Today's Maharashtra Breaking News Updates in marathi 12.09.2026
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि आरक्षण मुद्द्यांवरून राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. नेपाळ-तिबेट सीमेवरील भीषण ढगफुटी आणि महापुरातील मृतांचा आकडा २७० वर पोहोचला असून, बाधित भागांत आंतरराष्ट्रीय मदत व बचावकार्य युद्धापातळीवर सुरू आहे.सप्टेंबरच्या सुरुवातीलाच महाराष्ट्रातील बहुतांश भागात पावसाचा जोर ओसरला असून केवळ हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे.
जागतिक बाजारातील संमिश्र संकेतांमुळे आज निफ्टी व सेन्सेक्समध्ये काहीशी घसरण पाहायला मिळत असली तरी बँक निफ्टीने तेजी कायम ठेवली आहे. १ सप्टेंबरपासून देशात एलपीजी सिलिंडरचे दर, विमान इंधन (ATF) आणि तबेला दूध दरात वाढ यासह ५ महत्त्वाचे आर्थिक नियम लागू झाले आहेत.
01 Sep 2026 04:27 PM (IST)
नेपाळनंतर आता पावसाने उत्तराखंडमधील अल्मोडा जिल्ह्यात पावसानंतर झालेल्या भूस्खलनाने एकाच कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. हवालबाग विकासखंडातील उडयूडा ग्रामपंचायतीत मंगळवारी (1 सप्टेंबर 2026) सकाळी डोंगरावरून मोठ्या प्रमाणात मलबा खाली आला आणि थेट एका घरात घुसला. या दुर्घटनेत घरामध्ये असलेली आई आणि तिची दोन मुले मलब्याखाली दबली. तिघांचाही मृत्यू झाल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.
01 Sep 2026 04:17 PM (IST)
मंबई: फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत युवा डॉ. राजेंद्र जगन्नाथ रुपनवर (वय २७) यांचा सोमवारी मृत्यू झाला. वरिष्ठांकडून होत असलेल्या कथित त्रासाबाबत त्यांनी तक्रार केली होती. त्यांच्या मागे राहिलेल्या चिठ्ठीत माजी मंत्री तानाजी सावंत यांच्या ओएसडीवर आरोप करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणामुळे वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली असून, आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.
01 Sep 2026 04:10 PM (IST)
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी, १ सप्टेंबर २०२६ रोजी राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत राज्याच्या विविध विभागांशी संबंधित चार महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. बैठकीला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार उपस्थित होत्या. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मात्र बैठकीला उपस्थित राहू शकले नाहीत. मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णयांमध्ये अंमली पदार्थांविरोधातील धोरण, सरकारी कार्यक्रमांमधील आरोग्यदायी अन्नपदार्थ, सोलापूरमधील उन्नत मार्ग आणि कुकडी पाटबंधारे प्रकल्पाचा सुधारित खर्च यांचा समावेश आहे.
01 Sep 2026 04:08 PM (IST)
नीट पेपरफुटीवरून दिल्ली आणि देशभरात सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने एक महत्त्वपूर्ण आदेश दिला आहे. कलम १४२ अंतर्गत असलेल्या अधिकारांचा वापर करून, सर्वोच्च न्यायालयाने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांविरुद्ध दाखल केलेले एफआयआर रद्द करण्याचे आदेश दिले आहेत. भारताच्या सरन्यायाधीशांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी केली. वाचा सविस्तर...
01 Sep 2026 04:00 PM (IST)
मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर सरकारचे शिष्टमंडळ अंतरवाली सराटीसाठी रवाना होणार
मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, उदय सामंत, प्रसाद लाड शिष्टमंडळात असणार
मनोज जरांगेंच्या मागण्यांसंदर्भात राज्य सरकारकडून त्यांच्यासोबत चर्चा केली जाणार
01 Sep 2026 03:55 PM (IST)
राज ठाकरेंच्या शिवतीर्थ निवासस्थानाबाहेर पोलीस बंदोबस्तमनसेचे कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित पुण्यातील घटनेनंतर भाजप युवामोर्चाची आंदोलनाची हाकआंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मनसैनिक सज्ज
01 Sep 2026 03:45 PM (IST)
मुंबईत मनसे विरुद्ध भाजप राजकीय वाद पेटणारभाजपा युवा मोर्चा करणार माहिममध्ये निषेध आंदोलनअमित ठाकरेंविरुद्ध भाजप युवा मोर्चा आक्रमकपुण्यात पंतप्रधान मोदींचा फोटो हटवल्याचा करणार निषेधयुवा मोर्चा महाराष्ट्र अध्यक्ष कृष्णराज महाडिक आणि मुंबई अध्यक्ष दीपक सिंह यांकडून आंदोलनाची हाक
01 Sep 2026 03:40 PM (IST)
Maharashtra Politics : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी राजकीय उलथापालथ होण्याची चर्चा सुरू झाली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे तब्बल १४ आमदार आगामी नवरात्रीपूर्वी शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचा दावा शिंदेसेनेतील एका बड्या नेत्याने केला आहे. या दाव्यामुळे ठाकरे गटाच्या राजकीय भवितव्याबाबत चर्चांना उधाण आले आहे.
