कोलकाता लॉ कॉलेजच्या कॅम्पसमध्ये विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार, TMC च्या नेत्यासह तिघांना अटक
कोलकात्याच्या प्रतिष्ठित दक्षिण कलकत्ता लॉ कॉलेजमधून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. २५ जूनच्या रात्री कॉलेज कॅम्पसमध्ये एका विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार झाला करण्यात आला आहे. पीडितेच्या तक्रारीनंतर कसबा पोलिस ठाण्याच्या पोलिसांनी दोन विद्यार्थी आणि एका कर्मचाऱ्याला अटक केली आहे. प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेता कसून चौकशी करण्यात येत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना २५ जूनच्या रात्री घडली होती. पीडित विद्यार्थिनीने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत, तिच्यावर कॉलेज कॅम्पसमध्ये सायंकाळी ७:३० ते १०:५० च्या दरम्यान सामूहिक बलात्कार झाल्याचं म्हटलं आहे.
या प्रकरणातील पहिला आरोपी मनोजित मिश्रा ( वय ३१) आहे. मनोजित मिश्रा महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी तसेच दक्षिण कोलकाता टीएमसीपीचा (तृणमूल छात्र परिषद) जिल्हा सरचिटणीस आहे. त्याचे सत्ताधारी तृणमूल काँग्रेसशी थेट राजकीय संबंध समोर आले आहेत. तर जैब अहमद ( वय १९) आणि प्रमित मुखर्जी (वय २०) हे सध्या याच कॉलेजमध्ये शिक्षण घेत आहेत.
आरोपीने पीडित मुलीकडे लग्नाचा प्रस्ताव ठेवला होता, मात्र तिने तो नाकारला. या रागातून त्याने दोघा साथीदारांच्या मदतीने तिच्यावर बलात्कार केला. पीडितेने विरोध केला, परंतु ती या झटापटीत जखमी झाली. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेची माहिती मिळताच पीडितेची प्राथमिक वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे आणि तिचा जबाबही नोंदवण्यात आला आहे. पोलिसांनी या प्रकरणाशी संबंधित साक्षीदारांचे जबाबही नोंदवले आहेत. ज्या कॉलेजमध्ये ही घटना घडली तो भाग सील करण्यात आला आहे. तेथील फॉरेन्सिक टीमकडून तपासाची तयारी सुरू आहे.
टोळक्याकडून तरुणावर धारदार शस्त्राने वार; ज्वलनशील पदार्थ अंगावर फेकला अन्…
कसबा पोलिस स्टेशनच्या पथकाने सिद्धार्थ शंकर शिशु रॉय उद्यानाच्या समोरून दोन आरोपींना तलबागन क्रॉसिंगजवळून अटक केली, तर तिसऱ्या आरोपीला त्याच्या घरातून अटक करण्यात आली. तिन्ही आरोपींचे मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. यातून काही पुरावे मिळतात काय याचा तपास केला जात आहे. या घटनेबाबत दक्षिण कोलकाता लॉ कॉलेज प्रशासनाकडून अद्याप कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही. घटनेच्या संवेदनशीलतेमुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये संताप आहे.
तिन्ही आरोपींना अलीपूर न्यायालयात हजर करण्यात आलं असून पोलिसांनी १४ दिवसांची कोठडी मागितली होती. न्यायालयाने तिघांनाही पुढील मंगळवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, विरोधी पक्षनेते आणि माजी तृणमूल काँग्रेस सदस्य सुवेंदू अधिकारी यांनी या घटनेवरून ममता सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे.