईएम कोर्टाने अभिजीत दीपके यांना सोडावे, कारण त्यांची अटक बेकायदेशीर होती. त्यांनी केवळ लोकांना तिरंगा फडकवण्याचे आवाहन केले होते. यात गुन्हा तरी कसा असू शकतो? असा सवाल रत्ना सिंह यांनी उपस्थित केला आहे.
17 Oct 2026 01:40 PM (IST)
Mumbai Hotel Price Hike: आधीच वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य नागरिकांचे मासिक बजेट कोलमडले आहे, अशातच आता मुंबईकरांना आणखी एक आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे. मुंबईतील हॉटेल आणि रेस्टॉरंटमध्ये मिळणाऱ्या खाद्यपदार्थांच्या किमती येत्या एक ते दोन आठवड्यांत १० ते १५ टक्क्यांनी वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. भाजीपाला, धान्य, डाळी, खाद्यतेल, मसाले आणि व्यावसायिक गॅसच्या वाढत्या किमतींमुळे हॉटेल व्यावसायिकांचा खर्च मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे खाद्यपदार्थांच्या दरात वाढ करण्याचे संकेत इंडियन हॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशन अर्थात ‘आहार’ संघटनेने दिले आहेत.
17 Oct 2026 01:35 PM (IST)
CA Intermediate September 2026 Result: ICAI च्या इंटरमीडिएट सप्टेंबर २०२६ परीक्षेचे निकाल २२ ऑक्टोबरपर्यंत जाहीर केले जाऊ शकतात. परीक्षेत सहभागी झालेले उमेदवार अधिकृत वेबसाइट caresults.icai.org च्या माध्यमातून आपला निकाल ऑनलाइन पाहू शकतील. CA इंटरमीडिएट सप्टेंबर २०२६ परीक्षेचे आयोजन इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (ICAI) तर्फे १ ते १२ सप्टेंबर २०२६ या कालावधीत करण्यात आले होते. यामध्ये १ सप्टेंबर रोजी ॲडव्हान्स्ड अकाऊंटिंग (उन्नत लेखांकन) ग्रुप १ ची परीक्षा झाली होती, ग्रुप १ च्या कंपनी आणि इतर कायद्यांची परीक्षा ३ सप्टेंबरला, ग्रुप २ टॅक्सेशनची परीक्षा ६ सप्टेंबरला, ग्रुप २ कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाऊंटिंगची परीक्षा ८ सप्टेंबरला, ग्रुप २ ऑडीटींग अँड इथिक्सची परीक्षा १० सप्टेंबरला आणि ग्रुप २ फायनान्शियल मॅनेजमेंट अँड स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंटची परीक्षा २६ सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आली होती.
17 Oct 2026 01:30 PM (IST)
IND vs WI: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील अंतिम आणि निर्णायक सामना शनिवारी बंगळूरु येथे खेळला जाईल. ही मालिका २-२ अशी बरोबरीत असून, दोन्ही संघांचे लक्ष विजेतेपदावर असेल. या महत्त्वपूर्ण सामन्यापूर्वी, भारतीय संघाच्या अंतिम ११ खेळाडूंबाबत चर्चा तीव्र झाली आहे. अनुभवी वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारचे पुनरागमन जवळपास निश्चित मानले जात आहे, तर फिरकी गोलंदाज कुलदीप यादवलाही अंतिम ११ खेळाडूंमध्ये संधी मिळू शकते.
17 Oct 2026 01:25 PM (IST)
Sugar Price Festive Season : गेल्या काही महिन्यांपासून महागाईच्या भडका इतका वाढला आहे की त्यामुळे सामान्यांचं बजेट पूर्णपणे कोलमडलं आहे. त्यात गेल्या दोन महिन्यांपासून स्वयंपाकघरातील गोडवा अगदी कमी झाला आहे त्याचं मुख्य कारणं म्हणजे साखरेच्या किमती. मात्र आता येत्या सणासुदीच्या काळात साखरेच्या दरांवर काय परिणाम होणार? किंमती आणखी वाढून सर्वसामान्यांना आणखी ताण निर्माण होणार की सुखाचा गोडवा पुन्हा वाढणार ? सरकारने नेमका काय निर्णय घेतला आणि त्याचा सामान्यांवर काय परिणाम होणार ? सविस्तर जाणून घेऊयात. ( Sugar Price Festive Season )
17 Oct 2026 01:20 PM (IST)
बीड जिल्ह्यात दुष्काळाच्या तीव्रतेमुळे शेतकऱ्यांसमोर मोठं संकट उभं राहिलं आहे. शेतात पिकं न आल्याने काही शेतकऱ्यांना उदरनिर्वाहासाठी शहरात जाऊन मजुरी करण्याची वेळ आली आहे. सरकारने जाहीर केलेल्या पाच हजार रुपयांच्या मदतीत दिवाळी कशी साजरी करायची, असा सवाल शेतकरी उपस्थित करत आहेत. केवळ आर्थिक मदत न देता दुष्काळावर मात करण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणीही शेतकऱ्यांनी केली आहे.