01 Sep 2026 03:30 PM (IST)
NIC Recruitment 2026: इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकारच्या अंतर्गत येणाऱ्या नॅशनल इन्फॉर्मेटिक्स सेंटरने देशभरातील पात्र उमेदवारांसाठी एक महत्त्वपूर्ण भरती जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या जाहिरातीनुसार ‘सायंटिफिक/टेक्निकल असिस्टंट-ए’ (Scientific/Technical Assistant-A) या गट-ब (राजपत्रित नसलेल्या) पदांसाठी थेट भरतीद्वारे अर्ज मागवण्यात आले आहेत. या पदांसाठी निवड प्रक्रियेत उमेदवारांना लेव्हल-६ (रु. ३५,४०० ते रु. १,१२,४००) नुसार वेतन मिळणार आहे.
01 Sep 2026 03:15 PM (IST)
ठाणे महानगरपालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील ढिसाळ कारभार आणि निष्काळजीपणा पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. रुग्णालयातील वॉर्ड क्रमांक ६ मध्ये उपचारासाठी दाखल असलेल्या एका रुग्णाला रात्री दिलेल्या जेवणाच्या ताटात चक्क झुरळ आढळून आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या किळसवाण्या प्रकारामुळे रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांमध्ये संतापाची लाट उसळली असून, निष्काळजी आहार पुरवठादार ठेकेदाराला तत्काळ काळ्या यादीत टाकून संबंधित रुग्णालय अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केली आहे.
01 Sep 2026 03:01 PM (IST)
Nagpur Bomb Threat : शहरातील १६ शाळा आणि जिल्हाधिकारी कार्यालयासह १९ ठिकाणी बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी मिळाल्यानंतर सोमवारी सकाळपासूनच पोलिस यंत्रणा सतर्क झाली. संबंधित शाळांसमोर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यासोबतच सघन शोधमोहीम राबविण्यात आली.
01 Sep 2026 02:59 PM (IST)
रिझर्व बँकेने जालना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेस नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी 50 हजार रुपये दंड ठोठावला आहे. तसे आदेश जारी करण्यात आले आहे. क्रेडिट इन्फॉर्मेशन कंपन्यांना माहिती देण्यात त्रुटी तसेच या कंपन्यांमधील सदस्यत्व आणि केवायसी संदर्भातील रिझर्व बँकेच्या काही निर्देशांचे पालन बँकेकडून झाले नसल्याचे तपासणीत आढळल्याने ही कारवाई करण्यात आली आहे.
01 Sep 2026 02:49 PM (IST)
केंद्रातील मोदी सरकारची क्रिमीलेअर आणि आरक्षणाच्या मुद्द्यावर ओबीसीविरोधी मानसिकता पुन्हा एकदा समोर आली. सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट आदेश देऊनही अंमलबजावणीऐवजी सरकार न्यायालयात पुनर्याचिका दाखल करत आहे. यामुळे केंद्रीय लोकसेवा आयोग (यूपीएससी) उत्तीर्ण सुमारे 980ओबीसी विद्यार्थ्यांचे आयएएस व आयपीएस होण्याचे स्वप्न धोक्यात आले आहे, असा आरोप काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी माध्यमांशी बोलताना केला.
01 Sep 2026 02:40 PM (IST)
जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज चौथा दिवस आहे... त्यांच्या तपासणीसाठी वैद्यकीय पथक आलं होतं.. मात्र जरांगेंनी त्यांना तपासणी करण्यास नकार दिला आहे...
01 Sep 2026 02:30 PM (IST)
मुंबईकरांना महागाईचा जोरदार फटका बसलाय... CNG-PNGच्या दरात वाढ झालीय. आजपासून हे दर लागू झालेत... एवढंच नाही तर ऑटो-टॅक्सीनं प्रवास करणाऱ्यांनाही फटका बसलाय... दूध दरही 1, 2 रुपयांनी नाही तर तब्बल 9 रुपयांनी वाढलेत. त्यामुळे महागाईच्या या माऱ्यामध्ये जगायचं कसं असा सवाल मुंबईकर करतायत.
