मोखाडा तालुक्यात एका गरोदर स्त्रीला प्रसुत झालेल्या महिलेला घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकेने चक्क अर्ध्या रस्त्यात सोडून दिले. तालुक्यातील अति दुर्गम अशा आमले गावातील प्रसूत महिला सविता बांबरे हिला जव्हारहून घेऊन निघालेल्या रुग्णवाहिकेने आमले घाटात अर्ध्यावरच सोडले. या ओल्या बाळंतीणला तब्बल दोन किलोमीटर बाळाला छातीशी कवटाळत डोंगर उताराची वाट अनवाणी तुडवण्याची दुर्दैवी वेळ आलेली आहे. आरोग्य व्यवस्थापनाच्या भोंगळ कारभारामुळे नाहक त्रास गावरकऱ्यांना सहन करावा लागत असल्याचं समोर आलं आहे. या सगळ्या प्रकरणाविरोधात सर्व स्थरातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
काळीज पिळवटून टाकणारी घटना अशी की, श्रीमती सविता बांबरे या महिलेला प्रसूतीसाठी 19 नोव्हेंबर रोजी खोडाळा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले होते. मात्र तिची येथे सुलभ प्रसूती शक्य नसल्याने तिला पुढे मोखाडा ग्रामीण रुग्णालयात संदर्भ सेवा देण्यात आली होती. इथे तीची प्रसूती सुलभतेने झाली मात्र बाळाच्या सुरक्षेच्या दृष्टीने जव्हार येथील कॉटेज हॉस्पिटल येथे हलविण्यात आले होते. येथे उद्भवलेल्या समस्यांचे निराकरण करून बाळ आणि बाळंतीनिला कॉटेज हॉस्पिटलच्या व्यवस्थापनाने त्यांच्याकडील रुग्णवाहीका उपलब्ध करून देऊन तिला सुखरूप पणे घरी सोडण्याची तजवीज केली.
मात्र रुग्णवाहीका चालकाने प्रथम आडमुठेपणा करत सूर्यमाळ घाटात बाळबाळंतनीला हटवादीपणे अर्ध्यावरच सोडले. यावेळी सविताने व तिच्या पतीने हातापाया पडून विनंती केल्या. नंतर या चालकाने त्यांना पुढे आमला फाटा येथे गावापासून दोन किलोमीटर मागेच सोडून दिले आणि रुग्णवाहीका घेऊन चालक बेजबाबदाऱपने जव्हार येथे निघून गेला आहे. त्यामुळे सविता हिला आपले बाळ छातीशी कवटाळून डोंगर उताराची वाट अनवाणी तुडवीत जावी लागली आहे. माणूसकीला काळीमा फासणाऱ्या या घटनेने स्थानिक आरोग्य प्रशासनावर चांगलेच ताशेरे ओढण्यात आले.
वारंवार विनंती करूनही आमच्या बाळबाळंतनीला रुग्णवाहिका चालकाने अर्ध्यावरच सोडले आहे. त्यामुळे आम्हाला तिथून पुढे दोन किलोमीटर चालत जाऊन घर गाठावे लागले आहे. यादरम्यान सविताला काही अपघात झाला असता तर आम्ही आणि या नवजात लेकराने कोणाच्या तोंडाकडे पाहिले असते? असा सवाल करत सविताच्या पतीने आरोग्य प्रशासनाला खडेबोल सुनावले आहेत. रुग्णांच्या जीवाशी खेळणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई व्हायलाच पाहिजे अशी मागणी देखील स्थानिकांकडून करण्यात येत आहे.