17 Oct 2026 01:15 PM (IST)
मध्यपूर्वेतील युद्धजन्य परिस्थिती पुन्हा एकदा अत्यंत भीषण व स्फोटक वळणावर येऊन पोहोचली आहे. येमेनमध्ये (Yemen War) आंतरराष्ट्रीय मान्यताप्राप्त सरकार आणि हुथी बंडखोर यांच्यातील संघर्ष तीव्र झाला आहे. नुकत्याच मिळालेल्या ताज्या माहितीनुसार, येमेनच्या दक्षिणेकडील महत्त्वपूर्ण बंदर शहर असलेल्या एडनमधील आंतरराष्ट्रीय विमानतळ संकुलाजवळ दोन शक्तिशाली बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे कोसळली आहेत. या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे संपूर्ण शहरात एकामागून एक तीन मोठे धडकावणारे स्फोट झाले. घटनेची माहिती मिळताच स्थानिक आपत्कालीन यंत्रणा आणि रुग्णवाहिकांनी प्रभावित भागाकडे धाव घेतली असून, प्राथमिक तपासानुसार या विशिष्ट हल्ल्यात अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याचे अधिकृत वृत्त नाही.
17 Oct 2026 01:10 PM (IST)
बॉलिवूडचा सिंघम अजय देवगण सध्या अडचणीत सापडला आहे. त्याच्या मुंबईतल्या जुहू येथील बंगल्यावर मुंबई महानगरपालिकेने कारवाई केली आहे. बंगल्यात सुरू असलेल्या अनधिकृत बांधकामावर BMC ने हातोडा चालवला आहे. गेल्या काही दिवसांपासून या बंगल्याची चांगलीच चर्चा सुरू होती. Ajay Devgn: अजय देवगणने आपला जुहूचा बंगला भाड्याने दिला आहे. तिथे एक मोठा स्पा आणि सलून सुरू होणार आहे. फ्लोरियन ह्युरेल नावाच्या कंपनीला त्याने हा बंगला पाच वर्षांसाठी दिला आहे आणि याचा करार तब्बल 10.61 कोटी रुपयांचा आहे. पण हेच भाड्याने देणे सोसायटीच्या लोकांना आणि BMC ला पटले नाही.
17 Oct 2026 12:48 PM (IST)
वैभवशाली गणेशोत्सवातील गर्दीचा फायदा घेऊन भक्तांच्या गळ्यातील दागिने, मोबाइल चोरणाऱ्या टोळीला पकडण्यात यश आले आहे. विश्रामबाग पोलिसांनी तब्बल साडे चार हजार किलोमीटरचा प्रवास करून या टोळीला हरयाणातील पलवल भागातून पकडले आहे. गुजरात आणि हरियाणा पोलिसांच्या मदतीने ही कारवाई करण्यात आली आहे. टोळीकडून १३ लाख रुपयांचे दागिने, मोटार असा २३ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी अजय समशेरन विनोदकुमार रुपसिंग कोळी (वय २०, रा. समसाबाद पलवल, हरयाणा), अमन समशेर अनिलकुमार नारायणसिंग कोळी (वय २४, रा. आदर्श काॅलनी, पलवल, हरयाणा), दीपक समशेर राजूभाई सापसिंग (वय २१, रा. हिरानगर काॅलनी, पलवल, हरयाणा) यांना अटक करण्यात आली आहे.
