धाराशिव : धाराशिवमध्ये 65 व्या महाराष्ट्र कुस्ती स्पर्धेचा (Maharashtra Kesari) थरार रंगणार आहे. यावर्षी 1 ते 5 नोव्हेंबर दरम्यान ही स्पर्धा होणार आहे. महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेने ही घोषणा केली आहे. धाराशिव जिल्ह्याला पहिल्यांदा या स्पर्धेचा मान मिळाला आहे. एकूण पाच दिवस ही स्पर्धा (Kusti Spardha) चालणार असून, धाराशिव जिल्हा कुस्ती तालीम संघ आणि आदर्श शिक्षक प्रसारक मंडळ या स्पर्धेचे आयोजन करणार आहेत.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह राज्यातील अनेक नेत्यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र कुस्ती स्पर्धा पार पडणार आहे. तुळजाभवानी क्रीडा संकुलाच्या मैदानावर होणाऱ्या या स्पर्धेत जवळपास 900 कुस्तीपटू सहभागी होणार आहेत. आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ आणि उस्मानाबाद तालीम संघ यांच्या वतीने या स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे, अशी माहिती आयोजकांनी दिली आहे.
गेल्यावर्षी महाराष्ट्र केसरी स्पर्धा पुण्यात पार पडली होती. पंचांच्या निर्णयामुळे त्या स्पर्धेची बराच काळ चर्चा सुरु राहिली होती. आता यंदा धाराशिव जिल्ह्याला पहिल्यांदाच महाराष्ट्र केसरी स्पर्धा आयोजन करण्याचा मान मिळाला आहे. महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेच्या झालेल्या सर्वसाधारण सभेत हा ठराव मंजूर झाल्यानंतर याची घोषणा करण्यात आली.