महाराष्ट्रात बदल्याचं सत्र सुरूच; तब्बल ५० हून अधिक पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या
राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र पोलिस दलात मोठ्या प्रमाणावर फेरबदल करण्यात आले आहेत. गृह विभागाच्या आदेशानुसार, ५० पेक्षा अधिक वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या असून त्यामध्ये पोलिस अधीक्षक आणि पोलिस उपायुक्त स्तरावरील अधिकाऱ्यांचा समावेश आहे.
ही खांदेपालट मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड, नाशिक, कोल्हापूरसह अनेक जिल्ह्यांतील अधिकाऱ्यांवर परिणाम करणारी ठरली आहे. स्थानिक निवडणुकांच्या तोंडावर करण्यात आलेल्या या बदल्यांना राजकीय दृष्टिकोनातूनही महत्त्व आहे.
लातूर जिल्ह्याचे नवीन पोलिस अधीक्षक म्हणून अमोल तांबे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सचे अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील यांची इतरत्र बदली झाली आहे.
तेजस्विनी बाळासाहेब सातपुते, या पुण्यातील शस्त्र निरीक्षण शाखेत कार्यरत असलेल्या अधिकारी, यांची बदली पुण्यातील राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 1 मध्ये समादेशक पदावर झाली आहे.
अश्विनी सानप यांना पुण्यातील लोहमार्ग पोलीस अधीक्षक पदावर नेमण्यात आले आहे.
नवी मुंबईमधील राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 11 चे समादेशक म्हणून संजय वाय. जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
शीतल झगडे यांची बदली मुंबईतील दहशतवाद विरोधी पथकाच्या पोलिस अधीक्षकपदी झाली आहे.
निलेश मोरे यांची नेमणूक भंडारा जिल्ह्यातील अप्पर पोलिस अधीक्षक म्हणून करण्यात आली आहे.
वैभव कुलबुर्गै यांना अहिल्यानगर येथे अप्पर पोलिस अधीक्षकपदी पाठवण्यात आले आहे, तर गोकुळ राज जी यांना गडचिरोली जिल्ह्याच्या अप्पर पोलिस अधीक्षक पदाची जबाबदारी देण्यात आली आहे.
या सर्व बदल्यांचे आदेश गृह विभागाने अधिकृतरीत्या जारी केले असून यामुळे राज्याच्या पोलीस प्रशासनात लक्षणीय हालचाल निर्माण झाली आहे.