01 Sep 2026 02:21 PM (IST)
आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थितीत राहणार नसल्याची माहिती मिळत आहे. शिंदे दिल्ली दौऱ्यावर जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. आज कॅबिनेट बैठक आहे मात्र, या बैठकीत आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मात्र, अनुपस्थितीत राहतील.
01 Sep 2026 02:10 PM (IST)
पुणेकरांचाही प्रवास आजपासून महागलाय. आजपासून पुण्यात रिक्षाच्या प्रवास दरात वाढ कतरण्यात आलीय. पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये ही दरवाढ झालीय. नवीन दरानुसार किमान भाडं 25 रुपयांवरून 30 रुपये करण्यात आलंय. तर प्रवासासाठी प्रति किलोमीटर 17 रुपयांऐवजी 20 रुपये आकारले जाणार आहेत. त्यामुळे दररोज रिक्षानं प्रवास करणाऱ्या पुणेकरांच्या खिशावर अतिरिक्त भार पडलीय.
01 Sep 2026 02:00 PM (IST)
सध्या साखरेचे दर वाढलेले आहेत. अशा परिस्थितीत सातारा जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने ऊस उत्पादन घेतले असून,साखर कारखान्यांना ऊस पुरवठा करूनही शेतकऱ्यांना त्यांच्या उसाचा योग्य मोबदला अद्याप मिळत नाही. त्यामुळे साखर कारखानदारांनी त्यांचा आर्थिक फायदा न पाहता वाढलेल्या साखर दराच्ग योग्य वाटा ऊस उत्पादक शेतकऱ्यांनाही द्यावा अशी मागणी रयत क्रांती संघटनेचे जिल्हा युवक अध्यक्ष प्रकाश उर्फ सोनू साबळे यांनी निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी सातारा यांच्याकडे केले आहे.
01 Sep 2026 01:55 PM (IST)
सिंधुदुर्ग किल्ल्याच्या परिसरात मासेमारीसाठी गेलेल्या सागरिका नौकेला पहाटेच्या सुमारास भीषण अपघात झाला. नौका अचानक बुडाल्याने भाजपचे मालवण तालुका उपाध्यक्ष तथा नौका मालक सन्मेश सुरेश परब आणि खलाशी अक्षय हनुमंत राणे यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. सन्मेश परब यांचा मुलगा सुयोग हा देखील नौकेत होता. जवळील मच्छीमारांनी प्रसंगावधान राखत त्याला सुखरूप बाहेर काढल्याने त्याचा जीव वाचला.
01 Sep 2026 01:45 PM (IST)
राज्यातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ असलेल्या माथेरानमध्ये अनेक रस्त्यांवरील पथदिवे बंद पडल्याने रात्रीच्या वेळी शहरातील रस्त्यांवर अंधाराचे साम्राज्य पसरत आहे. वर्षभर पर्यटकांची वर्दळ असलेल्या माथेरानमध्ये पथदिव्यांची ही अवस्था असल्याने पर्यटकांना अंधारातून वाट काढत हॉटेल किंवा इच्छित स्थळी जावे लागत आहे. या परिस्थितीबाबत माथेरान नगरपरिषदेच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली जात आहे.
01 Sep 2026 01:35 PM (IST)
राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित गट) कोअर कमिटीची महत्त्वपूर्ण बैठक सोमवारी पार पडली. पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा तथा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत पक्ष संघटना मजबूत करण्यासह आगामी राजकीय रणनीतीवर सविस्तर चर्चा झाली. यावेळी पक्षातील अंतर्गत शिथिलतेवर सुनेत्रा पवार यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत नेते आणि पदाधिकाऱ्यांचे कान टोचले.
01 Sep 2026 01:30 PM (IST)
झी ग्रुपचे संस्थापक सुभाष चंद्रा यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्यूनच्या 5 सदस्यीय विशेष खंडपीठ NCLT कडून त्यांना मोठा झटका बसला आहे. 22006 कोटी रुपयांच्या एकून दाव्यांविरुद्ध केवळ 6.25 कोटी रुपयांमध्ये कर्ज सेटलमेंट करण्याच्या 25 ऑगस्टच्या आदेशाला NCLT ने स्थगिती दिली आहे. यासोबतच त्यांनी चंद्रा यांना कोणतीही मालमत्ता प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे विकण्यास किंवा हस्तांतरित करण्यात बंदी घालत फासा आणखीनच आवळला आहे. नेमकं प्रकरण काय आहे? या प्रसंगी नेमकं काय घडलं सविस्तर जाणून घेऊया.