17 Oct 2026 12:36 PM (IST)
परदेशी नागरिकांची ऑनलाइन फसवणूक करण्यासाठी बेकायदा कॉल सेंटर चालविणाऱ्या टोळीचा पुणे ग्रामीण पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. मावळ तालुक्यातील नांगरगाव येथील ओमेगा सोसायटीमधील ‘देव व्हिला’ बंगल्यावर छापा टाकून पोलिसांनी २० जणांना अटक केली आहे. या कारवाईत मोबाईल फोन, लॅपटॉप, रोख रक्कम आणि चारचाकी वाहनांसह एकूण ३६ लाख ४१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. नांगरगाव परिसरातील एका बंगल्यात काही व्यक्ती एकत्र येऊन बेकायदा कॉल सेंटर चालवत असल्याची माहिती लोणावळा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेश विधाते यांना मिळाली होती. त्यांनी ही माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिल्यानंतर तपासाला वेग आला. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा आणि लोणावळा शहर पोलिसांच्या पथकाने संबंधित बंगल्यावर छापा टाकला. पोलिसांनी पंचांसमक्ष बंगल्यात प्रवेश केला असता, काही व्यक्ती हेडफोन लावून लॅपटॉप आणि मोबाईलच्या साहाय्याने इंग्रजीत संभाषण व चॅटिंग करताना आढळल्या. लगतच्या खोलीतही अशाच प्रकारचे काम सुरू असल्याचे निदर्शनास आले. चौकशीदरम्यान संबंधित व्यक्तींकडे कॉल सेंटर चालविण्यासाठी आवश्यक अधिकृत परवानगीची समाधानकारक कागदपत्रे आढळून आली नाहीत.
17 Oct 2026 12:24 PM (IST)
मैत्रिणीसोबत झालेला वाद मिटवण्याच्या नावाखाली तिच्या दोन भावांसह पाच जणांच्या टोळक्याने तरुणाला बेदम मारहाण करुन त्याच्यावर शस्त्राने वार केल्याची घटना घडली आहे. ही घटना (दी. १४ ऑक्टोबर) रात्री साडेअकराच्या सुमारास वाघोलीतील ग्रीन नाईन हॉटेलसमोर घडली आहे. याप्रकरणी पाच जणांविरुद्ध वाघोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विपूल कदम (वय २८ रा. वाघोली ) असे गंभीररित्या जखमी झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी सुनील सुर्यवंशी आणि स्वप्नील सूर्यवंशी दोघेही (रा. घोरपडी गाव) यांच्यासह इतर तिघांविरुद्ध वाघोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. त्यांना अटक करण्यात आली आहे. आकाश कदम (वय ३० रा. वाघोली) यांनी तक्रार दाखल केली आहे.
17 Oct 2026 12:12 PM (IST)
नांदेड-हिंगोली महामार्गावरील अर्धापूर येथील शेतशिवारात २५ वर्षीय तरुण शेतकऱ्याची धारदार हत्याराने वार करून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना ११ ऑक्टोबर रोजी उघडकीस आली. अनिल गौतम किर्तने (वय २५, रा. असोला, ता. वसमत; सध्या रा. कवठा रोड, वसमत) असे मृत तरुणाचे नाव आहे. या घटनेमुळे अर्धापूर परिसरासह नांदेड जिल्ह्यात खळबळ उडाली असून, या प्रकरणी अर्धापूर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
17 Oct 2026 11:50 AM (IST)
शनल मेडिकल कमिशनने (NMC) एमबीबीएसच्या पहिल्या वर्षाच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा दिला आहे. वर्ष २०१९-२० आणि त्यानंतर प्रवेश घेतलेल्या वैद्यकीय विद्यार्थी/विद्यार्थिनींना प्रथम वर्षाची परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी एक अतिरिक्त अटेम्प्ट मिळणार आहे.
आता प्रथम वर्षाची परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी ५ संधी मिळतील, तर आधी केवळ चारच संधी मिळत होत्या. ही सूट त्या विद्यार्थ्यांनाही मिळेल, ज्यांनी प्रथम वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी ठरवून दिलेला ४ वर्षांचा कालावधी ओलांडला आहे, पण त्यांचा प्रवेश वैध असावा आणि संबंधित विद्यापीठ किंवा महाविद्यालयाने तो रद्द केला नसेल.
