दीनानाथ मंगेशकर रूग्णालयावर कारवाई कधी होणार (फोटो- सोशल मिडिया)
पुणे: काही दिवसांपूर्वी पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रूग्णालयात गर्भवती महिलेचा उपचार न मिळाल्याने मृत्यू झाला होता. या प्रकरणानंतर राज्यभरतून संताप व्यक्त केला जात आहे. तसेच मंगेशकर रूग्णालयावर कारवाई कधी केली जाणार? असा सवाल आता नागरिक उपस्थित करत आहेत. दरम्यान आता राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
राज्य सरकारने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. तीन विभागाकडून मंगेशकर रूग्णालयाची चौकशी केली जात आहे. यावर आता आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. रूग्णालयाची चौकशी सुरू आहे. हे रूग्णालय धर्मादाय कायद्याच्या अंतर्गत सुरू झाले आहे. राज्याचा कायदा विभाग देखील त्याची चौकशी करत आहे, असे आरोग्यमंत्री म्हणाले.
कायदा विभाग, आरोग्य विभाग आणि ससून रूग्णालयाचा अहवाल प्राप्त झाल्यावर दीनानाथ मंगेशकर रूग्णालयावर कारवाई केली जाईल. रूग्णाला ज्या पद्धतीने त्रास झाल्या त्यामुळे कारवाई व्हावि अशी मागणी आहे. मात्र वस्तुस्थिती पाहूनच कारवाई केली जाईल. पुढील काही दिवसांत अहवाल प्राप्त होईल. त्यानंतरच कारवाई संदर्भात पावले उचलली जातील, असे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर म्हणाले.
काय आहे ससूनचा अहवाल?
ससून रूग्णालयाने या प्रकरणातील 6 पानी अहवाल पुणे पोलिसांकडे सादर केला आहे.ससून रूग्णालयाच्या वैद्यकीय समितीने मंगेशकर रूग्णालय घटनेतील 6 पानांचा अहवाल सादर केला आहे. या अहवालात समितीने दीनानाथ मंगेशकर रूग्णालय आणि डॉक्टर सुश्रुत घैसास यांच्यावर ठपका ठेवण्यात आला नसल्याचे समोर येत आहे. अहवाल सादर झाल्यानंतर पुणे पोलिसांनी ससून रूग्णालयाकडे चार गोष्टींबाबत अभिप्राय मागितला आहे.
पुण्यातील तनिषा भिसे यांच्या मृत्यू प्रकरणी ससून हॉस्पिटलचा अहवाल वैद्यकीय शिक्षण सचिवांना सादर केला गेला आहे. मंगेशकर रूग्णालयात वैद्यकीय हलगर्जीपणा झाला का याचा तपास करण्यात आला. याआधी तीन समित्यांचे अहवाल सादर करण्यात आला आहे. त्यामध्ये दोन अहवालात मंगेशकर रूग्णालयावर ठपका ठेवण्यात आला आहे.
डॉक्टर सुश्रुत घैसास यांना पोलिस संरक्षण
दिनानाथ मंगेशकर रुग्णालयातील घटनेचा ससून रुग्णालयाच्या उच्च स्तरीय समितीचा अहवाल प्राप्त होईल. त्यात कोणी दोषी असेल तर कारवाई केली जाणार आहे, असे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी म्हटले आहे. दरम्यान या प्रकरणात एक नवीन माहिती समोर येत आहे. या प्रकरणात डॉक्टर सुश्रुत घैसास यांच्यावर आरोप होत आहेत. दरम्यान डॉक्टर घैसास यांनी पोलिसांकडे सुरक्षेची मागणी केली होती.
पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रूग्णालयात एका गर्भवती महिलेचा उपचार न मिळाल्याने मृत्यू झाला होता. या प्रकरणी राज्यभरातून संताप व्यक्त होत आहे. दरम्यान या प्रकरणात डॉक्टर सुश्रुत घैसास यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यानंतर डॉक्टर घैसास यांनी पोलिसांकडे सुरक्षेची मागणी केली आहे. आपल्या जीवाला धोका असल्याने डॉक्टर सुश्रुत घैसास यांनी पुणे पोलिसांकडे सुरक्षेची मागणी केली आहे. दरम्यान पोलिसांनी ही मागणी मान्य केली आहे. पुणे पोलिसांनी एक कर्मचारी डॉक्टर घैसास यांच्या सुरक्षेसाठी नियुक्त केला आहे.