01 Sep 2026 01:25 PM (IST)
महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे (MNS) अध्यक्ष अमित ठाकरे यांच्यासह मनसैनिकांवर पुणे पोलिसांवर मोठी कारवाई केली आहे. अमित ठाकरे यांच्यासह मनसैनिकांवर सोमवारी पुण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर चतुःशृंगी पोलिसांनी प्रशांत कनोजिया आणि विक्रांत भिलारे या दोन मनसैनिकांना अटक केल्याची माहिती समोर आली आहे.
01 Sep 2026 01:15 PM (IST)
माझ्यासोबत लग्न केले नाही तर तुझ्या आई-वडिलांना मारून टाकीन, अशी धमकी देत १८ वर्षीय तरुणीचे अॅम्ब्युलन्समधून अपहरण केले. तिला आळंदी येथील आर्य सेवा संस्थेत नेऊन रजिस्टरवर जबरदस्ती स्वाक्षऱ्या करण्यास भाग पाडले. त्यानंतर तिच्यावर बळजबरीने अत्याचार केल्याचा प्रकार १६ ते १७ जूनदरम्यान घडला आहे. याप्रकरणी दत्ता दिनकर गायकवाड याच्याविरोधात मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
01 Sep 2026 01:09 PM (IST)
शहरात स्वाईन फ्ल्यूमुळे (Swine Flu) आत्तापर्यंत तीन रूग्णांचा मृत्यू झाला असून, त्यात एक शहरातील व दोन बाहेरगावचे रूग्ण आहेत. हे तीन्ही मृत्यू जून आणि जुलै महिन्यातील आहेत. हवेतील संसर्गाने होणाऱ्या स्वाईन फ्लूचा देशातच उद्रेक वाढत असल्याबद्दल चिंता व्यक्त करीत मनपा आयुक्त मनिषा खत्री यांनी डेंग्यूवर मनपाने मोठे नियंत्रण मिळविल्याचा दावा केला आहे. डेंग्यूचे ऑगष्ट महिन्यात ९१ रूग्ण आढळून आले असून, आत्तापर्यंत १२४ संशयित रूग्ण असले तरी, त्यातील ११९ रूग्ण सध्या उपचारार्थ आहेत. मात्र गेल्या दोन वर्षात ऑगष्टमधील डेंग्यूची संख्या लक्षात घेता यंदा त्यावर महापालिकेने नियंत्रण मिळविल्याचेही त्यांनी सांगितले.
01 Sep 2026 01:02 PM (IST)
‘मी सरकारचा भाग नाही, मी आमदार आणि लोकप्रतिनिधी आहे. संवादाच्या टेबलवर मी बसत नाही,’ असे भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मनोज जरांगे पाटील यांनी पुकारलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात भाजपच्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीपूर्वी माध्यमांशी संवाद साधताना सुधीर मुनगंटीवार यांनी केलेल्या एका विधानाने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
01 Sep 2026 12:48 PM (IST)
दारूच्या आहारी गेलेला मुलगा दररोज वाद घालत असल्याच्या रागातून वडिलांनी मुलाचा गळा आवळून तसेच मारहाण करून खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. वारजे माळवाडी परिसरात ही घटना घडली असून, याप्रकरणी वडिल तसेच आईला पोलिसांनी अटक केली आहे. महेश भागवत गायकवाड (वय ३०) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी भाऊ गणेश भागवत गायकवाड (वय ३४) यांनी पोलिसांकडे तक्रार दिली आहे. त्यानुसार भागवत सूर्यभान गायकवाड (वय ६४), पार्वती भागवत गायकवाड (वय ६०) आणि आणखी एका व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वडिल भागवत व आई पार्वती यांना अटक केली आहे.
