‘इंडिया हाऊस’ महाराष्ट्र शासन ताब्यात घेणार (फोटो- सोशल मीडिया)
लंडनमधील “इंडिया हाऊस” महाराष्ट्र शासन ताब्यात घेणार
इंडिया हाऊस’मध्ये स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे वास्तव्य
सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार यांची माहिती
मुंबई: भारतीय स्वातंत्र्यसैनिकांचे वास्तव्य असलेले लंडनमधील “इंडिया हाऊस” महाराष्ट्र शासन ताब्यात घेऊन त्यास स्मारक म्हणून जतन करेल. या ‘इंडिया हाऊस’मध्ये स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे वास्तव्य होते, अशी माहिती सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार यांनी दिली.
सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.शेलार हे नागपूरकरचे रघूजीराजे भोसले यांची ऐतिहासिक तलवार आणण्यासाठी लंडन दौऱ्यावर होते, तेव्हा त्यांनी इंडिया हाऊसला भेट दिली होती. त्यावेळी लंडनस्थित भारतीयांनी ही बाब त्यांच्या निदर्शनास आणून दिली होती. तसेच नाशिकच्या आमदार देवयानी फरांदे यांनीही ही मागणी केली होती. याबाबत आमदार देवयानी फरांदे, सामान्य प्रशासन, सांस्कृतिक कार्य, पुरातत्व विभागासह संबंधित विभागाचे अधिकारी यांच्या उपस्थितीत संयुक्त बैठक घेऊन आढावा घेण्यात आला.
“मित्रा”च्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करून त्यात सामान्य प्रशासन विभाग, सांस्कृतिक कार्य विभाग, पुरातत्व विभाग आणि वित्त विभागाचा सहभाग असेल. ही समिती ‘इंडिया हाऊस’ ताब्यात घेण्याबाबतचा सर्वंकष अहवाल तयार करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सादर केल्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येणार,अशी माहिती यावेळी देण्यात आली.
रामटेक फिल्मसिटीसाठी जागेचा प्रश्न सुटेना?
विदर्भात चित्रपट निर्मिती आणि रोजगाराची संधी उपलब्ध होण्यासाठी रामटेक येथे चित्रनगरी उभारण्यात येत आहे. मात्र या चित्रनगरीसाठी येत्या दोन महिन्यात जमीन हस्तांतरित करण्याचा आणि प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार नेमण्यासंदर्भात निर्णय घेण्यात आला होता. मात्र, हा कालावधी लोटल्यानंतरही अद्याप जागेचा प्रश्न सुटेनासा झाला आहे. तर, जागेचा तिढा सुटत नसल्याने प्रकल्प सल्लागाराचीही नियुक्ती रखडली आहे.
राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री अॅड. आशिष शेलार यांनी नागपुरात येऊन ही घोषणा केली होती. परंतु गेल्या दोन महिन्यात विदर्भांतील सांस्कृतिक क्षेत्रासाठी अत्यंत महत्वाच्या ठरू पाहणाऱ्या या प्रकल्पाचे नेमके काय होणार, याबद्दल नागपूरवासियांसह वैदर्भीय कलावंतांचेही लक्ष लागले आहे.
रामटेक जवळच्या नवरगाव येथे प्रस्तावित चित्रनगरीच्या जागेची पाहणी सांस्कृतिक कार्यमंत्री शेलार यांनी केली होती. त्यानंतर त्यांनी दोन महिन्यात जमीन हस्तारण व प्रकल्प सललागार नियुक्तीची घोषणा केली होती. रामटेकच्या प्राचीन गड मंदिर परिसरात भाविकांसाठी अद्ययावत सोयी सुविधा उभारण्यासंदर्भात पाठपुरावा करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.






