कर्जत जामखेडमध्ये भरणार कुस्तीचा महासंग्राम, पुन्हा एकदा महाराष्ट्र केसरी स्पर्धा
Maharashtra Kesari Competition : गेल्या 65 वर्षांपासून महाराष्ट्र केसरी स्पर्धा भरवत असलेल्या महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेने यंदाही ही स्पर्धा अहिल्यानगरमध्ये भरवण्याचे ठरवले आहे. यानिमित्त मी महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेला ही स्पर्धा आमच्या मतदारसंघात भरवण्याची विनंती केली होती, याला मान्यता देत कुस्तीगीर परिषदेने ही स्पर्धा कर्जत जामखेडमध्ये भरवण्यास परवानगी दिली, अशी माहिती आमदार रोहित पवार यांनी दिली.
यांचा जन्मच दोन वर्षांपूर्वी झालाय
दोन-दोन महाराष्ट्र केसरी स्पर्धा होत असल्याने कुस्तीपटूंना नेमका प्रश्न पडलाय की, कोणती स्पर्धा योग्य आहे. हाच धागा पकडत आमदार रोहित पवार यांनी नुकत्याच भरवलेल्या महाराष्ट्र कुस्तीगीर संघावर जोरदार टीकास्त्र सोडत त्यांनी भरवलेली स्पर्धा बेकायशीर असल्याचे सांगितले. या स्पर्धेची सुरुवात कोणी केली, आता ज्यांचा जन्मच 2 वर्षांपूर्वी झालाय त्यांना काय हक्क आहे. मी फक्त आयोजन करीत आहे या स्पर्धेचे नियोजन महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद करणार आहे. त्यामुळे कुस्तीपटूंना केवळ व्यासपीठ मिळवण्याच्या हेतूने मी या सर्व स्पर्धेत उतरलो आहे. तथा यामध्ये माझा कोणताही हस्तक्षेप राहणार नाही. या स्पर्धेचे नियोजन केवळ आणि केवळ महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे पदाधिकारी आणि पंच पाहणार आहेत.
त्यांची स्पर्धा असंवैधानिक
आम्ही ही स्पर्धा कुस्तीपटूंच्या हितासाठी भरवत आहोत त्यामुळे कोणत्याही खेळाडूवर आम्ही बंदी घातली नाही. या स्पर्धेचा जन्मच खेळाडूंच्या हितासाठी झाला असल्याची माहिती, महाराष्ट्र कुस्ती परिषदेचे माजी सचिव बाळासाहेब लांडगे यांनी दिली. आम्ही ही स्पर्धा गेली अनेक वर्षे भरवत आहोत. आम्हाला महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनची आम्हाला मान्यता आहे. तसेच भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनची मान्यता आहे. त्यामुळे आम्ही गेली 65 वर्षे ही स्पर्धा भरवत आहोत. आता त्यांनी खेळाडूंना या स्पर्धेत सहभागी न होण्यासाठी एक फतवा काढला आहे जो पूर्णपणे असंवैधानिक आहे.