01 Sep 2026 12:36 PM (IST)
राजगुरुनगर शहरातील वाडा रोड परिसरातील संगम गार्डन येथे कौटुंबिक वादातून पतीने पत्नीचा गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना रविवारी (दि. ३०) सकाळी घडली आहे. आईला वाचवण्यासाठी धावून आलेल्या १७ वर्षीय मुलावरही आरोपीने ओढणीने गळा आवळण्याचा प्रयत्न करून चाकूने वार केल्याचे समोर आले आहे. या घटनेमुळे खेड शहरात खळबळ उडाली आहे. दीपा महेंद्र दौंडकर (वय ४०) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. तर महेंद्र शिवाजी दौंडकर (वय ४५) असे आरोपी पतीचे नाव आहे. या प्रकरणी मृत महिलेच्या १७ वर्षीय मुलाने खेड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
01 Sep 2026 12:24 PM (IST)
बाखू देण्यास नकार दिल्याच्या कारणावरून तिघांनी तरुणाला लाथाबुक्क्यांनी आणि लोखंडी रॉडने मारहाण केली आहे. एका आरोपीने बर्फ फोडण्याचा टोचा डोळ्याजवळ मारल्याने तरुण जखमी झाला आहे. येरवड्यातील गाडीतळ बसस्टॉप परिसरात हा प्रकार घडला आहे. याप्रकरणी प्रकाश ज्ञानदेव कुसाळकर (वय ३५, रा. भाजी मंडई, येरवडा) आणि त्याच्या दोन साथीदारांवर लक्ष्मीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत राहुल रमेश विटकर (वय ३०, रा. शितळादेवी मंदिरामागे, सेवक चौक, येरवडा) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, मेट्रो स्टेशनसमोरील गाडीतळ बसस्टॉप परिसरात फिर्यादी होते. आरोपींनी त्यांच्याकडे तंबाखू मागितली. तंबाखू देण्यास नकार दिल्याने आरोपींनी शिवीगाळ करीत लाथाबुक्क्यांनी आणि लोखंडी रॉडने मारहाण केली. प्रकाश कुसाळकर याने बर्फ फोडण्याचा टोचा फिर्यादीच्या डोळ्याजवळ मारून त्यांना जखमी केल्याचे तक्रारीत नमूद आहे. पोलिस हवालदार कुंभार तपास करीत आहेत.
01 Sep 2026 12:12 PM (IST)
उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याविषयी अवमानकारक वक्तव्य करणारी चित्रफीत सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी डेक्कन पोलिसांकडून दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याबाबत भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक सुनील पांडे (वय ५६, रा. भांडारकर रस्ता, डेक्कन जिमखाना) यांनी डेक्कन पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. याप्रकरणी संतोष पंडीत याच्यासह दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
01 Sep 2026 11:53 AM (IST)
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची प्रकृती बिघडल्याची माहिती समोर आली आहे. त्यांना मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटलच्या आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले आहे. अहिल्यानगरच्या राळेगण सिद्धीजवळील एका स्थानिक रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, प्रकृती खालावल्याने त्यांना चांगल्या उपचारांसाठी मुंबईत हलवण्यात आले. डॉक्टरांचे एक पथक सध्या त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहे.
01 Sep 2026 11:50 AM (IST)
नाशिक परिक्रमा मार्ग (बाह्य रिंग रोड) प्रकल्पातील बाधित शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर बुधवारी (ता.2) मुंबईत बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. मुख्यमंत्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेत होणाऱ्या बैठकीस २१ शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ उपस्थित राहणार आहे. संबंधित शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर यावेळी अंतिम तोडगा निघण्याची शक्यता आहे.
01 Sep 2026 11:40 AM (IST)
लातूर जिल्हा पोलिस दलाच्यावतीने जिल्ह्यात आजपासून दुचाकीस्वारांसाठी हेल्मेट सक्तीची करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात राष्ट्रीय महामार्ग व राज्य महामार्ग यावर विना हेल्मेट दुचाकी चालवणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे आता या महामार्गावर दुचाकीस्वारांना हेल्मेटचा वापर करावा लागणार आहे.
01 Sep 2026 11:35 AM (IST)
वर्ल्ड असोसिएशन ऑफ हिंदू ॲकेडेमिशियन्स (वाहा) तर्फे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात नियोजित कार्यक्रमावरून वाद निर्माण झाला आहे. पुरोगामी विद्यार्थी कृती समितीने कुलगुरू डॉ. संजीव सोनवणे यांना निवेदन देत कार्यक्रमाला विरोध दर्शविला आहे. विद्यापीठाने या संपूर्ण प्रकरणात सावध भूमिका घेताना, अद्याप अंतिम परवानगी दिली नसल्याचे स्पष्ट केले आहे.
