कल्याण-डोंबिवली : शहरातील कोणत्याही भागातून कोणत्याही व्यक्तीला मुख्य हायवेला पोचता यावे यासाठी बायपास, अंतर्गत रस्ते तयार झाले पाहिजेत अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केडीएमसी आयुक्तांना दिल्या आहेत. पुढे बोलताना त्यांनी सर्वसामान्य नागरिकांच्या सोयीसाठी विकासकामे करताना निधी कमी पडणार नसल्याचे आश्वासन पुन्हा एकदा दिले. कल्याण पूर्वेत आयोजित कल्याण महोत्सवाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट दिली यावेळी ते बोलत होते. या प्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कल्याण महोत्सवाला शुभेच्छा दिल्या.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी श्रीकांत शिंदे यांचे कौतुक केले
यावेळी ते बोलताना त्यांनी शहरातील नागरिकांना चांगले रस्ते, पाणी, दिवा बत्ती व विरंगूळयाची साधने मिळाली पाहिजेत यासाठी कल्याण लोकसभेला भरघोस निधी दिल्याचे त्यांनी संगीतले. या निधीतून जनतेला न्याय देण्याचे काम केले जात असून कल्याण लोकसभा मतदार संघात अनेक प्रकल्प पूर्ण झाले असून अनेक प्रकल्प होऊ घातले आहेत. खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे प्रचंड काम करत असलयाचे सांगत मुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांचे कौतुक केले.
जिल्ह्यात तुम्हीच मुख्यमंत्री बनून काम करा
मुख्यमंत्री म्हणून आपल्याला महाराष्ट्रात फिरायचे असल्याने ठाणे जिल्ह्यात नागरिकांनी मुख्यमंत्री म्हणून काम करावे असे आवाहन त्यांनी केले.
राज्याच्या प्रत्येक शहरात स्वच्छता मोहीम राबविणार
मुंबईत स्वच्छतेला प्राधान्य देताना डिप क्लीन मोहीम राबविली असून हळूहळू प्रत्येक शहरात हे अभियान राबविले जाणार आहे. कारण आरोग्याच्या दृष्टीने स्वच्छता महत्वाची असल्याचे ते म्हणाले. २०१४ मध्ये मोदीनी स्वच्छतेचे अभियान राबविले होते. त्यावेळी काही जणांनी टीका केली होती की हा फोटो सेशनचा कार्यक्रम आहे. पण आज देशाला स्वच्छतेचे महत्व पटलेले आहे. यामुळेच मुंबई स्वच्छ करताना ठाणे जिल्हा देखील मागे राहणार नाही यादृष्टीने जे जे काही करायचे ते करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
तर केडीएमसी आयुक्तांना त्यांनी शिल्लककामे मार्गी लावण्याकडे लक्ष देण्याच्या सूचना दिल्या. आयुक्त म्हणून कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीतील कामे शिल्लक असतील त्याकडे लक्ष द्या. वाहतूक कोंडी फोडण्यासाठी आवश्यक कामे करण्यासाठी लागणाऱ्या निधीची मागणी करा अशा सूचना त्यांनी केल्या. कोणताही माणूस १० मिनिटांत मुख्य हायवेपर्यंत पोचला पाहिजे. असे अंतर्गत रस्ते बायपास झाले पाहिजेत त्यासाठी निधी कमी पडणार नाही सरकार सर्वसामान्यांना न्याय देणारे सरकार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले.