17 Oct 2026 11:40 AM (IST)
पुणे : महाराष्ट्रात अमली पदार्थांची तस्करी करणार्या आंतरराज्यीय आणि आंतरराष्ट्रीय टोळ्यांविरुद्ध राज्याच्या अमली पदार्थविरोधी टास्क फोर्सने (एएनटीएफ) धडक मोहीम उघडली आहे. जानेवारी ते ऑक्टोबर २०२६ या नऊ महिन्यांच्या कालावधीत १०५ आरोपींना अटक करण्यात आली असून, तब्बल १३ कोटी ९१ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यामध्ये १२ कोटी ११ लाख रुपयांचे अमली पदार्थ, तर १ कोटी ८० लाख रुपयांच्या इतर ऐवजाचा समावेश आहे. विशेष पोलीस महानिरीक्षक ज्योतिप्रिया सिंह यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
17 Oct 2026 11:30 AM (IST)
युवा भारतीय फलंदाज वैभव सूर्यवंशीला वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी-२० मालिकेत खेळण्याची संधी मिळालेली नाही. आतापर्यंत चार सामने खेळले गेले आहेत आणि या चारही सामन्यांमध्ये वैभवला बेंचवर बसवण्यात आले आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेत त्याला अंतिम ११ खेळाडूंमध्ये स्थान मिळाले होते, पण वेस्ट इंडिजविरुद्ध भारतीय संघ संजू सॅमसन आणि अभिषेक शर्मा यांच्यासोबत डावाची सुरुवात करत आहे.
संजू सॅमसनने एक सामना सोडल्यास कोणत्याही सामन्यामध्ये चांगली कामगिरी केली असल्याचे दिसून आले नाही. दरम्यान वैभवकडे प्रतिभा असतानाही त्याला बेंचवर बसवून ठेवण्यात आल्याचे दिसून येत असल्याची टीका सर्व स्तरातून होत आहे. काही दिग्गज खेळाडूंनीदेखील यावर भाष्य केल्याचं दिसून आलं.
17 Oct 2026 11:20 AM (IST)
IIT आणि NIT या दोन्ही संस्था भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयांतर्गत येणाऱ्या स्वायत्त (Autonomous) आणि केंद्रशासित निधी प्राप्त (Centrally Funded) संस्था आहेत. त्यांना देशात ‘राष्ट्रीय महत्त्वाच्या संस्था’ (Institutes of National Importance) चा दर्जा प्राप्त आहे.
IIT ची फी: IIT मध्ये ४ वर्षांच्या B.Tech कोर्सची एकूण ट्यूशन फी आणि हॉस्टल/इतर खर्च मिळून साधारणपणे ८ लाख ते १२ लाख रुपयांच्या दरम्यान खर्च येतो.
17 Oct 2026 11:10 AM (IST)
डेटा सेंटरचे स्थलांतर आणि तांत्रिक प्रणालीचे अद्ययावतीकरण करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या ‘आपले सरकार’ पोर्टलवरील सेवा तात्पुरत्या बंद केल्या जाणार आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, १६ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी ४ ते २१ ऑक्टोबर २०२६ या कालावधीसाठी पोर्टलवरील सेवा बंद राहणार आहे.
17 Oct 2026 11:01 AM (IST)
व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता यात टोल कर्मचारी ट्रकचालकाकडे टोल मागताना दिसतो. कर्मचारी खोटं चलान मागत असल्याचे ट्रकचालकाला समजते आणि म्हणूनच गाडी न थांबवता तो सरळ पुढे निघून जातो. यात घडतं असं की, टोल कर्मचारी ट्रकचालकाचा पाठलाग करु पाहतो. पैसे घेतल्याशिवाय तो ट्रकचालकाला पुढे जाऊन देण्यास तयार नसतो. यासाठी तो ट्रकचालाकाला गाडी थांबवण्यासाठी आवाज देतो आणि नंतर थेट चालू गाडीत खिडकीला लटकून तो चालकाकडून चलन मागायला सुरुवात करतो. या क्षणी चालक भडकतो आणि सपासप कर्मचाऱ्याला कानशिलात बडवण्यास सुरुवात करतो. चालक इतक्या ताकदीने कर्मचाऱ्यावर हल्ला करतो की पाहून यूजर्सच्या अंगावर काटा येतो. ही घटना आता इंटरनेटवर चांगलीच ट्रेंड करत आहे.
17 Oct 2026 10:51 AM (IST)
देशातील सर्वात मोठी आणि प्रतिष्ठित इंजिनिअरिंग प्रवेश परीक्षा JEE Main 2027 ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. NTA लवकरच JEE Mains 2027 साठी ऑनलाइन नोंदणी (रजिस्ट्रेशन) प्रक्रिया सुरू करणार आहे. मीडिया रिपोर्ट्स आणि मागील ट्रेंड्सनुसार, अर्ज फॉर्म ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात किंवा नोव्हेंबरच्या सुरुवातीला अधिकृत वेबसाइटवर जारी केले जातील. जे विद्यार्थी IIT, NIT आणि इतर टॉप इंजिनिअरिंग महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेऊ इच्छितो, त्यांनी वेळेतच आपली सर्व आवश्यक कागदपत्रे तयार ठेवावीत जेणेकरून फॉर्म भरताना कोणतीही चूक होणार नाही.