01 Sep 2026 11:25 AM (IST)
नेपाळमधील नद्यांचे प्रवाह बदलणे आणि पाण्याची पातळी वाढल्याचा परिणाम शतकानुशतके पूजल्या जाणाऱ्या विशाल शालिग्रामवर झाला आहे. हिंदू धर्मीय लाखो भाविक ज्या पवित्र शिळेची पूजा करतात, ती पाण्यात बुडाली आहे. नेपाळमधील गुल्मी, स्यांग्जा आणि पर्वत या तीन जिल्ह्यांच्या संगमावर असलेल्या सेतीबेनी येथे ही शालिग्राम शिळा आहे. सेती नदीचा प्रवाह बदलल्याने ही पवित्र शिळा पाण्याखाली गेली आहे.
01 Sep 2026 11:20 AM (IST)
कोल्हापुरातील शिवसेनेमध्ये मंत्रिपदावरून अंतर्गत खदखद पुन्हा एकदा बाहेर आली आहे. पालकमंत्रिपद प्रकाश आबिटकर यांना मिळाल्याने शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर हे नाराज असल्याचे बोलले जात होते. मात्र, अडीच वर्षानंतर पुन्हा मंत्रिपद मिळेल, अशी आशा आमदार क्षीरसागर यांना आहे. आता हे मंत्रिपद आपल्याला मिळावे, अशी मागणी करत क्षीरसागर यांनी आपल्या मनातील खदखद व्यक्त करून दाखवली आहे.
01 Sep 2026 11:15 AM (IST)
भारत निवडणूक आयोगाने १ ऑक्टोबर २०२६ हा अर्हता दिनांक निश्चित करून जाहीर केलेल्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत पुणे जिल्ह्यातील २१ विधानसभा मतदारसंघांची प्रारूप मतदार यादी सोमवारी प्रसिद्ध करण्यात आली. या प्रक्रियेत विविध कारणांमुळे तब्बल २८ लाख ६६ हजार ४८१ मतदारांची नावे प्रारूप यादीतून वगळण्यात आली आहेत.
01 Sep 2026 11:10 AM (IST)
बिहारच्या औरंगाबाद जिल्ह्यातील पाच अल्पवयीन मुलींनी विषारी पदार्थ सेवन केल्यानंतर चौघींचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पाचवी मुलगी बचावली असून, तिच्या जबाबावरून या घटनेमागील नेमके कारण समोर आणण्याचा प्रयत्न पोलिसांकडून सुरू आहे. ही घटना २९ जानेवारी रोजी हसपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात घडली. मात्र, घटनेची माहिती पोलिसांना काही दिवसांनी मिळाल्यानंतर या प्रकरणाला वेगळे वळण मिळाले आहे.
01 Sep 2026 11:06 AM (IST)
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे एडीसी (ADC) असलेले मेजर ऋषभ सिंग संब्याल पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. राष्ट्रपतींच्या सुरक्षा कर्तव्यादरम्यान नेहमी त्यांच्यासोबत दिसणारे मेजर संब्याल यांनी भारतीय सैन्यातून मुदतपूर्व सेवानिवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला. ऋषभ सांब्याल यांचे फोटो अनेकदा सोशल मीडियावर व्हायरल झाले होते आणि त्यांच्या व्यक्तिमत्त्व व शिस्तीमुळे लाखो लोकांनी देशभरात त्यांची ‘नॅशनल क्रश’ अशी ओळख निर्माण झाली होती. पण आता त्यांच्या मुदतपूर्व निवृत्तीची बातमी समोर आल्याने देशभरातून त्यांच्या चाहत्यांमध्ये त्यांच्या निवृत्तीमागचे कारण जाणून घेण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे.
01 Sep 2026 10:50 AM (IST)
आज सर्वोच्च न्यायालय नीट निदर्शने करणाऱ्यांविरोधात दाखल एफआयआर रद्द करण्याच्या याचिकेवर सुनावणी करणार आहे. या याचिकेत विद्यार्थ्यांवर नोंदवण्यात आलेल्या सुमारे १३ एफआयआर रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे. याशिवाय, दिल्ली पोलिसांनी हिंसेत सहभागी असलेल्या सुमारे २,८७३ निदर्शकांविरोधात गुन्हा दाखल करण्याची परवानगी मागितली आहे. सरन्यायाधीश सूर्यकांत, न्यायमूर्ती व्ही. मोहना आणि न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी होणार आहे. यापूर्वी सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन लवकरात लवकर सुनावणी घेण्याची विनंती केली होती, जी न्यायालयाने मान्य केली होती.