17 Oct 2026 10:41 AM (IST)
भारत आणि झिम्बाब्वे महिला संघांमधील पहिला टी२० सामना रायपूरमध्ये खेळला गेला. भारतीय महिला संघाने हा सामना ४ गडी राखून जिंकला. या विजयामुळे टीम इंडियाने मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. टीम इंडियाच्या विजयात दीप्ती शर्मा आणि पदार्पण करणाऱ्या निकी प्रसाद यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. प्रथम फलंदाजी करताना झिम्बाब्वेने भारतासमोर ११६ धावांचे लक्ष्य ठेवले. टीम इंडियाने हे लक्ष्य १५.४ षटकांत ६ गडी गमावून पूर्ण केले. या सामन्यात निकी प्रसादने दीप्ती शर्मासोबत एक नवीन फलंदाजीचा विक्रमही रचला.
17 Oct 2026 10:31 AM (IST)
नागपूरला भंडारा, छत्तीसगड, ओडिशा आणि पश्चिम बंगालशी जोडणाऱ्या महत्त्वाच्या मार्गाच्या विस्ताराला आता गती मिळणार आहे. मुंबई-कोलकाता राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वरील ४९९.८०० ते ५४१.८०० किलोमीटरदरम्यानचा नागपूर-वैनगंगा मार्ग अत्याधुनिक सिक्स लेन एक्सप्रेस-वे म्हणून विकसित करण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (एनएचएआय) निविदा प्रक्रिया सुरू केली आहे.
17 Oct 2026 10:30 AM (IST)
शिवसेना शिंदे गटात मोठे फेरबदल होणार असल्याची माहिती समोर आली आहे. सरकार स्थापन होऊन अडीच वर्षांचा कालावधी होणार असल्याने हे फेरबदल होणार असल्याचे बोलले जात आहे. तसेच, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आकार्यक्षम मंत्र्यांबाबत नाराज असल्याने हे फेरबदस केले जाणार असल्याचे सांगितले जात आहे.
17 Oct 2026 10:21 AM (IST)
देशातील लोकशाही व्यवस्था, भारतीय संविधानाची मूल्ये आणि राष्ट्रीय एकात्मता यांचे रक्षण करण्याच्या महत्त्वपूर्ण उद्देशाने अखिल भारतीय विद्यार्थी परिषदने (अभाविप) मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पस येथील मुख्य प्रवेशद्वाराजवळ ‘अराजकता रोको – लोकतंत्र बचाओ! या घोषवाक्याखाली भव्य स्वाक्षरी अभियान व शांततापूर्ण निदर्शने शुक्रवारी करण्यात आली.
17 Oct 2026 10:20 AM (IST)
जागतिक स्तरावर भारतासाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाशी संबंधित निर्यातीवर लादण्यात येणारे अनेक निर्बंध आणि अतिरिक्त शुल्क स्थगित केले आहेत. ट्रम्प यांनी गेल्या महिन्यात स्वाक्षरी केलेल्या कायद्यानुसार हे निर्बंध लागू केले जाणार होते, ज्याचा मोठा फटका भारतासारख्या रशियाकडून आयात करणाऱ्या देशांना बसण्याची शक्यता होती.
शुक्रवारी रात्री उशिरा जारी केलेल्या विशेष कार्यकारी आदेशात ट्रम्प यांनी या निर्णयाची घोषणा केली. "मी ग्रॅहम कायद्यांतर्गत (Graham Act) लादलेले हे निर्बंध आणि शुल्क रद्द करत आहे. या वेळी अशी सूट देणे अमेरिकेच्या राष्ट्रीय हिताचे आहे, असे प्रमाणपत्र मी काँग्रेसला सादर केले आहे," असे ट्रम्प यांनी स्पष्ट केले.
17 Oct 2026 10:11 AM (IST)
घणसोली एमआयडीसी परिसरातील औराम येथील क्यू रेसिडेन्सीमध्ये भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या वावरामुळे रहिवाशांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम होत असल्याची तक्रार समोर आली आहे. विशेषतः लहान मुले, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना परिसरातून ये-जा करताना सावध राहावे लागत असल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे.