01 Sep 2026 10:40 AM (IST)
प्रसिद्ध रॅपर आणि गायक बादशाहच्या चाहत्यांसाठी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. बादशाहने आपली दुसरी पत्नी ईशा रिखीपासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला असून, दोघांनी घटस्फोटाची घोषणा केली आहे. लग्नाला अवघे पाच महिने झाले असतानाच दोघांनी आपापल्या वाटेने पुढे जाण्याचा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या घटस्फोटाच्या चर्चांना उधाण आलं होतं. अखेर बादशाह आणि ईशाने सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
01 Sep 2026 10:30 AM (IST)
मध्य प्रदेशच्या उज्जैन शमशान घाटावरुन एका साधकाचा व्हिडिओ सोशल मिडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये एक किन्नर अघोरी काली उर्फ नंद गिरी, हातात तलवार घेऊन, जळत्या चितेसमोरील मानवाचे मांस कापून खाताना दिसला. व्हिडिओ समोर आल्यानंतर अनेक भाविक तसेच संत समाजात संतापाची लाट पसरली. जळत्या चितेवरील मांस खाल्ल्याचे पाहून अनेकांच्या भावना दुखावल्या गेल्या आणि लोकांनी अघोरीवर कारवाईची मागणी केली. माहितीनुसार, ही घटना मध्य प्रदेशच्या उज्जैन इथे घडल्याचा दावा आहे. व्हिडिओतील दृष्ये धक्कादायक असून ती पाहून तुम्हाला धक्का बसल्याशिवाय राहणार नाही.
01 Sep 2026 10:10 AM (IST)
भाईंदर : मीरा-भाईंदर शहरातील मूर्धा गावात स्थानिक भूमिपुत्रांच्या घरांवर करण्यात आलेल्या कारवाईवरून राजकीय वातावरण तापले आहे. जुनी कोळीवाडी, आगरी-कोळी समाजाची घरे तसेच आदिवासी पाड्यांवरील घरांवर थेट हातोडा चालवून ती उध्वस्त करणे अन्यायकारक असल्याची भूमिका शिवसेना नेते तथा आमदार प्रताप सरनाईक यांनी घेतली आहे. भूमिपुत्रांना त्यांच्या हक्काच्या जागेतून हद्दपार होऊ देणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
01 Sep 2026 10:00 AM (IST)
मिरा-भाईंदर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार याद्यांमध्ये झालेल्या कथित मोठ्या घोळाचा मुद्दा आता ऐरणीवर आला आहे. महाराष्ट्राचे परिवहन मंत्री तथा धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी पत्रकार परिषद घेत निवडणूक प्रक्रियेतील कथित अनियमितता, मतदार याद्यांमधील विसंगती आणि प्रशासनाच्या भूमिकेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले. मतदार याद्यांच्या एसआयआर (SIR) प्रक्रियेतून समोर आलेल्या आकडेवारीचा हवाला देत त्यांनी मोठ्या प्रमाणावर मतदारांच्या नोंदी बाद झाल्याचा दावा केला.
01 Sep 2026 09:45 AM (IST)
Dr Rajendra Rupanwar Suicide case: साताऱ्याच्या फलटण उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेले डॉ. राजेंद्र रुपनवर यांनी टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आत्महत्येचा प्रयत्न केल्यानंतर त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू होते, मात्र त्यांना वाचवण्यात यश आले नाही. डॉ. रुपनवर यांनी आत्महत्येपूर्वी आपल्या हातावरच सुसाईड नोट लिहून वरिष्ठांवर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. या प्रकरणात मुंबईतील दादर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फलटण उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. लीला मदने आणि कोंडे देशमुख यांच्यावर कठोर कारवाई व्हावी, अशी जोरदार मागणी मृत डॉक्टरांच्या कुटुंबीयांनी केली आहे. जोपर्यंत संबंधित आरोपींवर कारवाई होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा आक्रमक पवित्रा कुटुंबीयांनी घेतला आहे.
01 Sep 2026 09:35 AM (IST)
Inflation in Mumbai: आज, १ सप्टेंबर २०२६ पासून मुंबईसह महाराष्ट्रातील सर्वसामान्यांच्या खिशावर परिणाम करणारे काही महत्त्वाचे दरबदल लागू झाले आहेत. विशेषतः सणासुदीच्या दिवसांत दूध, सीएनजी आणि रिक्षा-टॅक्सीचे भाडे महाग झाल्याने मुंबईकरांचा दैनंदिन खर्च वाढणार आहे. मुंबईत म्हशीच्या दुधाचा घाऊक दर ९३ रुपयांवरून थेट १०२ रुपये प्रति लिटर झाला आहे. ही दरवाढ १ सप्टेंबरपासून लागू झाली असून, किरकोळ बाजारात ग्राहकांना यापेक्षा जास्त दर मोजावा लागणार आहे.
दुसरीकडे, मुंबई महानगर प्रदेशात (MMR) १ सप्टेंबरपासून रिक्षाचे किमान भाडे २६ रुपयांवरून २७ रुपये, तर काळी-पिवळी टॅक्सीचे किमान भाडे ३१ रुपयांवरून ३३ रुपये झाले आहे. पहिल्या १.५ किमी प्रवासासाठी हे नवीन किमान दर लागू असतील. डिजिटल मीटरमध्ये नवीन दर सेट करण्यासाठी रिक्षा-टॅक्सी चालकांना ३० नोव्हेंबरपर्यंत मुदत देण्यात आली असून, तोपर्यंत सुधारित टॅरिफ कार्डचा वापर केला जाईल.
01 Sep 2026 09:27 AM (IST)
Duleep Trophy 2026: भारतीय क्रिकेटमधील १५ वर्षीय युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी सध्या ‘दुलीप ट्रॉफी २०२६’ स्पर्धेत आपल्या अष्टपैलू कामगिरीमुळे तुफान चर्चेत आहे. या स्पर्धेत त्याला ईस्ट झोन संघाच्या उपकर्णधारपदाची मोठी जबाबदारी देण्यात आली आहे.
नॉर्थ ईस्ट झोनविरुद्ध खेळल्या गेलेल्या पहिल्या सामन्यात वैभवला बॅटने फारशी कमाल दाखवता आली नसली, तरी त्याने अप्रतिम गोलंदाजी करत २ महत्त्वाचे बळी टिपले. त्याची अनोखी गोलंदाजीची शैली (Bowling Action) पाहून क्रिकेट चाहत्यांसह माजी खेळाडूही चक्रावून गेले आहेत. भारताचा दिग्गज अष्टपैलू खेळाडू युवराज सिंगनेही त्याच्या या बॉलिंग ॲक्शनवर दिलेली प्रतिक्रिया सध्या सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे.
01 Sep 2026 09:19 AM (IST)
Mumbai Bandra Road Accident: मुंबईतील वांद्रे परिसरात रविवारी एका महिला चालकाने कारने चिरडल्याने आठ वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. या दुर्घटनेत अंश गुप्ता या बालकाचा मृत्यू झाला असून तो त्याच्या आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. अपघाताच्या या घटनेनंतर पोलीस कारवाईपासून वाचण्यासाठी आरोपी मेघा रावलच्या कुटुंबीयांनी प्रत्यक्षदर्शी साक्षीदाराला विकत घेण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
01 Sep 2026 09:15 AM (IST)
मुंबई : महाराष्ट्रातील एसआयआर अर्थात मतदार यादी पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत प्रारूप मतदार यादी सोमवारी (दि.३१) प्रसिद्ध करण्यात आली. जुन्या मतदार नोंदींमधील २ कोटींहून अधिक मतदारांचे नाव या यादीत नाही. निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार, पुनरीक्षणापूर्वी राज्यात ९७८५४०४९ मतदार होते. यापैकी ७७१६५५६२ नावांचा मसुदा यादीत समावेश करण्यात आला आहे. वाचा सविस्तर-
01 Sep 2026 09:12 AM (IST)
India Share Market Update: १ सप्टेंबर रोजी आज भारतीय शेअर बाजाराचे प्रमुख निर्देशांक, सेन्सेक्स आणि निफ्टी ५०, यांची सुरुवात सपाट ते नकारात्मक पातळीवर होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. गिफ्ट निफ्टीच्या ट्रेंडनेही भारतीय बेंचमार्क निर्देशांकाची सुरुवात संथ असल्याचे संकेत दिले. गिफ्ट निफ्टी, निफ्टी फ्युचर्सच्या मागील बंद भावापेक्षा ५४ अंकांनी घसरून सुमारे २४,१९७.५ अंकांवर व्यवहार करत होता.
मागील सत्रात देशांतर्गत शेअर निर्देशांक नकारात्मक पातळीवर बंद झाले, तर बेंचमार्क निफ्टी ५० २४,१०० च्या पातळीखाली बंद झाला. सेन्सेक्स ३०७.२४ अंकांनी, म्हणजेच ०.४० टक्क्यांनी घसरून ७६,९५७.२७ वर बंद झाला, तर निफ्टी ५० ९५.२५ अंकांनी, म्हणजेच ०.३९ टक्क्यांनी घसरून २४,०८०.४० वर स्थिरावला.






